तडका : काय तो निकाल लावा..!

तडका : काय तो निकाल लावा..!

माननीय विधानसभा सभापती महोदयांना नम्र विनंती आहे की, ते पात्र आणि अपात्रचे गुर्‍हाळ एकदाचे संपवून टाका सर. गेले वर्षभर हे दळण दळले जात आहे आणि त्याचे पीठ काही बाहेर येत नाही, ही खरी आमची समस्या आहे. अहो, आमची म्हणजे आम्हा जनतेची समस्या आहे. दररोज पेपर वाचला की, कोण पात्र आहे आणि कोण अपात्र आहे, हे समजतच नाही. हा शासन नावाचा जो गाडा चालू आहे, तो कसा सुरू आहे याचे आकलन आम्हा जनतेला होत नाही. त्यामुळे तातडीची विनंती आहे की, तत्काळ ही पात्र आणि अपात्रची भानगड मिटवून टाका बरं.

काय होईल तो एकदाचा सोक्षमोक्ष लागेल. एखाद्या दीर्घ चाललेल्या खटल्यासारख्या साक्षी, नोंदी, वकील आणि त्या सुनावण्या या सर्वांना आम्ही कंटाळून गेलो आहोत. एकदाच काय ते वन टू का फोर करून टाका. सभापती महोदयांच्या दालनामध्ये सुनावण्या सुरू होत्या किंवा त्याची तयारी झाली होती, तेव्हा नेमके काही लोक कोर्टामध्ये गेले आणि मग सर्वोच्च न्यायालयाने सांगितले की, हे लवकरात लवकर करून टाका. लवकरात लवकर याची नेमकी व्याख्या करण्यामध्ये दोन-तीन महिने गेले. मग यथावकाश सुनावण्या सुरू झाल्या. हा त्याला अपात्र म्हणतो तो त्याला अपात्र म्हणतो. कोणता पक्ष नेमका कुणाचा आहे, याचा कुणाचा कुणाला मेळ राहिलेला नाही. शिवाय या प्रकारामुळे कार्यकर्ते भांबवलेले आहेत ते वेगळेच.

दोन मोठे पक्ष फुटल्यामुळे एकूण चार पक्ष तयार झाले आणि आता चिन्हावरून पक्ष ओळखणे अवघड झाले आहे. थोडक्यात, म्हणजे दोन्ही पक्ष आपणच मूळ पक्ष आहोत, असा दावा करत असतात मग त्या नेत्यांच्या नावावरून ते पक्ष ओळखले जातात. उदाहरणार्थ, 'उबाठा' शिवसेना आणि शिंदे शिवसेना. चिन्हाची वेगळीच पंचायत होऊन बसली आहे. निवडणूक आयोगाने पक्षाचे अधिकृत चिन्ह एका व्यक्तीच्या हातात दिले आणि त्याचवेळी दुसर्‍या गटाने त्यावर आक्षेप घेतला आणि त्याचीही सुनावणी प्रलंबित आहे. निवडणुका तोंडावर आलेल्या आहेत. मतदार गोंधळलेले आहेत, कार्यकर्ते गोंधळलेले आहेत. तीच तर्‍हा घड्याळवाल्या पक्षाची झाली आहे. दहा वाजून दहा मिनिटे वाजलेले घड्याळ दाखवणारे चिन्ह असलेला पक्ष नेमका कोणाचा आहे, याचाही निर्णय झालेला नाही म्हणजे घड्याळाची जी ओढाओढ सुरू आहे, त्यामध्ये यंत्र एकीकडे आणि काटे दुसरीकडे, असे काहीतरी होण्याची शक्यता पण नाकारता येत नाही.

पण जे काय व्हायचे त्याचा एकदाच सोक्षमोक्ष लावला पाहिजे, म्हणजे कमीत कमी जनतेला तरी आपले लक्ष एकाग्र करणे सोपे जाईल आणि कार्यकर्त्यांना आपण नेमक्या कोणाच्या बाजूने आहोत, हे ठरवणे सोपे जाईल. धनुष्यबाणाचेही तसेच झालेले आहे. बाण एकीकडे आणि धनुष्य दुसरीकडे, अशी पक्षाची अवस्था झाल्यानंतर कार्यकर्त्यांना नेमके कोणासोबत जावे हे समजेनासे झाले आहे. जनतेलाही आज निर्णय घेणे अवघड झाले आहे. कारण येणार्‍या निवडणुकांमध्ये आपण नेमके कुणाला मतदान करणार आहोत आणि त्यांचे चिन्ह कोणते असणार आहे, याविषयी भयंकर संभ्रमावस्था निर्माण झाली आहे. त्यामुळे कळकळीची विनंती आहे की, एकदाची पात्र आणि अपात्रची भानगड मिटवून टाका.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news