लवंगी मिरची : सीमोल्लंघन..!

लवंगी मिरची : सीमोल्लंघन..!

मित्रा, आपल्या देशाने यावर्षी खर्‍या अर्थाने सीमोल्लंघन केलेले आहे. म्हणजे बघ ना की, सर्वात प्रथम आपण चांद्रयान सोडले, जे पृथ्वीच्या सगळ्या सीमा ओलांडून थेट चंद्रापर्यंत जाऊन पोहोचले. जो चंदामामा आभाळात आणि प्रत्यक्षात दुरून दिसायचा, तिथे चक्क भारताचे चांद्रयान जाऊन पोहोचले आणि त्याने चंद्राच्या जमिनीचा आणि वातावरणाचा अभ्यास केला. म्हणजे बघ, ज्यावेळेला आपण चांद्रयान मोहीम आखली तेव्हा सगळ्या जगाने शंका व्यक्त केली होती की, भारताला हे जमेल की नाही? परंतु त्यांच्या शंकांचे निरसन करत धुमधडाक्यात चांद्रयान चंद्रावर जाऊन पोहोचले आणि त्याला दिलेले काम त्याने पूर्ण केले.

देशाच्या, जगाच्या नव्हेतर पृथ्वीच्या सीमा ओलांडून जर आपले चांद्रयान चंद्रावर जाऊन पोहोचत असेल आणि दिलेली कामगिरी यशस्वी करत असेल, तर त्यासारखे सीमोल्लंघन दुसरे कोणतेही असणार नाही. प्रत्येक भारतीयाचा ऊर त्यावेळी अभिमानाने दाटून आला. किती ती अचूकता? किती वर्षांची तयारी? आणि या सर्वांचे यश जेव्हा प्रत्यक्ष पाहण्यात आले, त्यावेळेला भारत देश आनंदित झाला. प्रत्येक भारतीयाची मान अभिमानाने ताठ झाली.

अरे, एवढेच नाही, तर हे तंत्रज्ञान आता 'नासा'ने मागितले आहे. इतक्या पद्धतशीरपणे देशाचे चांद्रयान जर चंद्रावर जाऊन पोहोचत असेल, तर साहजिकच 'नासा'लाही आपल्या या तंत्रज्ञानाचे महत्त्व समजले आहे. 'नासा' ही जगभरातली अवकाश संशोधन करणारी अग्रगण्य संस्था आहे. त्या संस्थेला आपले तंत्रज्ञान घ्यावेसे वाटले, हेही एक प्रकारचे सीमोल्लंघन म्हणावे लागेल. शेवटी काय असते की, तंत्रज्ञान आपल्या देशाच्या सीमा ओलांडून जाते आणि इतर देशांना जेव्हा त्याचा मोह होतो तेव्हा ते खरे सीमेपार गेलेले असते. आपल्या संस्कृतीमध्ये सीमोल्लंघन म्हणजे आपल्या गावाबाहेर जाऊन सोने लुटणे होय. तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अक्षरशः यावर्षी भारताने सोने लुटले आहे, असे म्हणावे लागेल. शेवटी कोणतीही विजय पताका फडकवणे म्हणजे सीमोल्लंघन करणे आहे. याबाबतीत आपण यावर्षी आपल्या आजपर्यंतच्या यशाचा कळस गाठला आहे, असे म्हटले तर चूक होणार नाही.

शिवाय आणखी एक गोष्ट तुझ्या लक्षात आली का, की हे जे विक्रम आपण केले आहेत, हे अत्यंत कमी पैशात केले आहेत. म्हणजे आपलं बजेट जे आहे ते इतर देशांच्या कितीतरी पट कमी आहे. इतक्या कमी पैशांमध्ये चांद्रयान पृथ्वीवरून चंद्रावर पाठवणे कुणालाही शक्य झाले नाही, ते आपण शक्य करून दाखवले आहे. म्हणजे उद्या सर्वच प्रकारचे भारतीय तंत्रज्ञान जगभरात मागितले गेले तर आश्चर्य वाटायला नको.

नक्कीच तशी वेळ आली आहे. जमिनीवरून हवेत मारा करणारे अत्यंत अचूक असे आपले 'ब्राह्मोस' नावाचे मिसाईल याला जगभरातून मागणी आहे. शत्रूच्या ठरवून दिलेल्या लक्ष्याचा अचूक भेद करण्याची क्षमता 'ब्राह्मोस'मध्ये आहे आणि आज सर्व जगाला 'ब्राह्मोस' मिसाईल किंवा त्याचे तंत्रज्ञान पाहिजे आहे. मिसाईल तंत्रज्ञानामध्ये देश अव्वल क्रमांकावरती आहे.

हे तंत्रज्ञान मिळवताना याच्या पाठीशी असणार्‍या गेल्या 70 वर्षांतील असंख्य शास्त्रज्ञांचा आपल्याला अभिमानच वाटणार आहे. अहोरात्र संशोधन करून देशाला तंत्रज्ञानामध्ये सर्वोत्तम उंचीवर नेऊन ठेवणार्‍या विक्रम साराभाई, सतीश धवन आणि त्याचबरोबर आपले माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांचा फार मोठा वाटा आहे. तंत्रज्ञानाशिवाय आज काही खरे नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news