समाजसेवक अण्णा हजारे यांच्या नेतृत्वाखाली 2011 मध्ये दिल्लीत रामलीला मैदानावर 'इंडिया अगेन्स्ट करप्शन' या बॅनरखाली आंदोलन सुरू झाले आणि देशभर काँग्रेसच्या नेतृत्वाखालील संयुक्त पुरोगामी आघाडी सरकारविरोधातील असंतोष प्रकट होऊ लागला. दिल्लीतील हे आंदोलन गावागावांत पोहोचले. आपली सर्व व्यवस्था सडलेली असून, ती बदलायला हवी. संसदेतील बहुसंख्य खासदार हे गुंड किंवा गुन्हेगार आहेत. बहुसंख्य राजकारणी बदमाश आहेत, अशा प्रकारचे आरोप करत, या आंदोलनाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी नेतृत्व प्रस्थापित केले. वास्तविक आम्हाला व्यवस्थात्मक परिवर्तन हवे आहे, राजकारणात प्रवेश करायचा नाही, ही या आंदोलनाची मूळ भूमिका होती. अण्णांनी ती कायम ठेवली; परंतु केजरीवाल यांनी अण्णांनाच बाजूला केले आणि 'आम आदमी पक्षा'ची (आप) स्थापना केली.
त्यावेळचे कुमार विश्वास, प्रशांत भूषण, योगेंद्र यादव असे त्यांचे अनेक सहकारी त्यांना लवकरच सोडून गेले. काँग्रेसनेच भ्रष्टाचार वाढवला, अशी भूमिका घेणार्या केजरीवाल यांनी त्यानंतर काँग्रेसशीच तडजोड केली. 2014 मध्ये केजरीवाल यांना पंतप्रधानपदाची स्वप्ने पडत होती आणि म्हणून ते नरेंद्र मोदी यांच्या विरोधात वाराणसीमधून उभे राहिले; मात्र त्यांचा दारुण पराभव झाला. त्यानंतर दिल्ली व पंजाबमध्ये मिळालेल्या यशामुळे केजरीवाल यांचा अतिआत्मविश्वास वाढला आणि गोवा व अन्य काही राज्यांत त्यांनी उमेदवार उभे केले. तेथेही त्यांना फटका बसला. आता केजरीवाल यांचा आप हा पक्ष इंडिया आघाडीत सामील झाला आहे.
मनमोहन सिंग सरकारवर भ्रष्टाचाराचा आरोप करणार्या 'आप'लाच आता भ्रष्टाचाराच्या आरोपांना तोंड द्यावे लागत असून, त्यांचे दोन मंत्री तुरुंगात आहेत. खासदार संजय सिंग यांची तुरुंगातून सुटका झाली असली, तरी केजरीवाल हे जामिनावर बाहेर आले आहेत. शुक्रवारी त्यांनी मुंबईत मोदी सरकारवर तुफानी हल्ला चढवला. मागे मणिपूरमध्ये महिलांची काढलेली विवस्त्र धिंड, महिला कुस्तीगिरांवरील अत्याचार यावरून त्यांनी केंद्र सरकारवर सातत्याने तोंडसुख घेतले होते; पण आता केजरीवाल यांच्या निवासस्थानीच त्यांचे खासगी सचिव विभवकुमार यांनी 'आप'च्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांच्यासोबत गैरवर्तन करून त्यांना मारहाण केल्याची घटना घडली आहे. 'विभवकुमारने मला सात ते आठवेळा लाथा आणि झापडा मारल्या.
मासिक पाळी सुरू असून, वेदना होत असल्याचे सांगूनही त्याने मारहाण करण्याचे थांबवले नाही. मला शिवीगाळही केली. शारीरिक हल्ल्यामुळे चालतानाही त्रास होत आहे आणि ही घटना घडत असताना कोणी मदतीलाही आले नाही,' अशी तक्रार स्वाती यांनी पोलिसांकडे केली आहे. मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी एका स्त्रीवर गंभीर हल्ला होऊनही केजरीवाल यांनी याबाबत 'ब्र'देखील काढलेला नाही. मुळात दिल्ली मद्य घोटाळ्याशी संबंधित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने विशेष न्यायालयात केजरीवाल यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल केले आहे. यामुळे पदावर असताना आर्थिक भ्रष्टाचार प्रकरणात आरोपपत्र दाखल झालेले केजरीवाल हे पहिले मुख्यमंत्री ठरले आहेत. त्यापूर्वी केजरीवाल यांच्या कार्यालयात मुख्य सचिवांनाच बदडले होते.
