लवंगी मिरची : नवे आभासी जग..!

लवंगी मिरची : नवे आभासी जग..!
Published on
Updated on

आजकाल आपण पाहतो की, एखादा मुलगा व्हिडीओ गेम खेळत असतो, त्याची जेवणाची वेळ झाली की, आई त्याला खूप आवाज देते; पण तो प्रतिसाद देत नाही. याचं कारण हातातील गेम खाली ठेवून जेवायला जावे याचे त्याचे भान विसरलेले असते. रमी खेळण्याचे व्यसन, पत्ते खेळण्याचे व्यसन, जुगार खेळण्याचे व्यसन यामध्ये कुठल्याही पदार्थाचे सेवन केले जात नाही; परंतु व्यसन लागते, हे नक्की! सध्या तुमच्या आमच्या आयुष्याला व्यापून उरलेल्या व्हॉटस्अ‍ॅपचे पण व्यसन खूप लोकांना असते. रात्री झोपताना देवाचे नाव घेऊन झोपायची प्रथा होती. त्याऐवजी साधारण बारा वाजता रात्री शेवटचे व्हॉटस्अ‍ॅप करून किंवा पाहून लोक झोपी जातात.

पहाटे पाच वाजता जागे होताच 'कराग्रे वसते लक्ष्मी, करमध्ये सरस्वती' अशी आपल्याच हाताचे तळवे पाहून दिवसाची सुरुवात करण्याची भारताची संस्कृती आहे. त्याऐवजी सकाळी जाग येताच व्हॉटस् अ‍ॅपवर काय आलेले आहे, हे पाहिले जाते. हे व्यसन नाही तर काय आहे? कुठल्याही व्यसनी माणसाला जेव्हा तो त्या व्यसनाचा आनंद घेत असेल तेव्हा कुठलाही अडथळा आणलेला जमत नाही. तो रागावतो, चिडतो आणि क्वचित हिंसक होतो. त्यामुळे विविध प्रकारच्या अशा बातम्या जशा की, 'पब्जी गेममध्ये पराभव झाल्याने युवकाची आत्महत्या' किंवा '14 वर्षांच्या मुलाने व्हिडीओ खेळ देत नाही म्हणून आईची केली हत्या' अशा बातम्या यायला लागतात.

लहान मूल झोपावे म्हणून पूर्वी त्यांच्या आया अंगाई गीत गाऊन त्यांना झोपी घालत असत. त्याऐवजी त्याला स्लीपिंग म्युझिक किंवा 'लिंबोणीच्या झाडामागे चंद्र झोपला गं बाई' ही गाणी मोबाईलवर लावून झोपी घालतात. इथूनच या बाळाची आभासी जगामध्ये वावरण्याची सुरुवात होते. तंत्रज्ञानाने वातावरण निर्मिती करून संवेदना जागृत केलेली असते. उदाहरण घ्यायचे तर कँडी क्रश नावाचा व्हिडीओ खेळ आहे. यात जसे आपण खेळायला सुरुवात करतो तसे तुम्हाला एक आभासी आव्हान दिले जाते आणि ते आव्हान आपण पूर्ण करणार या जिद्दीने लोक स्कोअर वाढवत जातात आणि यादरम्यान त्यांना काही अडथळा आला, तर ते हिंसक होतात.

'जंगली रमी पे आओ ना महाराज' ही जाहिरात तुम्ही पाहिली असेल. ऑनलाईन रमी खेळून पैसे जिंका अशा प्रकारच्या त्या जाहिराती असतात. एका पोलीस उपनिरीक्षकाला क्रिकेट गेमिंग ऑनलाईन मध्ये दीड कोटी रुपये मिळाले. या आनंदात त्या पोलिसाने वर्दीवरच मुलाखत दिली. दुसर्‍या दिवशी त्या पोलिसाचे निलंबन झाले. पोलिस निरीक्षकासारखे जबाबदार लोक ऑनलाईन गेमच्या आहारी जात असतील, तर इतरांची काय स्थिती असेल, याचा विचार करता येईल.

नुकतेच छत्तीसगडमध्ये महादेव अ‍ॅप या नवीन सट्टा अ‍ॅपची चर्चा झाली. सौरभ चंद्रकार नावाच्या एका तरुण मुलाच्या लग्नाची बातमी होती. सौरभने आपल्या लग्नात सुमारे दोनशे कोटी रुपये खर्च केले. बॉबी देवल, रणबीर कपूरसारख्या बॉलीवूड कलाकारांनी त्याच्या लग्नाला हजेरी लावल्याचं म्हटलं गेलं आणि मग विषय असा आला की, सौरभकडे इतका पैसा आला कुठून? सर्व चौकशी केल्यानंतर लक्षात आले की, त्याने महादेव सट्टा अ‍ॅप नावाचे एक अ‍ॅप तयार केलं. त्या अ‍ॅपवर शंभर रुपयांपासून एक कोटी रुपयांपर्यंत पैसा लावता येत होता. सौरभची चौकशी करेपर्यंत तो आपल्या कुटुंबीयांना घेऊन देशाबाहेर निघून गेला होता. अशाच प्रकारची व्यसने फेसबूक, डेटिंग अ‍ॅप, व्हिडीओ गेमिंग अ‍ॅप यांची असतात. ही आभासी वास्तवता थेट आपल्या घरापर्यंत येऊन पोहोचली आहे. या धोक्याची जाणीव ठेवून आपल्याला वागले पाहिजे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news