लवंगी मिरची : अतिथी देवो भव!

लवंगी मिरची : अतिथी देवो भव!

Published on

अतिथी देवो भव, ही आपली फार जुनी आणि आकर्षक अशी परंपरा आहे. पाहुणे आले की आपण काही ना काही तरी गोडधोड करतोच. आता हेच बघ ना मित्रा, जगभरातील मोठ्या मोठ्या देशांचे सगळ्यात पावरफूल नेते आपल्या देशात जी-ट्वेंटी परिषदेसाठी येऊन गेले. आपण त्यांचा भरभरून सन्मान केला आणि खास भारतीय पद्धतीचे भोजन त्यांना खाऊ घातले. सर्व पाहुणे आपल्या आदर आणि आतिथ्याने आणि भोजनावर खूश होऊन पोटावर हात फिरवत आणि समाधानाची ढेकर देत आपापल्या देशांना निघून गेले. मला खात्री आहे की, ज्याने भारताचे जेवण जेवले तो कायम भारतीय जेवणाच्या प्रेमात पडतो.

करेक्ट बोलतो आहेस तू. आज जगभरात भारतीय हॉटेल्सला प्रचंड मागणी आहे. अगदी अमेरिका आणि इंग्लंड येथील लोकसुद्धा भारतीय जेवणाला चटावलेले आहेत. फक्त मला एक कळत नाही की, आपण जे रोज जेवण जेवतो, त्यात असे विशेष काय आहे की, ज्याची आवड जगभरात निर्माण व्हावी?

एक तर आपले जेवण अत्यंत रुचकर असते आणि दुसरे म्हणजे ते ताजे बनवले जाते. फ्रोजन फूड जगभरामध्ये खाल्ले जाते त्याला फारशी चव नसते, पण आपल्याकडे भारतीय लोकांना फ्रोजन फूडची आवड नाही. अगदी आपल्या साध्या भारतीय गृहिणीसुद्धा बाजारातून ताजी भाजी आणतात आणि ती पद्धतशीर चिरून भाज्या बनवतात. साहजिकच त्या भाजीला जी टेस्ट असते ती फ्रोजन फूडला येऊ शकत नाही. पण या जी-ट्वेंटी परिषदेमध्ये मला असे वाटते की, आपल्या कोल्हापूरचा तांबडा-पांढरा रस्सा ठेवला असता तर पाहुण्यांनी मुक्कामच वाढवला असता. परदेशी लोकांना फारसे मसालेदार जेवण जमत नाही आणि पचतही नाही. त्यामुळे आपला जहाल असा तांबडा-पांढरा रस्सा असता तर दोन शक्यता होत्या. पहिली म्हणजे हे जेवण खूपच आवडले म्हणून अजून एखादा दिवस ते थांबले असते आणि दुसरी शक्यता म्हणजे हे जेवण न पचल्यामुळे पोटात बिघाड झाल्यामुळे ते अजून एखादा दिवस थांबले असते. आपण भारतीय आणि आपले पोट या भारतीय जेवणाला सरावलेले आहे. अळणी जेवण भारतीय लोकांना आवडत नाही. त्यांना मसालेदार जेवण पाहिजे.
तू म्हणतोस ते बरोबर आहे. या परिषदेमध्ये चुलीवर भाजलेली गरमागरम बाजरीची भाकरी आणि आपल्याकडील कालवण त्यांना सर्व्ह केले असते आणि ते चुरून कसे खायचे हे सांगितले असते तर पाहुणे आणखी खूश झाले असते, असे मला वाटते.

ही परिषद महाराष्ट्रामध्ये झाली असती तर मराठवाड्यातील विशेषत: परभणी जिल्ह्यातील टाळकीची ज्वारी, पश्चिम महाराष्ट्रातील काळी ग्रेव्ही, विदर्भातील पाटवड्या आणि कोकणातील फणसाच्या गर्‍यांची भाजी असा काहीतरी मेनू असला असता. प्रेमाचा मार्ग पोटातून जातो असे म्हणतात, त्या अर्थाने या परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान मोदींनी अत्यंत रुचकर असे भारतीय जेवण खाऊ घालून देश-विदेशातील सर्वात शक्तिशाली व्यक्तींना खूश करून टाकले आहे. भारत महासत्ता होण्याच्या मार्गावरच आहेच; पण भोजनाच्या बाबतीत तो जगातील क्रमांक एकची महासत्ता झाला आहे, याविषयी आता माझ्या मनात काही शंका उरलेली नाही. यथावकाश आपण जगातील तिसरी महासत्ता होऊ, अंतराळ क्षेत्रामध्येही आपण महासत्ता होत आहोत. सामर्थ्यवान असे लष्कर आपल्याकडे आहे. जगभरातील देशांना मनुष्यबळ पुरवणारी बुद्धिमान जनता आहे. त्यामुळे भारताचे यश उज्ज्वल आणि निश्चित आहे.

तूर्त आपण भोजन उपक्रमामध्ये जगातील क्रमांक एकची महासत्ता झालो आहोत, याचा अभिमान वाटल्याशिवाय राहात नाही. भारतात विविध राज्यांची वेगवेगळी खाद्यसंस्कृती आहे. त्यामुळे त्यांची चवही निराळी आहे. त्याचा आस्वाद घेतल्याशिवाय त्याची रुची कळत नाही. त्यातही एखादा पाहुणा घरी आला तर मिष्टान्न जेवणाचा बेत ठरलेला असतो. भारतीय स्त्री सुगरण मानली जाते. त्यामुळे तिच्या हातचे जेवण खाल्ल्यानंतर कोणालाही ढेकर आल्याशिवाय राहणार नाही. जी-20 परिषदेच्या निमित्ताने परदेशी पाहुण्यांनी भारतीय जेवणाचा आस्वाद घेतल्यानंतर नक्कीच ढेकर दिली असणार आहे. या यानिमित्ताने समाधानाचे भाव त्यांच्या चेहर्‍यावर उमटून 'भारतीय जेवणाची लज्जतच न्यारी' हे शब्द त्यांच्या तोडून नक्कीच निघाले असणार याबाबत शंकाच नाही.

– झटका

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news