तडका : हस्ताक्षराची ऐशी तैशी..!

तडका : हस्ताक्षराची ऐशी तैशी..!
Published on
Updated on

महाराष्ट्र देशी हस्ताक्षर दिन यथातथाच साजरा झाला. सुंदर हस्ताक्षर असले पाहिजे, हा कधीकाळी अत्यंत आग्रहाचा विषय असायचा, हे नवीन पिढीला सांगितले तर खरे वाटणार नाही. आजपासून साधारण पन्नास वर्षांपूर्वी प्रगती पुस्तकांमध्ये हस्ताक्षर घाणेरडे आहे, सुधारण्याचा प्रयत्न करा, असा पालकांना सल्ला असायचा. सुंदर हस्ताक्षर गिरवण्याचे क्लासेसही चालायचे. सुंदर हस्ताक्षर म्हणजे सुंदर मनाचा आरसा, असेही काहीतरी बोधवाक्य होते. काळाच्या ओघात बर्‍याच गोष्टी संपत गेल्या, त्यापैकी एक म्हणजे सुंदर हस्ताक्षराचा आग्रह.

नवीन पिढीला चक्क लिहिण्याचेच काम पडत नाही. उत्तरपत्रिका लिहिणार्‍याचे हस्ताक्षर चांगले असेल, तर त्याला एका गुणाचे जादा मार्कही मिळत. ज्यांचे हस्ताक्षर चांगले नाही, असे विद्यार्थी शाळांमध्ये दुय्यम दर्जाचे समजले जात असत. पुढे टंकलेखन आले. म्हणजे टाईपच्या मशिन आल्या आणि शासकीय कार्यालयांमधून हस्ताक्षर बाद करण्यात आले. केवळ शेरे मारण्यासाठी किंवा सह्या करण्यासाठीच पेन हातात घेतले जाऊ लागले. त्यानंतर सर्वव्यापी असा संगणक आला आणि त्या पाठोपाठ मोबाईल, टॅब इत्यादी उपकरणे आली. दीर्घोत्तरी प्रश्न विचारणे बंद झाले आणि त्याऐवजी वस्तुनिष्ठ प्रश्न विचारले जाऊ लागले. पुढे पुढे तर प्रश्नाचा पर्याय निवडून तो पेन्सिलने काळा करणे एवढेच काम राहिले. आजही राज्य आणि केंद्र सेवा पूर्व परीक्षा याच पद्धतीने घेतल्या जातात, त्यामुळे लिहिणे हा प्रकार बंद झाला.

पूर्वी शाळा, कॉलेजला जाताना हातामध्ये पुस्तके आणि वह्या घेऊन विद्यार्थी जात असत. चित्रपटांमध्ये हिरो, हिरोईन कॉलेजमध्ये समोरासमोर आले की हमखास एकाच्या हातातील पुस्तके, वह्या खाली पडत आणि ते उचलून देताना एकमेकांची नजरानजर होई आणि प्रेम होत असे. आजकाल महाविद्यालयांमध्ये कसे प्रेम होते माहीत नाही, कारण कुणाच्याही हातात पुस्तके, वह्या नाहीत, त्यामुळे ते पडण्याचा विषय येत नाही.

आता मात्र सगळेच बदलले आहे. संगणकाची जागा स्मार्टफोनने घेतली असून, सर्व कामे त्यावरच होत आहेत. कागदपत्रांच्याही हार्ड कॉपीऐवजी सॉफ्ट कॉपी सर्वत्र वापरल्या जात आहेत. त्यावर सही असणे बरेचदा आवश्यक असते. परंतु, अधिकारी वर्गाच्या डिजिटल सह्या सर्व कागदपत्रांवर वापरल्या जात आहेत. म्हणजे सहीसाठी सुद्धा पेन हातात घेण्याची गरज राहिलेली नाही. मग अशावेळी सुंदर हस्ताक्षर असावे, असा आग्रह कोणी धरील बरे?

बँकांमध्ये पूर्वी किंवा बरेचदा आजही काही काम करायचे असेल, तर लिहिण्यासाठी एकमेकांचे पेन मागितले जातात. पोस्टामध्ये आणि बँकांमध्ये दोर्‍याला बांधून पेन उपलब्ध करून ठेवले जात असत. बदलत्या काळाच्या ओघात बँकांचा कारभारही ऑनलाईन पद्धतीने होत असल्यामुळे मुळात बँकेत जाण्याची गरजच राहिलेली नाही. एखादे कर्ज प्रकरण असेल, तर तेही सॉफ्ट कॉपीवर पूर्ण केले जाते आणि अगदी शेवटच्या टप्प्यात म्हणजे कर्जाचा चेक किंवा ड्राफ्ट घेण्यासाठी बँकेत जाऊन सही करावी लागते. एवढेच काय ते लिहिण्याचे काम राहिले आहे. त्यापुढील टप्पा म्हणजे तुम्ही बोलायचे आणि ते टाईप होत राहते. प्रस्तुत सदराचे लेखक मोबाईल हातात धरून बोलतात आणि ते जशाला तसे टाईप होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news