लवंगी मिरची : खरेदी दिवाळीची

लवंगी मिरची : खरेदी दिवाळीची
Published on
Updated on

झाली खरेदी दिवाळीची? नाही ना? काय म्हणताय? काय खरेदी करायची? अहो सोप्पं आहे. आधी जाऊन नवीन मायक्रोवेव्ह आणा. त्याच्यावर 20 टक्के डिस्काऊंट आहे. काय म्हणताय? पैसे नाहीत? अहो मग हप्ते कशासाठी आहेत? चार-पाच हजार रुपये महिन्याकाठी कुठं जात नाहीत? थोडी सुपारी कमी खावी, एखादा कप चहा कमी प्यावा, आठवड्यात एकदा लंघन, महिन्यात एखादा कडक उपवास. सुटले पाच हजार रुपये. असे केवळ सोळा महिने काढायचे, बस! नंतर काय सुख आहे महाराजा? रोज गरमागरम स्वयंपाक, गरम पोळ्या, गरम वरण, गरम भाज्या, बिना तेलाचे गुजराती ढोकळे, गरम चहा. थोडक्यात म्हणजे गृहस्वामिनी सोडून सगळे गरम.

शिवाय आल्यागेल्या ण्यिासाठी तिला सतत काहीतरी नवीन लागत असते. तोच नवरा, तीच हुशार मुले, तेच घर, तिच कुंड्यांतील झाडे. किती दिवस दाखविणार? तुम्हीच सांगा. आता कसे अगदी छान झाले. एखादी शिष्ट मैत्रीण आली की, ती म्हणू शकते, घ्या हो सुमनताई, गरम पापड घ्या. आमच्या नवीन मायक्रोवेव्हमधले आहेत. घे गं शलाका, गरमागरम आइस्क्रीम घे. आमच्या नवीन मायक्रोवेव्हमधलं आहे.

थंड झालेलं वरण, गार पडलेली कढी, काल फ्रीजमध्ये ठेवलेल्या चपात्या सगळं काही, काही सेकंदांत गरम करता येईल. काय म्हणताय, मायक्रोव्हेव्ह नको! लाईट बिल जास्त येईल. अहो, येऊ द्या. त्यासाठी आणखी एखादे लंघन, एखादा कडक उपवास. त्यापेक्षा कपडे घ्यायचेत मुलांचे? अहो, परवाच तर झाले ना, दसर्‍याला. दसरा दिवाळीत अंतरच किती? जेमतेम वीस दिवसांचे. शिवाय या महिन्यात पगार अठरा तारखेला आहेत. तुम्हाला नाही आनंद झाला, खिशात पैसे खेळणार म्हणून? हो, पण पुढे काय? उरलेला दीड महिना कसा काढायचा ,हा प्रश्न उरतोय? काढायचा आपला कसाबसा.

आजच्या हौसेला काय कमी मोल असते? माणसाच्या आयुष्यात दिवाळ्याच किती? जेमतेम साठ-पासष्ट. त्यातील ही दिवाळी वाया घालवायची? लाखो रुपये खर्चून आपल्या उत्पादनाची जाहिरात करणार्‍या कारखानदारांची तरी कीव करा. त्यांच्या पोटावर कशासाठी पाय देताय? काळजी करू नका. आहेत ना खिशात तर खर्चून टाका. लक्ष्मी येणारच आहे ना घरी? काय म्हणताय? तुमच्याकडे धुणीभांडी करणार्‍या मोलकरणीचे नाव लक्ष्मी आहे? मग तर ती रोज येत असते आणि जात असते. आपण असे खर्च करताना उगाच का हात आखडायचा? चला, उठा तर मग पेपरातल्या जाहिराती पुन्हा पुन्हा वाचायला.

दिवाळी साजरी करणे आणि दिवाळे निघणे याचा शाब्दिक संबंध जरूर असावा, असे वाटते. दिवाळी साजरी करताना सर्वसामान्य माणसाचे दिवाळे निघत असते. दिवाळी या शब्दावरूनच दिवाळे या शब्दाची व्युत्पत्ती झाली असावी. दिवाळीचा किराणा जवळपास दुप्पट भरावा लागतो. संमिश्र किराणा सामानांमधून लाडू, करंज्या, अनारसे, चकल्या, चिरोटे, पुर्‍या इत्यादी पदार्थांची निर्मिती होत असते. या काळात मधुमेही मंडळीसुद्धा डॉक्टरी सल्ला झुगारून जिभेचे चोचले पुरवून घेत असतात. रक्तदाबाचा विकार असणारे कोलेस्ट्रॉलची काळजी करीत नाहीत. ठणठणीत प्रकृती असणारे लोक, खाणे आणि पचवणे या दोन गोष्टींवर भर देणारी मंडळी या चार दिवसांत पावसाळ्यात मोराला आनंद व्हावा तशी आनंदी दिसतात. महिला वर्गासाठीसुद्धा दिवाळी आनंद घेऊन येते. सारे घर तृप्त तर गृहिणी समाधानी, हे संस्कृतीचे तत्त्व यांच्या सुखाचे रहस्य असते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news