आता मुख्यमंत्र्यांच्याच घरी त्यांच्याच पक्षाच्या खासदारावर हात चालवला जातो, ही गंभीर बाब आहे. वास्तविक या घटनेची तातडीने स्वतःहून चौकशी करण्याऐवजी 'आप'ने सारवासारव करण्याचा प्रयत्न केला आहे. स्वाती या भेटीची वेळ न घेताच मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी पोहोचल्या. केजरीवाल कार्यमग्न असल्याचे सांगूनही स्वाती यांनी गोंधळ घालून आत घुसण्याचा प्रयत्न केला, असे 'आप'च्या मंत्री आतिशी यांनी म्हटले आहे. आतिशी यांनी एक व्हिडीओ क्लिप समोर आणली असून, प्रत्यक्ष केलेल्या आरोपांच्या विपरीत असे वास्तव त्यातून पुढे येत असल्याचा दावा केला आहे; मात्र स्वाती यांनी 'आप'मध्ये आलेले नेते माझ्यासारख्या जुन्या कार्यकर्त्यांना भाजपचे एजंट ठरवत असल्याबद्दल दुःख व्यक्त केले आहे. स्वाती जे म्हणत आहेत, त्यात जरूर तथ्य आहे; कारण दोन दिवसांपूर्वी 'आप'ने ही घटना घडली असल्याचे सत्य पत्रकार परिषदेत स्वीकारले होते.
वास्तविक आतिशी याही एक महिला असून, त्यांनी पक्षाचे हितसंबंध बाजूला ठेवून खंबीर भूमिका घेणे आवश्यक होते; परंतु आपल्याकडे बहुसंख्य राजकीय पक्षांतील महिला नेत्या या अन्य पक्षाच्या नेत्याने एखाद्या स्त्रीवर अन्याय-अत्याचार केल्यास आवाज उठवतात; मात्र त्या स्वपक्षात अशी काही घटना घडल्यास मौन बाळगतात किंवा पक्षातील ज्या नेत्यावर वा अन्य व्यक्तीवर आरोप झाले आहेत, त्याचे समर्थन तरी करत बसतात. आता मालिवाल मारहाण प्रकरणात केजरीवाल यांनी माफी मागावी, अशी मागणी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केली आहे. या संदर्भात दिल्ली पोलिसांनी प्रथमदर्शनी गुन्हा दाखल केला असून, त्यात स्वाती यांच्या छाती, पोटावर लाथा मारल्याचा उल्लेख आहे. एवढेच नव्हे, तर त्यांना ठार मारण्याचीही धमकी दिल्याची नोंद केली आहे.
आता या प्रकरणात केजरीवाल यांना अडकवण्याचे भाजपचे कारस्थान असल्याचा आरोप आतिशी यांनी केला आहे. ही घटनाच घडली नाही, असे आतिशी यांचे म्हणणे आहे का? या घटनेचे गांभीर्य त्यांना वाटत नाही का? स्वाती यांनी मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी येऊन त्यांच्या भेटीसाठी आरडाओरडा केला, हे जर खरे मानले, तरी त्यामागे तसेच कारणही असू शकते. शिवाय गोंधळ घातला म्हणून लाथाबुक्क्यांनी मारण्याचे समर्थन कसे काय होऊ शकते? पुन्हा ज्याने मारहाण केली, तो सुरक्षारक्षकही नव्हता. विभवकुमारने पोलिसांना का नाही बोलावले? एका खासदाराशीच या प्रकारचे वर्तन केले जात असेल, तर सर्वसामान्य नागरिकाला कोणत्या प्रकारची वागणूक मिळत असेल, याचा अंदाज बांधता येईल. एकूण, नैतिकतेचा अहंकार असलेल्या एका पक्षाचे झपाट्याने अधःपतन होत असल्याचेच हे निदर्शक आहे.