Pakistan | पाकिस्तानला उपरती!

Donald Trump Outrage
Donald Trump Outrage | ट्रम्पविरोधात उद्रेक (Pudhari File Photo)
Published on
Updated on

पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा मोहम्मद आसिफ हे पाकिस्तान मुस्लिम लीग (नवाज शरीफ) पक्षाचे ज्येष्ठ नेते. 2013 ते 2017 या कालावधीत ते संरक्षणमंत्री होते आणि वादग्रस्त वक्तव्ये करण्याबद्दल त्यांची ख्याती आहे. ‘भारतावर अणुबॉम्ब टाकू’, ‘भारताला अद्दल घडवू’, अशा पोकळ धमक्या त्यांनी दिल्या होत्या. पहलगाम कांडानंतर भारताने ‘ऑपरेशन सिंदूर’ सुरू केल्यावर पाकच्या संसदेत काही खासदार घाबरून रडू लागले आणि आसिफ यांनाही दरदरून घाम फुटला होता. 2002 मध्ये आसिफ यांना भ्रष्टाचाराच्या आरोपावरून अटक झाली होती. बेहिशेबी मालमत्ताप्रकरणी त्यांना पाच वर्षांपूर्वी तुरुंगवासही घडला होता. अशा या आसिफ यांनी आता अचानकपणे अमेरिकेवर शरसंधान केले आहे. 2001 साली अमेरिकेसाठी तालिबानविरोधात जात पाकिस्तानने पुन्हा चूक केली.

अमेरिका बाजूला झाला; परंतु आम्ही आतापर्यंत त्याचे परिणाम भोगत असून, त्याची भरपाई कधीही होऊ शकत नाही, असे उद्गार त्यांनी काढले आहेत. लष्करप्रमुख जनरल झिया-उल-हक आणि परवेझ मुशर्रफ यांच्यावरही त्यांनी हल्लाबोल केला. अफगाणिस्तानात 1980 साली जो विद्रोह झाला, तो अमेरिकेच्या इशार्‍यावर केला होता. तत्कालीन पाक सरकारने स्वतःच्या फायद्यासाठी आपल्याच लोकांना त्यात सहभागी करून गंभीर चूक केली, असे आसिफ यांचे मत आहे. थोडक्यात, अमेरिकेने पाकिस्तानचा केवळ टॉयलेट पेपरसारखा वापर करून फेकून दिले. अफगाणिस्तान युद्धात आमचा वापर केला गेला आणि काम झाल्यावर सोडून दिले. तालिबानने जिहादच्या नावाखाली जेव्हा रशियाविरोधात युद्ध पुकारले, तेव्हा पाक युद्धात उतरला; परंतु त्याचे कोणतेही निमित्त नव्हते.

कारण, तो ‘जिहाद’च नव्हता आणि रशियाने आफगाणिस्तानवर कब्जादेखील केला नव्हता, असा साक्षात्कार आसिफ यांना काही दशकांनंतर झालेला दिसतो. इतके दिवस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा गुणगौरव करण्यात पाकिस्तान मग्न होता. ट्रम्प यांना शांततेचे नोबेल मिळावे, अशी मागणी करून पाकिस्तानने भाटगिरीची हद्द गाठली होती. लष्करप्रमुख असीम मुनीर यांना ट्रम्प यांनी ‘व्हाईट हाऊस’मध्ये भोजनाचे आमंत्रण दिले. त्यामुळे मुनीर यांना स्वर्ग दोन बोटेच उरला होता! पाकने अमेरिकेला अफगाणिस्तान युद्धावेळी आपले हवाई क्षेत्र खुले केले. बंदरे आणि लष्करी तळांचा वापर करू दिला. हवाई इंधनभरतीची सोय करून दिली. परंतु, तरीही अमेरिका फक्त स्वतःच्या भल्याचा विचार करतो, अशी उपरती पाकिस्तानला झालेली दिसते. ट्रम्प यांना खूश करण्यासाठी पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गेल्याच महिन्यात इराणला मोठा धक्का दिला.

