

डिकी बर्ड गेले, हे शब्द कानावर पडले आणि तमाम क्रिकेट रसिकांचे मन क्षणभर तिथेच थबकले. थेट काळजाला भिडणारा पंच म्हणून ज्यांचा उल्लेख करावा, असे हाताच्या बोटांवर मोजता येणारे जे पंच आहेत, त्यातील आघाडीचे नाव म्हणजे डिकी बर्ड. पांढरा पेहराव, रुबाबदार कॅप, चेहर्यावर स्मित हास्य आणि सोबतीला नि:पक्षपाती निर्णय पद्धती. डिकी बर्ड यांची हीच शिदोरी त्यांच्या माणसातला देव दर्शवण्यासाठी पुरेशी ठरली.
विवेक कुलकर्णी
एखादं शांत मैदान. उन्हात थोडं लखलखणारं गवत. प्रेक्षकांचा गजर आणि त्या गजराच्या मध्यभागी उभा असतो पांढरी टोपी, डोक्यावर नीट बसवलेली, हातातल्या बोटांनी हलकेच ती सरकवणारे चेहर्यावर नेहमीसारखं स्मित हास्य घेऊन डिकी बर्ड!
जगातल्या लाखो चाहत्यांसाठी क्रिकेट म्हणजे फक्त खेळ नाही, तर तो एक उत्सव असतो. त्या उत्सवाचा संयमी, कुठेही न झुकणारा पंच होता हॅरॉल्ड डेनिस डिकी बर्ड. त्यांच्या हाताच्या हलक्या हालचालीने एखाद्या फलंदाजाचं स्वप्न संपायचं आणि कधी संपूर्ण संघाची धडधड सुरू व्हायची. गोलंदाजांनाही न्याय मिळायचा. डिकी बर्ड हे खरं तर केवळ निर्णय देणारे पंच नव्हते, तर ते मैदानावरील सौजन्याचे प्रतीक होते. त्यांची पंचगिरी पाहणे हीदेखील जणू एक कला होती. त्यांचा चालण्यातील थाट, नजरेतील करारीपणा आणि चेहर्यावरील साधंपण, रुबाबदार हास्य त्यांचे वेगळेपण अधोरेखित करायच्या आणि याला जोड असायची ती त्यांच्या सचोटीच्या नि:पक्षपाती पंचगिरीची! त्यांच्या निर्णयावर कोणाचेच प्रश्नचिन्ह नसायचे. याचे कारण म्हणजे, त्यांचा प्रामाणिकपणा!
क्रिकेटच्या मैदानावर हजारोंच्या संख्येने प्रेक्षकांचा गोंगाट असतो, त्यावेळी किंचित होणारे आवाज टिपणे हे खरे मोठे आव्हान असते. ते आव्हान बर्ड यांनी लीलया पेलले. खेळाडू त्याच्यासमोर जोरदार अपील करत; पण डिकी बर्ड मात्र स्थितप्रज्ञासारखे अपिलावर लक्ष एकाग्र करून असायचे अन् दुसर्याच सेकंदाला त्यांचा निर्णय यायचा. डिकी बर्डची कारकीर्द म्हणजे केवळ आकडेवारी नव्हे.
66 कसोटी सामने, 69 वन-डे आणि तीन विश्वचषकाच्या फायनल्स, हे त्यांच्या देदीप्यमान प्रवासाचे महत्त्वाचे टप्पे; पण या सगळ्यातील खरा गोडवा आहे त्याच्या किस्स्यांमध्ये. गावस्करनी एकदा त्यांच्याशी चेष्टा केली होती, डिकी, आज काहीतरी जास्त गंभीर दिसताय का? त्यावर ते म्हणाले होते, मी गंभीर नाही. मी फक्त प्रामाणिक आहे. त्यांच्या शेवटच्या सामन्यात जेव्हा बर्ड मैदान सोडून बाहेर जात होते, त्यावेळी दोन्ही संघांनी त्यांना अदबीने तेव्हा संपूर्ण प्रेक्षकांनी उभं राहून टाळ्या वाजवल्या. अवघ्या क्रिकेट वर्तुळासाठी तो डोळ्यांत पाणी आणणारा क्षण ठरला होता. आजच्या काळात जेव्हा तंत्रज्ञानाने निर्णय दिले जातात, तेव्हा डिकी बर्ड यांची साधी पांढरी टोपी, त्याचं सहज स्मित आणि त्याचा शांत आवाज आठवतो. तो जणू सांगतो, तंत्रज्ञान नसेल तर चालेल; पण मैदानावर डिकी बर्ड हवेत! डिकी बर्ड हे खरं तर केवळ एका अंपायरचं नाव नाही, तर ते एक मूल्य आहे. निष्पक्षतेचं, प्रामाणिकतेचं आणि अदबीचं.
क्रिकेटच्या मैदानावर अजूनही कुणी अपील करतं, एखादा निर्णय दिला जातो आणि त्याविरोधात अपील होत, तो निर्णय बदलला जातो. त्यावेळी डिकी बर्ड नावाच्या महान पंचांची आठवण येते, जो पंच कोणत्याही तंत्रज्ञानाशिवाय अगदी बिनचूक निर्णय द्यायचा. क्रिकेटमधला तो काळ असा होता, ज्यात कोणतेही तंत्रज्ञान नव्हते. डिकी बर्ड हे फक्त पंच नव्हते तर ते मैदानाचा आत्मा होते. बर्ड स्वत:च्या कर्तबगारीबद्दल फारसे बोलायचे नाहीत; पण त्यांचे आत्मचरित्र लाखोंच्या संख्येत विकले गेले. त्या आत्मचरित्रात लिहिलेलं एक वाक्य लक्षवेधी आहे. ते त्यात म्हणतात, "God gave me eyes and I used them for Cricket!'