भैरूने बैलांचे दावे सोडले. बैल पाणी प्यायला विहिरीजवळच्या हौदावर गेले आणि आधाशासारखे पाणी प्यायला लागले. तोपर्यंत भैरू विहिरीजवळ लावलेल्या माळव्यात गेला. वांगे आणि मिरच्या आल्या होत्या. त्यातल्या काही त्याने तोडून घेतल्या आणि त्या घरी घेऊन जाण्यासाठी पिशवीत भरल्या. बैल शांततेने पाणी पीत होते. एवढ्यात भैरूला हसण्याचा आवाज आला. त्याने इकडे तिकडे पाहिले; पण त्याला कोणीच दिसले नाही. आपल्याला भास झाला असेल, असे समजून तो इतर कामे करायला लागला. एवढ्यात पुन्हा त्याला हसण्याचा आवाज आला.
भैरूने आवाजाच्या दिशेने पाहिले तो दोन्ही बैल एकमेकांशी शिंगे हलवत, हसत आणि खिंकाळत होते. बैल हसत आहेत, या घटनेने भैरू मनोमन हरकला. त्याने जाऊन मोत्याच्या पाठीवर थाप मारली आणि पवळ्याच्या मानेवर एक टपली मारली. तेवढ्यात मोत्या बोलायला लागला,
मालक, एक विषय बोलायचा होता. तुमची परमिशन असेल तर बोलतो.
आपले बैल बोलत आहेत हे पाहून भैरूला आश्चर्याचा धक्काच बसला. जगातले पहिले बोलणारे बैल आपल्या घरी आले आहेत म्हणजे आता आपले नाव सर्वत्र होणार, आपल्या मुलाखती घ्यायला मीडिया येणार असे सर्व चित्र त्याच्या डोळ्यांसमोर उभे राहिले; पण बैल काय म्हणतात, हे आधी ऐकून घेऊ, असा विचार करून तो म्हणाला,
हां बोल मोत्या, काय बोलायचे आहे?
मोत्या म्हणाला, मालक, तुमची आणि आमची कंडिशन एकसारखीच आहे. तुम्ही म्हणजे आपल्या गावातले शेतीवाडी सांभाळून राजकारण करणारे मोठे कार्यकर्ते आहात. तसंच शेतामध्ये तुम्ही सांगितलेले काम करणारे आम्ही दोघे तुमचे कार्यकर्ते आहोत. जसा आम्हाला स्वतःच्या मनाने काम करायचा अधिकार नाही तसाच राजकारणामध्ये तुम्हाला
स्वतःच्या मनाने काही करायचा अधिकार नाही. मालक, शेतामध्ये तुम्ही आमचे नेते आहात आणि तिकडे राजकारणामध्ये तुमचे वेगळे नेते आहेत. नेता म्हणेल त्याप्रमाणे कार्यकर्त्याला वागावे लागते. त्याला स्वतःचे डोके वापरता येत नाही. त्याच्यामुळे मी म्हटलं की, तुमची आणि आमची कंडीशन सारखीच आहे. म्हणून आम्ही दोघे हसत होतो.
ये मोत्या, मला काय बैल समजतो का काय? आसूड उडवीन पाठीवर तेव्हा कळंल!
पवळ्या बोलला, मालक, आज बोलू द्या. आता बघा राजकारणामध्ये मुंबईमध्ये फाटाफूट झाली. तुमचे नेते काही इकडे गेले, काही तिकडे गेले. तुम्हाला काही चॉईस होता का? नव्हता का नाही?. तसं आम्हाला पण काही चॉईस नाही. बाजूच्या रामभाऊच्या शेतामध्ये हिरवीगार लसूणघास लावलेली दिसते, तिकडे काम पण जास्त नाही. आम्हाला कधी कधी वाटते की, तुमचं काम सोडून रामभाऊकडे काम धरावे; पण धरता येते का? तसंच तुमचं पण आहे. तुम्हाला पण खूप वाटते की, गावाचा विकास व्हावा! जो पक्ष विकास करेल त्याच्याबरोबर जावे; पण जाता येते का? नाही जाता येत. त्याच्यामुळे आम्ही म्हणतो की, तुमची-आमची कंडीशन सारखीच आहे. उद्यापासून उगाच आसुडाने मारायची भाषा सोडून द्या आणि आपल्या शेतात दोन एकर लसूणघास लावा. नाहीतर एखाद्या दिवशी रातोरात आम्ही रामभाऊकडे कामाला जाऊ. तुम्ही पण राजकारणामध्ये लसूणघास कुठे दिसते ते बघा आणि तिकडे जा. उगा हेलपाटे मारून जिंदगी बरबाद करू नका!