तडका : धन्य त्या मालिका..!

तडका : धन्य त्या मालिका..!

मालिका पाहून किंवा त्या मालिकेमधील कशात तरी गुंतून पडून रस घ्यावा, याचा प्रामाणिक निष्फळ प्रयत्न पुरुष करत असतात. एका मालिकेमध्ये हिरोईनचे कार चालवायला शिकणे सुरू होते, महिनाभरानंतर एकदा थांबून अपडेट घेतले, तेव्हा तिचे कार चालवायला शिकणे चालूच होते. आणखी एका मालिकेतील खुनशी सूनबाई सासूविरुद्ध (अर्थात तिच्याच) सतत काहीतरी कारस्थान रचण्यात मग्न असे. असाच एकदा मी घरातील नेहमीच्या यशस्वी रसिकांबरोबर 'ती' मालिका पहात होतो. डाव्या बाजूला आई आणि उजव्या बाजूला पत्नी अशी आमची सेटिंग होती. वडिलांचा अमृतमहोत्सव तीन वर्षांपूर्वीच झालेला असल्यामुळे सर्व समजदार मराठी ज्येष्ठ नागरिकांप्रमाणे ते संत पदाला पोहोचलेले आहेत आणि समोर धक्कादायक दृश्य आले.

घरातील वरच्या जिन्यावर सासूबाई उभ्या होत्या आणि हळूच आवाज न करता 'त्यांच्या' सूनबाई आल्या आणि पाठमोर्‍या सासूबाईंना त्यांनी मागून धक्का दिला. सासूबाई 'मेले, मेले' म्हणत जिन्यावरून गडगडत खाली येऊ लागल्या आणि शेवटच्या पायरीवर येऊन निश्चेष्ट म्हणजे सोप्या भाषेत निपचित पडल्या. आजकाल अवघड शब्द सोप्या भाषेत सांगावे लागतात. तरुण वाचकांनी 'अलमोस्ट कोमामध्ये गेल्या,' असे वाचावे. पडल्या. पाठोपाठ अ‍ॅम्ब्युलन्स आली आणि त्यांना घेऊन गेली. माझ्या आईने भयभीत होऊन हळूच माझ्याकडे पाहिले. मी तिला हळू आवाजात धीर दिला, 'अगं असे काही होईल याची शक्यता लक्षात घेऊन आपण वर जिनाच बांधलेला नाही, तू काळजी करू नकोस.' साहित्याचा राज्य पुरस्कार मिळाला तेव्हा वाटला नाही इतका अभिमान माऊलीला त्या दिवशी इतकी दूरदृष्टी असणार्‍या लेकाचा वाटला.

बहुतांश मालिका या मध्यमवर्गीय घरातील महिला वर्ग डोळ्यासमोर ठेवून लिहिल्या आणि तयार केल्या जातात. आपली जी संस्कृती नाही, ती दाखविण्याचा आणि थोपविण्याचा प्रयत्न या मालिकांमधून केला जातो. एखाद्या घरातील पती परस्त्रीबरोबर लफड्यात गुंतवला, की तमाम प्रेक्षक भगिनीवर्गाची सहानुभूती त्याच्या अधिकृत पत्नीच्या पाठीशी उभी राहते आणि पत्नी कशी त्या 'बाहेरवाली'वर मात करते, हे पाहण्यात एखादे वर्ष सहज निघून जाते. पुरुष प्रेक्षक हे बहुतांश वेळा उदारमतवादी असतात. असेल एखाद्या भाग्यवान पुरुषाचे बाहेर प्रकरण, तर त्यात इतका गहजब करण्यासारखे काय आहे, असे त्यांना वाटत असते. अशा मालिकांमध्ये मग भावनिक चढ-उताराचे प्रसंग रंगविले जातात. बाहेरची फटाकडी थोडीशी 'बोल्ड' दाखविली जाते आणि रीतीप्रमाणे गृहिणी ही 'कोल्ड' दाखविली जाते. मग तिची एखादी मैत्रीण तिला आधुनिक पोशाख वापरून आकर्षक होण्याचा सल्ला देते. मालिकेचा शेवट जवळ येतो तसे पती पुन्हा आपल्या पत्नीकडे वळतो आणि शेवट गोड होतो. सौभाग्याचा विजय झाल्यामुळे प्रेक्षक महिला पण नि:श्वास सोडतात. सगळे कसे छान आहे. पती, पत्नी, सासू, जाऊबाई, दीर, मुले सुना, जावई हे सगळेच अगदी पापभिरू आणि आदर्श असतील, तर मालिका पुढे सरकणार नाही.

– कलंदर

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news