Brain Neurostimulation | मेंदूला ‘चार्ज’ करणारे न्यूरोस्टिम्युलेटर!

Brain Neurostimulation |
Brain Neurostimulation | मेंदूला ‘चार्ज’ करणारे न्यूरोस्टिम्युलेटर!
Published on
Updated on

सकाळी उठल्यापासून सुरू होणारी कामांची अखंड रीघ, कॉम्प्युटर स्क्रीनवर तासन्‌तास खिळलेल्या नजरा, सततचे नोटिफिकेशन्स आणि दुपार उलटताच डोक्यावर दाटून येणारे ‘ब्रेन फॉग’चे मळभ ही ठरलेली. यामुळे आजच्या अतिव्यग्र युगात एकाग्रता टिकवून ठेवणे हे प्रत्येक माणसापुढील सर्वात मोठे आव्हान बनले आहे. मरगळ झटकण्यासाठी आणि मेंदूला पुन्हा ताजेतवाने करण्यासाठी आपण दिवसातून चार-पाचवेळा कडक चहा, कॉफीचे घोट घेतो, तर तरुण पिढी साखर आणि कॅफिनने भरलेल्या एनर्जी ड्रिंक्सचा आधार घेते; पण शरीराला रासायनिक उत्तेजकांचे व्यसन लावून मिळवलेली ही ऊर्जा क्षणभंगुर असते आणि त्याचे दूरगामी दुष्परिणाम आरोग्यावर होतात. मेंदूची हीच मरगळ नैसर्गिक आणि सुरक्षित मार्गाने दूर करण्यासाठी ‘गॅजेट वर्ल्ड’मध्ये न्यूरोसायन्सचा एक क्रांतिकारी आविष्कार अवतरला आहे. डोक्यावर परिधान करता येणारे हे ‘स्मार्ट न्यूरोस्टिम्युलेशन हेडबँड’ आता तुमच्या कंटाळपणावर कायमचा पर्याय ठरू पाहत आहे.

हे गॅजेट वैद्यकीय विज्ञानातील अत्यंत प्रगत अशा ‘ट्रान्सक्रॅनियल डायरेक्ट करंट स्टिम्युलेशन’ या तंत्रज्ञानावर कार्य करते. या तंत्रज्ञानाच्या सुरक्षिततेवर आणि कार्यक्षमतेवर जागतिक पातळीवर हजारो संशोधने आणि क्लिनिकल ट्रायल्स प्रसिद्ध झाले आहेत. हे उपकरण डोक्यावर लावताच, त्यातील दोन विशिष्ट इलेक्ट्रोडस्‌ मेंदूच्या पुढच्या भागाला म्हणजेच ‘प्रीफ्रंटल कॉर्टेक्स’ला अत्यंत सूक्ष्म, सुरक्षित आणि हलका विद्युत प्रवाह देतात. मेंदूचा हाच भाग माणसाची निर्णयक्षमता, एकाग्रता, सतर्कता आणि कार्यक्षमता नियंत्रित करत असतो.

या तंत्रज्ञानाची खरी जादू मेंदूच्या अंतर्गत रचनेत घडते. या सूक्ष्म लहरींमुळे मेंदूतील रक्तप्रवाह वेगाने वाढतो, न्यूरॉन्स सक्रिय होतात आणि डोपामाईनसह अनेक महत्त्वाचे न्यूरोट्रान्समीटर्स नैसर्गिकरीत्या स्रवू लागतात. परिणामी, कोणत्याही गोळ्या, कॅफिन किंवा साखरेच्या आहाराशिवाय मेंदूला एक अनोखी धार मिळते. दिवसभरातून केवळ २० मिनिटे हे हेडबँड वापरल्यास मनाची विचलित अवस्था संपून लक्ष एकाग्र होते आणि मेंदूतील आळस किंवा थकवा काही क्षणात पळवून लावला जातो.

डिझाईनचा विचार केला, तर हे गॅजेट अत्यंत स्लिम, वजनाने हलके म्हणजेच अवघे ७० ग्रॅम आणि दिसायला एखाद्या स्टायलिश हेडबँडसारखे आहे. मऊ आणि ॲडजस्टेबल पट्ट्यामुळे ते डोक्यावर अगदी सहज आणि आरामदायक बसते. हे वापरणे लहान मुलांच्या खेळासारखे सोपे आहे; हे डोक्यावर चढवून सुरू करण्यासाठी अवघ्या एका ते दोन मिनिटांचा वेळ लागतो. ऑफिसमध्ये महत्त्वाच्या प्रेझेंटेशनपूर्वी, अभ्यास करताना, कोडिंग करताना किंवा गेमिंग आणि संगीताचा सराव करताना हे २० मिनिटांचे सेशन मेंदूला हाय परफॉर्मन्स मोडमध्ये घेऊन जाते.

जगभरातील नामांकित न्यूरोसर्जन आणि मेंदूरोगतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली हे उपकरण १८ वर्षांवरील निरोगी व्यक्तींसाठी पूर्णपणे सुरक्षित म्हणून प्रमाणित करण्यात आले आहे. या तंत्रज्ञानाचा सर्वात मोठा फायदा म्हणजे, अवाजवी कॅफिन, गोड पदार्थ आणि उत्तेजक औषधांचे शरीरातील प्रमाण कमी करून माणसाला नैसर्गिक कार्यक्षमतेची सवय लावणे. जागतिक बाजारपेठेत या हाय टेक उपकरणाची किंमत १५९ डॉलर्सच्या आसपास आहे, जी भारतीय चलनात अंदाजे १५ हजार रुपयांच्या घरात जाते.

- आशिष शिंदे

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news