नापाक कारवाया रोखा

नापाक कारवाया रोखा
Published on
Updated on

भाजपप्रणीत राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारचे नवे पर्व सुरू होत असतानाच, पाकिस्तानने मात्र त्यास अपशकुन करण्याचा प्रयत्न केला. सर्व शेजारी देशांशी सलोख्याचे संबंध प्रस्थापित करण्याचे भारत सरकारचे धोरण असले, तरीही पाकिस्तानला मात्र भारताविरुद्ध सतत कटकारस्थाने रचणे आणि दहशतवादी हल्ले करणे, यातच रस असावा, असे दिसते. जम्मू-काश्मिरातील रियासी जिल्ह्यात पाकिस्तानी दहशतवाद्यांनी वैष्णोदेवी यात्रेकरूंच्या बसवर निर्दयपणे गोळीबार केला. या हल्ल्यामुळे बस दरीत कोसळून नऊजण ठार झाले. धार्मिक यात्रेसाठी जाणार्‍या निरपराध नागरिकांना गोळीबाराचे असे लक्ष्य करणे, हा नीचपणाचा कळस आहे.

पौनी भागाजवळ गावाजवळ हा हल्ला झाला. अलीकडील काळात जम्मूमधील राजुरी आणि पुंछ जिल्ह्यांत दहशतवादी घटनांमध्ये वाढ झाली. पौनीच्या घटनेतील मृतांत एका दोन वर्षीय बालकाचाही समावेश असून, हे दहशतवादी किती उलट्या काळजाचे असतात, हेच यावरून दिसून येते. विशेष म्हणजे, या बसचा पाठलाग दहशतवादी एका गाडीत बसून करत होते, हे सीसीटीव्ही कॅमेर्‍याने टिपले आहे. दहशतवादी लष्कर-ए-तोयबाशी संबंधित असल्याचा संशय होता तो खरा ठरला. हल्ल्याची जबाबदारी संघटनेने स्वीकारली. संघटनेचा भाग असलेल्या 'द रेझिस्टन्स फ्रंट'ने हल्ल्याची यापूर्वी जबाबदारी घेतली होती; परंतु नंतर त्यांनी हा दावा मागे घेतला. आता लष्कर, पोलिस आणि केंद्रीय राखीव पोलिस दल या सुरक्षा दलांनी संयुक्तपणे तीरथ, पौनी आणि शिवखोरी या भागांची बहुस्तरीय नाकाबंदी केली आहे.

कोणत्याही परिस्थितीत हे दहशतवादी पकडले गेलेच पाहिजेत. त्यातून त्यांच्या भारतविरोधी संभाव्य कारस्थानांची माहिती मिळू शकेल. पंतप्रधानपदाची सूत्रे घेतल्यानंतर शाहबाझ शरीफ यांनी भारताशी मैत्रीचे संबंध वाढवण्याची भावना व्यक्त केली होती; परंतु प्रत्यक्षात त्या देशाचा व्यवहार कायम द्वेषाचाच राहिला. आठवड्यापूर्वी पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत दोन दहशतवादी ठार झाले. मागच्या महिन्यात इसिस किंवा 'इस्लामिक स्टेट'च्या चार दहशतवाद्यांना अहमदाबाद विमानतळावरून ताब्यात घेण्यात आले. ते कोलंबोहून चेन्नई आणि मग चेन्नईतून अहमदाबादला आले होते. त्यांचे हँडलर भारतात त्यांना मार्गदर्शन करत होते.

ऐन निवडणुकीत ते भारतात घुसले. इसिस ही संघटना गेल्या काही वर्षांपासून भारतात हातपाय पसरण्याचा प्रयत्न करत आहे; मात्र भारतीय गुप्तचर यंत्रणा आणि संरक्षण विभागाने त्यांना अद्याप यशस्वी होऊ दिलेले नाही. मार्चमध्ये बांगला देश-भारत सीमा ओलांडून इसिसचा कमांडर भारतात घुसला; परंतु त्याला बेड्या ठोकल्या गेल्या. मे महिन्यात जम्मू-काश्मीरच्या पुंछ जिल्ह्यात भारतीय हवाई दलाच्या ताफ्यावर हल्ला झाला. पुंछमध्ये सहाव्या टप्प्यात 25 मे रोजी मतदान होणार होते. त्या अगोदरच तिथे दहशतवादी हल्ले करून अस्थिरता निर्माण करण्याचा पाकिस्तानचा डाव असावा. जम्मू-काश्मीरमध्ये लोकसभेच्या निवडणुका शांततापूर्ण पद्धतीने झाल्या. लोकांनी मोठ्या प्रमाणात मतदान केल्यामुळे पाकिस्तानचे माथे फिरले असावे.

