लवंगी मिरची : बरसला एकदाचा..!

लवंगी मिरची : बरसला एकदाचा..!
Published on
Updated on

'तीव्र अशी ओढ देऊन एकदाचा महाराष्ट्रभर वरूण राजा बरसला', 'बळीराजाचा जीव सुखावला' अशा बातम्या यायला लागल्याबरोबर खरोखर फार मोठे समाधान सर्वांना मिळाले. पाणीटंचाई, शेतीचे नुकसान आणि एकंदरीतच बाजारपेठ थंड पडणे या सर्वांवर जलधारा बरसल्या. या पाऊस नसणार्‍या दुष्ट काळात काही लिहावेसे वाटतच नव्हते. कसे लिहिणार ? शिवार कोलमडून पडलेल्या मराठवाड्यात, विदर्भात आणि एकूणच राज्यभरात खूप कमी पाऊस झाला होता. पावसाचा टिपूस नव्हता, होती फक्त डोळ्यांत आसवे! भेगाळलेली राने आणि भकास झालेली मने होती; पण कृपा झाली आणि कृपेची बरसात झाली. ती अजूनही होतच राहो! भक्कम पाऊस पडला, तर वर्षभर पुरेल एवढे पाणी शिवारभर नक्कीच खेळते. काय सांगावे, अजूनही पाऊस पडला तर खेळेलही; पण आज किमानपक्षी पाणी वाहताना पाहिले. डोळे तृप्त झाले. मन आनंदून गेले.

राज्यात आजही कुठे ना कुठे शेतकरी आत्महत्या होतच असतात. थोडा धीर धर माझ्या शेतकरी मित्रा! हेही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील. संकट कुणालाही चुकलेले नाही. मृत्यूला जवळ करून तुझ्यापुरता प्रश्न मिटेल; पण ज्यांना आपण सोडून जातोय त्यांचे काय? धीर धर, आणखी थोडी कळ काढ. मान्य आहे की, परिस्थिती हाताबाहेर गेली आहे. मान्य आहे की, सगळे रस्ते बंद झाले आहेत; पण मार्ग निघतच असतो. तुकोबांचा एखादा अभंग आठवून पाहा. ज्ञानोबाची साजिरी मूर्ती आठवून पाहा. फार दूर कशाला? शेतात राबलेल्या तुझ्याच आईचा तो खरखरीत तळवा आणि त्याचा आश्वासक स्पर्श आठवून पाहा. खुंट वाढलेल्या तुझ्या दाढीवरून फिरलेले तुझ्या मुलांचे कोवळे स्पर्श आठवून पाहा. विठू माऊलीच्या पायी डोके टेकवलेस तेव्हाचा तो दैवी स्पर्श आठवून पाहा. हे सगळे स्पर्श तुला सांगत आहेत, थोडा धीर धर माझ्या शेतकरी मित्रा! हेही दिवस जातील आणि चांगले दिवस येतील.

तुझ्या आयुष्याच्या सात बारावर तुझे नाव असते राजा; पण त्याची मालकी असते तुझ्या कुटुंबाची! जगावे जगावे नेटाने जगावे, इतका साधा सोपा विचार मनात ठेव आणि लाव जोर आणि म्हण, 'हर हर महादेव' आणि कर सुरुवात संघर्षाला. विजय तुझाच आहे. हवामानाच्या सर्व अंदाजांना हुलकावणी देत वरुणराजा 'गणपती बाप्पा मोरया' असा जयघोष करत सर्वत्र तुफान बरसला. ओढे, नाले भरून वाहण्यास सुरुवात झाली. धरणे आणि तलाव हळूहळू भरत आहेत. रान चिंब पावसाने आबादानी होणार आहे. फक्त थोडा धीर धर माझ्या शेतकरी मित्रा! पावसाने अनेक ठिकाणी हाहाकार माजविला.

मोठे नुकसान झाले, तरीही भविष्याचा विचार केल्यास हा पाऊस खूपच फायदेशीर ठरतो. राज्यात दुष्काळाची दाट छाया निर्माण होण्याची भीती निर्माण झाली असताना वरुणराजाने सर्वांना दिलासा देण्याचे काम केले आहे. पाण्याविना माणसाचे जीवन अपूर्ण मानावे लागेल किंबहुना सर्वच प्राणीमात्रांची ती गरज आहे; पण वरुणराजा असा अवेळी पडून नकोस. ठरलेल्या वेळेते तू बरसला, तर सर्वांचाच जीव भांड्यात पडेल. मग, सगळीकडे आनंदी आनंद पसरले. निसर्ग उजळून निघेल. झाडे, फुले बहरू लागतील. पक्षांचा चिवचिवाट सगळीकडे पाहायला मिळेल. बळीराजाही सुखावून जाईल. माणसाला गरज असलेल्या धनधान्यांची गरज तो पूर्ण करू शकेल. वरुणराजा तुझ्याशिवाय सर्वच अशक्य आहे. त्यामुळे दरवर्षी भरपूर बरस आणि माणसाचे जीवन उजळून टाक, एवढीच प्रार्थना करतो तुझ्याकडे!

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news