[author title="प्रा. किरणकुमार जोहरे, तंत्रज्ञान अभ्यासक" image="http://"][/author]
'पॉपकॉर्न ब्रेन' हे एक भयंकर व्यसन आहे. बदलत्या डिजिटल वातावरणात 'पॉपकॉर्न ब्रेन'चा धोका म्हणजे संतुलित सोशल मीडियाच्या वापराने आताच सावरण्याचा गंभीर इशारा आहे. अत्याधुनिक इलेक्ट्रॉनिक्स मोबाईलसारख्या गॅजेटच्या वापरामुळे एकदा तुमचा मेंदू 'पॉपकॉर्न ब्रेन' बनला की, तुमच्या मन व मेंदूवरचा ताबा सुटतो व तुम्हाला चक्क गुलाम बनवते. यावर चटकन कदाचित कुणी विश्वास ठेवणार नाही. तुमचा मेंदू 'पॉपकॉर्न ब्रेन' बनत आहे की नाही, हे तुम्ही स्वत:च ओळखू शकता.
2010 च्या दशकाच्या सुरुवातीला 'पॉपकॉर्न ब्रेन' ही संकल्पना विविध देशांत लोकप्रिय झाली. वॉशिंग्टन विद्यापीठाच्या माहिती स्कूलचे डॉ. डेव्हिड लेव्ही यांनी डिजिटल मीडियाच्या प्रभावावर चर्चा करण्यासंदर्भात 'पॉपकॉर्न ब्रेन' शब्द वापरला आणि तो लोकप्रिय झाला. भारतात अजूनही 'पॉपकॉर्न ब्रेन' हा शब्द नवीनच आहे. 'सीएनएन'च्या अहवालानुसार, डिजिल सोशल मीडियाच्या वेगवान बदलाची सवय नव्हे, तर व्यसन जडणे म्हणजे तुमचा मेंदू 'पॉपकॉर्न ब्रेन' झाला आहे. मानवी शरीर हे बायो-इलेक्ट्रॉनिक्स यंत्रच आहे. मानवी मेंदूतील योग्य प्रमाणात डोपामिन हे आनंददायी व चैतन्यदायी जीवनासाठी गरजेचे आहे. वारंवार व अतिरिक्त डोपामिनची सवय म्हणजे मेंदूचे 'पॉपकॉर्न ब्रेन' बनणे होय. शरीरातील सर्व हालचाली व संदेशवहन हे चेतापेशींतून इलेक्ट्रॉन्सच्या सूक्ष्म विद्युत प्रवाहाने होते. डोपामिन म्हणजे बायो-इलेक्ट्रॉनिक्स शरीरात एक प्रकारचा सळसळता इलेक्ट्रिक करंट निर्माण करणारे माध्यम आहे. डोपामिन मेंदूतील अंतःस्रावी ग्रंथीतून पाझरणारे एक हार्मोन किंवा संप्रेरक आहे. डोपामिन हे मेंदूत बनते व रासायनिक संदेशवाहक म्हणून कार्य करते.
आपण चित्रपट का पाहतो, गेम्स का खेळतो, याचा विचार कधी केला आहे का? मानवी जीवनात प्रत्यक्ष घडत नाहीत अशा घटनांबद्दल नेहमीच आकर्षण व कुतुहलाचे मायाजाल हे अनादी काळापासून कायम आहे. सोशल मीडियावरील रिल्स, चित्रपटातील वेगवान घडणार्या घटना पाहून किंवा गेम जिंकल्यामुळे व्यक्तीला मेंदूत पाझरणार्या डोपामिनमुळे काहीतरी खास आहे, असा अनुभव देतात.
ओटीटी प्लॅटफॉर्म, सोशल मीडिया, मोबाईल गेमिंग, इंटरनेट, व्हर्च्युअल रियालिटी अग्युमेंटेड रियालिटी (एआर) आदींच्या माध्यमातून जाणूनबुजून गतीने व्यस्त राहण्यासाठी आव्हानात्मक वाटाव्यात अशा गोष्टी पाहण्याची व त्यातून आनंद मिळेल, असे मेंदूतील डोपामिन हे आनंदाचे रसायन स्रवण्याची प्रक्रिया नव्हे, तर हव्यासापोटी मानवी मेंदू बनतो. शरीरात गरजेपेक्षा अधिक डोपामिन पाझरण्यासाठी इलेक्ट्रॉनिक्स गॅझेटचा अमर्याद वापर हा मेंदूला बनवतो 'पॉपकॉर्न ब्रेन'!