इराणला अमेरिका शत्रुस्थानी मानतो आणि ट्रम्प इराणला अण्वस्त्र केंद्रांवरून धमक्याही देत आहेत. पाकिस्तानने इराणबरोबरची गेल्या अनेक दशकांपासून अस्तित्वात असलेली रहदारी प्रणाली बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. बलुचिस्तान आणि इराणच्या सीमावर्ती भागात राहणारे लोक कौटुंबिक संबंध, व्यापार आणि दैनंदिन गरजा पूर्ण करण्यासाठी स्थानिक कागदपत्रांचा वापर करून सीमा ओलांडत असत. परंतु, आता ही पद्धत रद्द केल्यामुळे या भागातील लोकांना पासपोर्ट व व्हिसाशिवाय सीमा पार करता येणार नाही. आर्थिक संकटात असलेल्या पाकिस्तानला अमेरिका आर्थिक व शस्त्रास्त्रांची मदत करतो. ‘ऑपरेशन सिंदूर’दरम्यान युद्धबंदी करारात निर्णायक भूमिका असल्याचा दावा ट्रम्प यांनी केला होता. मात्र, भारताने हा दावा साफ फेटाळून लावला. त्यामुळे ट्रम्प नाराज झाले होते. या काळात अमेरिका व पाकिस्तान यांच्यातील संबंध मजबूत झाले. रशियाकडून तेलखरेदीमुळे अमेरिकेने भारतावर 50 टक्के शुल्क लादले. पाकिस्तानवरील शुल्क मात्र 19 टक्क्यांवर आणले होते. तेव्हा पाकिस्तान खूश झाला होता. भारतावर जास्त शुल्क लादल्याने त्याला उकळ्या फुटल्या होत्या. परंतु, आता भारत-अमेरिका व्यापार करारास अंतिम स्वरूप प्राप्त झाले असून, भारतावरील शुल्क अमेरिकेने 18 टक्क्यांवर आणल्यामुळे जागतिक व्यापार व्यवस्थेत भारताची भूमिका अधिक भक्कम होण्याची चिन्हे आहेत. त्यामुळे पाकिस्तानचे माथे भडकले आहे. शिवाय, पाकिस्तानने अमेरिकेसोबत व्यापक द्विपक्षीय व्यापार करार केलेला नाही.

मुळात पाकिस्तानने भारतविरोधी कारवायांसाठी 1970 ते 2000 या काळात अमेरिकेची मदत घेतली होती. परंतु, आता जागतिक तसेच दक्षिण आशियातील समीकरणे बदलली असून, भारत हा जागतिक महासत्ता होण्याच्या दिशेने प्रवास करत आहे. भारताच्या विशाल बाजारपेठेचे अमेरिकेला आकर्षण आहे. भारतातील कुशल तंत्रज्ञ अमेरिकेला हवे आहेत. भारताबरोबर व्यापारात दोन्ही देशांचा फायदा आहे, हे ट्रम्प जाणतात. उलट पाकिस्तान हा आर्थिकद़ृष्ट्या मोडकळीस आलेला देश आहे. पाकिस्तानात कारखानदारी क्षेत्र फारसे नाही. तेथील मालाचा दर्जा चांगला नाही. शिवाय, पाकिस्तान हा सातत्याने चीनची तळी उचलत असल्याचे अमेरिकेला ठाऊक आहे. तैवानच्या मुद्द्यावरून अमेरिका व चीनचे संबंध चांगले नाहीत. चीनचा मित्र असलेला उत्तर कोरिया अमेरिकेच्या जवळचा देश नाही आणि एकेकाळी उत्तर कोरियाला पाकने अण्वस्त्र तंत्रज्ञान पुरवले होते, हे अमेरिकेला ठाऊक आहे.

मुळात पाकिस्तान हा दहशतवादी व दिवाळखोर देश असून, दहशतवादी कारवायांमुळे तो स्वतःच ग्रस्त झालेला आहे. अफगाणी तालिबान्यांपासून वाचवण्यासाठी अमेरिकेने मदत करावी ही पाकची इच्छा असून, तीही पूर्ण होत नाही. अफगाणिस्तानातील रशियाविरोधी युद्धात पाकिस्तानी मुजाहिद्दीनींबरोबरच ओसामा बिन लादेनही सहभागी झाला होता. या लादेनला नंतर पाकिस्ताननेच आश्रय दिला होता. लादेनने ‘अल कायदा’मार्फत अमेरिकेवर हल्ला केला होता आणि अमेरिकेने पाकिस्तानात घुसून लादेनचा खात्मा केला होता. लादेनसारख्या आंतरराष्ट्रीय दहशतवाद्याला आसरा देणारा पाकिस्तान हा काय लायकीचा देश आहे, हे सर्व जगाला ठाऊक आहे. अमेरिकेला पाकिस्तानचा आता फारसा उपयोग उरलेला नाही. त्यामुळे पाकची अवस्था टॉयलेट पेपरसारखी झाली आहे, या जाणिवेमुळे ख्वाजा आसिफ यांचा भडका उडालेला दिसतो. परंतु, उशिरा झालेल्या या उपरतीमुळे पाकिस्तानला शहाणपण येईल, याची मात्र सूतराम शक्यता नाही!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news