जम्मू-काश्मीरला विशेषाधिकार देणारे कलम 370 हटवल्यानंतर पाकिस्तानने अनेक स्तरांवर भारतविरोधी प्रचार केला; परंतु प्रत्येक ठिकाणी त्यांना तोंडावरच पडावे लागले. त्यानंतर पाकिस्तानने संयुक्त राष्ट्रांची संस्था 'युनेस्को'मध्ये अयोध्येतील रामजन्मभूमीच्या निकालाचा प्रश्न उपस्थित केला. वास्तविक अयोध्येच्या प्रश्नाशी पाकिस्तानचा काय संबंध? शिवाय जम्मू-काश्मिरात काय करायचे, हा भारताचा अंतर्गत प्रश्न आहे.

त्यामध्ये तोंड खुपसण्याचे त्यांना कारण नाही; परंतु तेव्हा पाकिस्तानच्या डीएनएमध्येच दहशतवाद असल्याचे म्हणत, भारताने पाकिस्तानवर युनेस्कोमध्ये थेट हल्लाबोल करताना पाकिस्तानने भारताच्या अंतर्गत मुद्द्यांमध्ये हस्तक्षेप करू नये, असेही सुनावले. दि. 26 नोव्हेंबर 2008 रोजी पाकिस्तानातून समुद्रमार्गे आलेल्या 10 दहशतवाद्यांनी मुंबईत रक्तपात घडवला. त्यामुळे केवळ भारताचाच नाही, तर जगाचा थरकाप उडाला होता. त्यापूर्वी 2001 मध्ये संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना लष्कर-ए-तोयबा व जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांनी संसदेवर हल्ला केला. त्यात नऊजणांचा मृत्यू झाला. त्यावेळी पाच दहशतवाद्यांना कंठस्थान घातले होते.

2006 मध्ये 11 जुलै रोजी मुंबईत इंडियन मुजाहिद्दीनच्या दहशतवाद्यांनी वेगवेगळ्या लोकल रेल्वे गाड्यांत सात बॉम्बस्फोट घडवले. त्यात 210 लोक मरण पावले. या हल्ल्यांच्या आठवणी मुंबईकर अद्याप विसरलेले नाहीत. 2006 मध्ये दहशतवाद्यांनी मालेगावमध्ये जे बॉम्बस्फोट घडवले, त्यात 32 लोक मरण पावले. रमजानची नमाज अदा करण्यासाठी लोक जात असतानाच हा हल्ला झाला होता. 2008 मध्ये पिंक सिटी जयपूरमध्ये साखळी बॉम्बस्फोटांत 80 लोकांचा मृत्यू झाला. याच घटनेतील तीन दहशतवादी देशातील अनेक बॉम्बस्फोटांत सहभागी असल्याचे नंतर समोर आले. 2008 मध्ये अहमदाबादमध्ये साखळी बॉम्बस्फोट आणि त्याच वर्षी गुवाहाटीमध्ये अशाच प्रकारे बॉम्बस्फोटांची मालिका घडवली गेली.

सहा वर्षांपूर्वी काश्मीर खोर्‍यातील पंपौरमध्ये अतिरेक्यांनी सीआरपीएफच्या तुकडीवर हल्ला केला. त्यानंतर पुलवामात 40 जवान शहीद झाले. या हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानवर सर्जिकल स्ट्राईक केला. पुन्हा-पुन्हा पेकाट मोडूनही पाकिस्तानला अक्कल येत नाही, असे दिसते. काश्मीरमधील दहशतवादी कारवायांना पायबंद घालण्यात यश आले असले, तरी त्या पूर्णपणे थांबवता आलेल्या नाहीत. काश्मीर खोर्‍यात हळूहळू लोकशाही व्यवस्था रुळावर येते आहे.

बंदुकीचे खरे उत्तर तेच आहे. वास्तविक आज पाकिस्तानच्या अर्थव्यवस्थेची धूळदाण झाली असून, देश कधीच कर्जबाजारी झाला आहे. लोक भुकेकंगाल आहेत. सरकार दुबळे बनले आहे. त्यातच देशात ठिकठिकाणी दहशतवाद्यांनी उच्छाद मांडला आहे. तरीही आज पाक लष्कर आणि आयएसआय भारतविरोधी कृत्यांना उत्तेजन देतच आहेत; परंतु ज्या दहशतवाद्यांना पाक सरकार पोसत आहे, तेच त्यांचा देश आतून पोखरून टाकत आहेत. तरीही त्या देशाला शहाणपण येत नसेल तर? पुन्हा एकदा आपल्यावर सर्जिकल स्ट्राईक व्हावा, अशी त्या देशाची इच्छा आहे का? या प्रश्नांची उत्तरे पाकिस्तानच्या राज्यकर्त्यांनी वेळीच शोधलेली बरे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news