तडका : नेटाने जगावे!

तडका : नेटाने जगावे!

सोशल मीडियाच्या हिंदोळ्यावर सतत झोके घेण्याचे काही परिणाम आपल्यावर होत असतात. म्हणजे 'जग मिथ्या आहे' किंवा 'याद रख सिकंदर के हौसले तो भारी थे, जब गया था दुनियासे, दोनो हात खाली थे' किंवा तत्सम स्वरूपाच्या पोस्टस् वाचल्या की नैराश्य दाटून येते. काय करावे सूचत नाही.

पण परवा घडलेला प्रसंग अक्षय ऊर्जा देऊन गेला. वेळ रात्री साडे अकराची, मित्राचा फोन आला. 'आजोबांना चक्कर आलीये, लवकर ये,' असे म्हणून त्याने ठेवून दिला. तत्काळ गाडी काढली आणि त्याच्या घरी पोहोचलो. त्याच्या नव्वद वर्षांच्या आजोबांना काही वेळापूर्वी चक्कर आली होती. मी गेलो तोवर ते सावरलेले होते. आजोबा व्यवस्थित होते म्हणजे जरा जास्तच व्यवस्थित होते. तोंडाचा पट्टा सुरू होता. समोर मान खाली घालून माझा मित्र, त्याचे वडील वय अंदाजे सदुसष्ट आणि त्याची आई उभे होते. आजोबा स्पष्ट बोलत होते, म्हणजे रागवत होते. चक्कर आली तरी मला दवाखान्यात का नेत नाहीत? हा खडा सवाल ते विचारीत होते. 'अधूनमधून चक्कर आली तर काळजी करू नका,' असे त्यांना डॉक्टरांनी अशातच सांगितले होते. 'वयाच्या नव्वदाव्या वर्षी आता जे होईल ते होऊ द्या; पण मला दवाखान्यात नेऊ नका' किंवा 'बोलावणे आले आहे, आता मला जावू द्या,' असा कुठलाही रडका सूर नव्हता.

"फुकनीच्यांनो, तुम्हाला काय वाटले, हरिहरराव (म्हणजे ते स्वतः) निघाले महाप्रस्थानाला? असा जातो की काय तडकाफडकी? आता कुठे नव्वदी लागलीये आणि तुमच्या भरोशावर सगळे सोडून गेलो तर वाट लावाल घराची. सुनबाई तू आहेस म्हणून बरे आहे, नाहीतर या रमेशला अक्कल नाही अजून आणि यालाच अक्कल नाहीतर याच्या पोराला कुठून येणार? आडात नाही तर पोहर्‍यात येणार कुठून? आमचं ध्यान गेलं दहा वर्षे आधीच, मूर्ख बाई, प्रत्येक गोष्टीत घाई."

मग माझ्याकडे वळून म्हणाले, "तू आलास ना गाडी घेऊन? चल गाडी काढ आणि ने मला दवाखान्यात." असे म्हणून हातात काठी घेऊन ते उभे पण राहिले. मित्र आणि मी त्यांना घेऊन गेलो. डॉक्टरांनी तपासून काही औषधे दिली आणि काळजी करू नका, असा सल्ला पण दिला. यावर आजोबा बोललेच, "अहो मी नाही काळजी करत पण यांना वाटायला नको का?" डॉक्टर स्वतःच काळजीत पडल्यासारखे वाटले. घरी पोहोचताच आजोबांनी औषधे घेतली आणि माझ्याकडे वळून म्हणाले, "माझ्यासाठी याचा फोन आला तर निवांत येत जा, ट्रॅफिक असते रात्री. पण सावकाश येत जा, माझी काळजी करू नकोस, अजून दहा वर्षे तरी डगमगत नाही मी. ये आता."

घरी परत आलो ती अक्षयऊर्जा घेऊन. जगण्याची आसक्ती असलीच पाहिजे. खरेतर भेकड लोक मरण मागतात. जीवनाकडे सकारात्मक भावनेने पाहिले. 'मरावे परी कीर्ती रूपी उरावे' ही भावना घेऊनच जीवनाचा आनंद लुटला. जीवन खूपच सुंदर आहे, त्याचा आनंद लुटला पाहिजे. जीवनात आजारपण, संघर्ष येणारच, मग घाबरून जीवन जगायचे काय? जीवन एकदाच माणसाला मिळते, त्याचा संपूर्ण आनंद लुटण्याची ऊर्जा बाळगली पाहिजे!

logo
Pudhari News
pudhari.news