'पॉपकॉर्न'ब्रेन ची गंभीर प्रकरणे शहरातच नव्हे, तर ग्रामीण भागातही दिसून येत आहेत. व्यसनी पदार्थाच्या सेवनाने डोपामिन स्रवते. आनंदाची भावना वारंवार मिळवण्यासाठी अमली पदार्थांचे सतत सेवन करीत व्यक्ती व्यसनी बनते; मात्र शरीरालाही त्या पदार्थांची सवय झाली की, काळाबरोबर जसजसे नावीन्य संपते, तसे त्याचा प्रभाव कमी होतो. मग अधिक आनंद मिळवण्यासाठी जास्तीत जास्त अमली पदार्थ घेण्यासाठी व्यक्ती बेभान होते. 'पॉपकॉर्न ब्रेन'मध्येही व्यक्तीची हीच अवस्था प्राप्त होते.
'पॉपकॉर्न ब्रेन' म्हणजे युद्धनीती व फार मोठे आंतरराष्ट्रीय षड्यंत्रही आहे. याबद्दल लष्कर व वैद्यकीय, शैक्षणिक क्षेत्र, तसेच राजकीय व प्रशासकीय क्षेत्रात बरीच अनभिज्ञता आहे. एवढेच नव्हे, तर तुमचा मेंदू 'पॉपकॉर्न ब्रेन' बनविण्यासाठी मार्केटिंग एजन्सीज, सोशल मीडिया, राजकीय पक्षांच्या 'वॉर रूम' आदी विविध माध्यमांतून खरे वाटावे असे रिल्स, मिमस, व्हिडीयो आदी कंटेट व इतरही विविध रंजक क्लुप्त्यांचा वापर करीत बुद्धिभेद व दिशाभूल होते, याची भनकही सर्वसामान्यांना नाही. एकाग्रता भंग पावणे, कामावर लक्ष न लागणे, सतत बेचैन वाटणे, जेवण न करता सतत काहीतरी चटपटीत खावेसे वाटणे, काहीतरी धाडसी करावेसे वाटणे, आत्मकेंद्री होत वडीलधार्यांना काहीच समजत नाही, असे मित्रांमध्ये वारंवार बोलणे, जागरण करणे, रोज अंघोळ न करणे, घरात पसारा करणे, अपचन, चिंता, भीती, कमी सहनशीलता, निराशा, सतत उत्तेजित होणे व जलद प्रतिसादांची गरज यामुळे तणावाची पातळी वाढणे असे 'पॉपकॉर्न ब्रेन'चे परिणाम आहेत.
'पॉपकॉर्न ब्रेन'वर उपायांची पंचसूत्री
नियमितपणे सर्व डिजिटल उपकरणांपासून झोपण्यापूर्वी किमान दोन तास आधी संपर्क टाळावा. झोपताना घरातील सर्व मोबाईल डिव्हायसेस दुसर्या खोलीत डेटा बंद करीत सायलेंट किंवा फ्लाईट मोडवर ठेवावेत. मोबाईल, लॅपटॉप इलेक्ट्रॉनिक्स गॅझेट डिव्हाईसच्या वापरावर मर्यादा ठेवावी. ई-मेल्स व सोशल मीडियाचा वापर करण्यासाठी निश्चित काही मिनिटे वेळ ठरवावा.
रात्री झोपताना दुसर्या दिवशीच्या वैयक्तिक, कार्यालयीन, कौटुंबिक, सामाजिक, राष्ट्रीय व मानवजातीसाठी कल्याणकारी ठरू शकेल, असे कोणते कार्य कोणत्या कालखंडात करणार, याचा आराखडा लिहून ठेवत त्यांना अग्रक्रम देत अंमलबजावणी करावी.
कुठलेही काम करताना ते एकाग्रतेने व विशिष्ट वेळेतच पूर्ण करावे. अनियंत्रित गोष्टी व वेळेतील तफावतीची कारणे व कालावधीची डायरीत नोंद करावी.
टप्प्याटप्प्याने सोशल मीडिया अन इन्स्टॉल करीत मोबाईल उपवास करणे हा यावर रामबाण उपाय आहे.
रोज मन ताजे राहण्यासाठी पाच मिनिटे डोळे बंद करून श्वासांवर लक्ष केंद्रित करण्याचा व्यायाम किंवा ध्यानधारणा करावी.