तडाका : निवडणूक पैजा

तडाका : निवडणूक पैजा

निवडणुका रंगात आलेल्या आहेत. एकेक टप्प्याचे मतदान पार पडून शेवटच्या टप्प्याचे अर्ज भरणे सुरू आहे. भारतीय माणसाला आणि विशेषत: मराठी लोकांना राजकारणाचे एवढे वेड आहे की, मतदान होऊन 15 दिवस उलटून गेले तरी अजून त्याची चर्चा मतदारसंघांत सुरूच आहे. खेड्यांमध्ये पारापारांवर आणि शहरांमध्ये कट्ट्यांवर कोण निवडून येईल, याची चर्चा सुरू आहे. दावे-प्रतिदावे केले जात आहेत आणि चक्क पैजा पण लागत आहेत. चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत कोल्हापूर, सांगली, सातारा या समृद्ध भागांत कोण निवडून येईल, याविषयी पन्नास हजार ते एक लाखाच्या पैजा लागल्या तर समजू शकते, कारण बागायतदार शेतकरी असल्यामुळे तो बर्‍यापैकी धनसंपत्ती बाळगून असतो; पण मराठवाड्यासारख्या तुलनेने दुष्काळग्रस्त असणार्‍या आणि 70 टक्के कोरडवाहू असलेल्या भागात पैजा लागणे म्हणजे आश्चर्याची गोष्ट आहे.

या पैजा कशासाठी लागत आहेत, तर दोनपैकी कोणता उमेदवार निवडून येईल? बहुतांश ठिकाणी तिसरे, चौथे पण उमेदवार निवडणुकीला उभे आहेत; परंतु ते निवडून येण्याची शक्यता नाही. ते केवळ कोणाची आणि किती मते खातील, यावरही पैजा लागत आहेत. परळी मतदारसंघामध्ये मुंडे भगिनी विरुद्ध पारंपरिक उमेदवार अशी लढत झाली. परभणी मतदारसंघामध्ये विद्यमान खासदार विरुद्ध राष्ट्रीय समाज पक्षाचे जानकर यांची लढत झाली. अर्थात, या लढती अटीतटीच्या झाल्या, त्यामुळे साहजिकच जनतेत निकालाविषयी उत्सुकता आहे. एकंदरीत राजकारणाचा आढावा घेतला तर प्रत्येक व्यक्तीचे आपले स्वतःचे एक समीकरण असते आणि त्या समीकरणावर त्याचा 100 टक्के विश्वास असतो.

बरेचदा त्यांचा आत्मविश्वास इतका असतो की, राष्ट्रीय पातळीवरील नेत्यांनाही जे कळत नाही ते आपल्याला कळते, असा भास ते निर्माण करत असतात. शिवाय मागील वेळी आपला अंदाज अचूक आला होता, हे ते विनाकारण सांगत असतात. आता पाच वर्षांपूर्वी यांनी काय अंदाज व्यक्त केले होते आणि त्यातले किती बरोबर आले होते, हे त्यांनाच काय, कुणालाच आठवत नसते; परंतु आपला अंदाज चुकत नाही, हे सांगून या निवडणुकांचे अंदाज सांगण्याचा मक्ता असे लोक स्वतःकडे घेत असतात. राष्ट्रीय पातळीवरील राजकारणी लोक हे गेले 30-40 वर्षे राजकारणामध्ये आहेत, त्यामुळे सामान्य मतदारांपेक्षा त्यांचे आकलन अधिक असते. ग्रामीण भागात साठीच्या पुढच्या 10-12 लोकांचा एक ग्रुप असतो आणि संध्याकाळच्या वेळी पारावर निवांत गप्पा मारत हे लोक बसलेले असतात.

यामधील एखादी व्यक्ती कधीतरी 30-40 वर्षांपूर्वी एकच टर्म जिल्हा परिषद सदस्य राहिलेली असतो आणि तिला स्वतःला आणि इतरांना केवळ तिलाच राजकारण कळते, असे वाटत असते. अल्पकाळासाठी राजकारणामध्ये येऊन छोटेसे पद भूषवणार्‍या या व्यक्तीला संपूर्ण गावामध्ये काय वातावरण आहे, याची माहिती नसते, तरीही ती छातीठोकपणे अंदाज सांगत असते. अंदाज व्यक्त करणारा पुढे अंदाज फसला तर काय बोलायचे, हेसुद्धा ठरवून बसलेला असतो. चर्चा करणार्‍यांनी आपली कामे चुकू देऊ नका. शेती करत असाल तर शेतीकडे लक्ष द्या. नोकरी करत असाल तर नोकरीकडे लक्ष द्या. राजकारण असेच चालत असते. कोणी निवडून येतात, कोणी पराभूत होतात; पण आपण कर्तव्याला चुकता कामा नये.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news