सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणार

सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करणार

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाचे नेते प्रतापराव जाधव यांना आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आणि आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्रिपद मिळाले आहे. त्यानंतर एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व, मंत्रिमंडळात शिवसेना शिंदे गटाला मिळालेले स्थान, आयुष आणि आरोग्य मंत्रालयाअंतर्गत करायची कामे, मंत्रिपदासह राज्यात पक्ष संघटना वाढीचे नियोजन आणि राज्यातील विधानसभा निवडणुकांबाबत जाधव यांनी दै. 'पुढारी'शी संवाद साधला. 'पुढारी'चे नवी दिल्ली प्रतिनिधी प्रशांत वाघाये यांनी घेतलेली विशेष मुलाखत…

प्रश्न : तुमच्याकडे आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार आहे. सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री आहात. या विभागाअंतर्गत महाराष्ट्रासाठी काय विशेष योजना आहेत काय?

उत्तर : आयुष मंत्रालयाचा स्वतंत्र प्रभार माझ्याकडे आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचा मी राज्यमंत्री आहे. थेट जनतेशी संपर्क असणारी ही खाती माझ्याकडे आहेत. या दोन्ही विभागांत काम करायला मोठा वाव आहे. केंद्र सरकारच्या अनेक चांगल्या योजना आहेत. या सर्व योजनांतून महाराष्ट्रासह देशभरातील गोरगरिबांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी विशेष प्रयत्न करणार आहे. सार्वजनिक आरोग्य सेवा बळकट करण्यावर केंद्र सरकारचा भर असेल.

प्रश्न : आयुष्मान भारत योजना यशस्वी झाली आहे. अशाच कुठल्या नव्या योजनेचा प्रस्ताव तुमच्याकडे आहे का?

उत्तर : आयुष्मान भारत योजनेची व्याप्ती वाढवली आहे. अनेक आजारांवर या योजनेच्या माध्यमातून उपचार होत आहेत. देशातील गोरगरिबांचा उपचाराअभावी जीव जाईल असे होता कामा नये. सरकारच्या सर्व योजनांची अंमलबजावणी चांगली झाली पाहिजे यासाठी आवश्यक ते सर्व नियोजन करणार आहे.

प्रश्न : आयुष मंत्रालयाकडे पंतप्रधान मोदी यांचे विशेष लक्ष असते. तुम्ही पदभार स्वीकारल्यानंतर त्यांनी किंवा पंतप्रधान कार्यालयाकडून यासाठी काही सूचना दिल्या आहेत का?

उत्तर : मंत्री झाल्यानंतर अद्याप पंतप्रधान मोदी यांच्याशी भेट झालेली नाही; पण स्वतंत्र प्रभार असल्यामुळे मी थेट पंतप्रधान मोदी यांना आयुष मंत्रालयासंदर्भात अहवाल देणार आहे. 21 जून रोजी पंतप्रधान मोदी आंतरराष्ट्रीय योग्य दिनाच्या कार्यक्रमात श्रीनगरला असणार आहेत. यावेळी ते नागरिकांसोबत योगा करणार आहेत. आयुष विभागाचा मंत्री या नात्याने मी तिथे असणार आहे.

प्रश्न : आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाचे राज्यमंत्री म्हणून या विभागाचे कॅबिनेट मंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत काम करणार आहात. मंत्रालयाच्या माध्यमातून काम करताना याचा फायदा होईल का?

उत्तर : याचा फायदा नक्कीच होईल. मला मिळालेल्या संधीच्या माध्यमातून लोकांची सेवा तर करायची आहेच, सोबतच राज्यात पक्ष आणि संघटना वाढीसाठी प्रयत्न राहतील. लोकसभा निवडणुकीतील थोडे अपयश दूर करण्याचा प्रयत्न करून आगामी विधानसभा निवडणुकीत 200 पेक्षा अधिक आमदार निवडून महायुतीची सत्ता येईल, यासाठी आम्ही प्रयत्न करू.

प्रश्न : अनेकदा रुग्णवाहिका किंवा अन्य वैद्यकीय सेवा वेळेत न मिळाल्याने रुग्णाचा मृत्यू होतो. या व्यवस्थेला तुम्ही कसे सरळ करणार?

उत्तर : आरोग्य विभागात काही उणिवा असतील तर या विभागाचा मंत्री म्हणून त्या तातडीने दूर करून गोरगरीब लोकांना तत्काळ आणि चांगली आरोग्य सेवा मिळेल याकडे माझे प्राधान्य असेल.

प्रश्न : आंतरराष्ट्रीय योगा दिनाचा कार्यक्रम श्रीनगरमध्ये होत आहे. या कार्यक्रमाची कशी तयारी आहे?

उत्तर : 2015 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेत 90 दिवसांमध्ये 190 देशांनी आंतरराष्ट्रीय योगा दिनाच्या निर्णयाला पाठिंबा दिला. 2015 पासून दरवर्षी योगा दिनाची एक विशिष्ट थीम असते. या वर्षी 'स्वतःसाठी आणि समाजासाठी योगा' अशी थीम आहे. चांगले नियोजन श्रीनगरमध्ये करत आहोत.

प्रश्न : लोकसभा निवडणुकीत भाजपच्या सर्व्हेमध्ये तुमच्या काही जागा नकारात्मक दाखवल्या. त्याचा तुमच्या पक्षाला काही ठिकाणी फटका बसला असे तुमचे नेते, कार्यकर्ते म्हणतात?

उत्तर : भाजपच्या सर्व्हेमध्ये काय होते काय नाही, हे माध्यमांमधून आपण पाहिले; मात्र काही ठिकाणी उमेदवार बदलल्यामुळे, तर काही ठिकाणी उमेदवार उशिरा जाहीर झाल्यामुळे फटका बसला. मराठवाड्यात मराठा आरक्षणाचा प्रश्न होता, विदर्भात आणि उत्तर महाराष्ट्रात सोयाबीन, कांदा आणि अन्य शेतमालाचे प्रश्न होते. स्थानिक विषयांवर ही लोकसभा निवडणूक लढली गेली.

प्रश्न : राज्यात विधानसभा निवडणुका होणार आहेत. त्यासाठी कसे नियोजन असणार आहे?

उत्तर : विधानसभा निवडणुकाही महायुती म्हणून लढणार आहोत. शिवसेना पक्ष वाढवण्यासाठी मी मेहनत करणार आहेच. आमच्या पक्षासह महायुतीत भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि सर्वच घटक पक्षांना ज्या जागा मिळतील, तिथे जास्तीत जास्त जागा कशा निवडून येतील, यासाठी प्रयत्न करणार आहोत.

प्रश्न : विधानसभा निवडणुकीत तुमचा पक्ष किती जागा महाराष्ट्रात लढवणार आहे?

उत्तर : कोण किती जागा लढवेल, हे अद्याप ठरलेले नाही. महायुतीमध्ये शिवसेना, भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) हे प्रमुख पक्ष आहेत. यासोबतच अन्य मित्रपक्षही आहेत. सर्व मित्रपक्षांशी चर्चा करून समन्वयाने जागावाटप होईल.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news