लवंगी मिरची : बाप्पाचे स्वागत..!

लवंगी मिरची : बाप्पाचे स्वागत..!
Published on
Updated on

हे बुद्धीच्या देवता, हे गणराया, तुमचे घरोघरी आगमन झाले. सार्वजनिक गणेश मंडळांनी मोठ्या मिरवणुका काढून तुमचे स्वागत केले. तुमच्या स्वागताचा जल्लोष घराघरात साजरा केला गेला. हे गणराया, तुमचे स्मरण केल्याशिवाय आमच्या कोणत्याही कार्याला सुरुवात होत नाही. आधी वंदू गणराया, असे संस्कार आमच्यावर बालपणापासून झाले आहेत. तुम्ही आलात आणि घराघरात चैतन्याचे वारे वाहू लागले. मोदक, पंचखाद्य आणि दररोजच्या आरतीची जय्यत तयारी करण्यात आली.

बाप्पा, तुम्ही आलेच आहात; पण येताना सगळी तयारी करून घेऊन आला आहात ना? कानठळ्या बसवणार्‍या आवाजांपासून संरक्षण करण्यासाठी इअर बड्स आणलेत ना? नसतील आणले तर मागवून घ्या अ‍ॅमेझॉन किंवा फ्लिपकार्टवरून. एखाद्या भक्ताकडून ऑर्डर करून मागवून घ्या. ते तुमच्यासाठी फार महत्त्वाचे आहेत. आधीच तुमच्या गजमुखी वदनाला भलेमोठे सुपासारखे कान आहेत. त्या कानांनी आपल्या भक्तांच्या हळू आवाजातील मागण्यापण तुम्हाला ऐकू येत असतील. पण इथे दहा दिवस गणेश उत्सवात मात्र डॉल्बी, डीजे यांचे भलेमोठे ध्वनी तुमच्या कानाला गारद करू शकतात. त्यामुळे हे गणराया, अजिबात रिस्क घेऊ नका. नाहीतर सगळा गोंधळ होऊन बसेल. गणेशोत्सव संपल्यानंतर तुम्ही कैलास पर्वतावर जाल आणि तुमच्या मातोश्री पार्वतीमाता यांनी 'अरे गणेश, इकडे ये' म्हणून आवाज दिला तर तो तुम्हाला ऐकूसुद्धा येणार नाही, इतके तुमचे कान इथे पृथ्वीवर बसलेले असतील.

हे गणराया, बुद्धी देणारी देवता म्हणून तुम्ही सर्वमान्य आहात. आमची तुम्हाला एकच विनंती आहे की, तुम्ही दिलेल्या बुद्धीचे पुन्हा एकदा फेरवाटप करा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयालाही न जुमानता प्रचंड मोठे आवाज करून ध्वनिप्रदूषण करणार्‍या मंडळांच्या कार्यकर्त्यांनाही थोडीशी आणखी बुद्धी द्या. गणेशोत्सव येतो, तुमचे आगमन होते तेव्हा आम्ही सर्व आनंदी होतो; परंतु त्याचबरोबर त्या भागातील अभ्यास करणारे विद्यार्थी, वयोवृद्ध जनता, ब्लडप्रेशरचे पेशंट्स, परिसरातील पशुपक्षी आणि सर्व प्राणी भयभीत झालेले असतात.

गणेशोत्सव जवळ येतो तसा या सर्व लोकांच्या अंगावर काटा येतो. कितीही निर्भय बनो म्हटलं तरी 'भय इथले संपत नाही.' त्यामुळे पुन्हा एकदा बुद्धीचे फेरवाटप करा, ही आग्रहाची विनंती आहे. घरोघर साजरा केला जाणारा गणेशोत्सव हा अत्यंत शांत आणि तुमच्यावरील आमच्या श्रद्धेला पूरक ठरणारा आहे. ते मोदक, तो नैवेद्य, ते पंचखाद्य, ती आरास, त्या आरत्या… हे सर्व आम्हाला तुमच्या चरणी लीन करून टाकतात. पण सार्वजनिक ठिकाणी साजरे होणारे गणेशोत्सव मात्र डीजेच्या तालावर आणि अचकट-विचकट गाण्यांच्या तालावर नाचणार्‍या तरुणाईचे असतात. हे तरुण लोक आज ना उद्या म्हातारे होतील तेव्हा निश्चितच यांना आपल्या तरुण काळात झालेल्या चुका आठवतील. पण तेव्हा वेळ गेलेली असेल.

तेव्हा त्यांची जागा यापेक्षाही मोठे ध्वनिप्रदूषण करणार्‍या नवीन तरुणाईने आणि अत्याधुनिक वाद्यांनीपण घेतलेली असेल. हे सर्व थांबवायचे असेल, तर तुम्हीच आता सक्रिय झाले पाहिजे. त्यामुळे पुन्हा एकदा तुम्हाला बुद्धीचे फेरवाटप करण्याची विनंती करत आहे. विषय धार्मिक असल्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखणारी पोलिस यंत्रणाही यावर काही उपाय काढू शकत नाही. कायदा सर्रास मोडला जात असलेले उघड्या डोळ्यांनी पाहणे जनतेच्या नशिबी आलेले असते. त्यामुळे हे गणराया, तुम्हीच काहीतरी यावर उपाय काढून गणेशोत्सव हा धांगडधिंगा करण्याचा, गदारोळ करण्याचा, ध्वनिप्रदूषण करण्याचा उत्सव न होता शांततेचा, भक्तिभावाचा आणि उत्सव प्रिय जनतेचा महोत्सव होईल यासाठी आशीर्वाद द्या!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news