उल्हासनगर येथील एका 65 वर्षीय रुग्णाला त्यांच्या मुलाबाळांनी मुंबईतील एका दवाखान्यात अॅडमिट केले. काही दिवस उपचार घेतल्यानंतर ते परत घरी आले; परंतु प्रकृती काही फारशी चांगली नव्हती. त्यांची प्रकृती गंभीर झाल्यानंतर त्यांच्या मुलांनी त्यांना रिक्षातून जवळच्याच एका दवाखान्यात दाखल करण्यासाठी घेऊन गेले. रुग्णालयाच्या दारातच रिक्षामध्ये सदरील रुग्ण गंभीर अवस्थेमध्ये पोहोचलेले होते. आलेली केस पाहून डॉक्टर बाहेर आले. त्यांनी सदरील रुग्णाला रिक्षामध्येच तपासले आणि सदरील व्यक्तीचा मृत्यू झाला आहे, असे निदान केले. आपला रुग्ण मरण पावला आहे, हे समजताच रुग्णाचे नातेवाईक यांनी सदरील डॉक्टरला सदरील रुग्णाचे ‘डेथ सर्टिफिकेट’ मागितले. डॉक्टरांनीही तत्परतेने त्यांना ‘डेथ सर्टिफिकेट’ दिले.
घरातील व्यक्ती मरण पावल्यानंतर सर्व नातेवाईकांना फोन केले गेले आणि पुढची तयारी म्हणून काही लोक अंत्यविधीचे सामान आणण्यासाठी रवानापण झाले. मरण हे एक ना एक दिवस येतच असते आणि ज्या घरात मृत्यू आला आहे, तेथील लोकांना पुढील तयारी करणे आवश्यक असते. अंत्यविधीची तयारी सुरू असण्याच्या काळात रुग्णाच्या नातेवाईकांनी भेटीसाठी येण्यास सुरुवात केली. सहसा अशा वेळेला पार्थिव बैठकीत ठेवलेले असते आणि येणारे लोक पाया पडून जात असतात. या व्यक्तीच्या अंत्यदर्शनाला आलेल्या एका नातेवाईकाला सदरील मृत जाहीर केलेल्या व्यक्तीच्या छातीची धडधड सुरू आहे, असे लक्षात आले. त्यांनी तत्काळ ही बाब मृताच्या मुलांना सांगितली आणि सगळे पाहतात तो काय आश्चर्य! त्यांची छाती चक्क खाली-वर होत होती. मुलांनी तत्काळ अंत्यविधीचे सामान आणण्यासाठी गेलेल्या कार्यकर्त्यांना परत फिरा, असे सांगून थांबवले आणि रुग्णाला घेऊन ते तत्काळ दवाखान्यात गेले.
दवाखान्यात उपचार सुरू होताच सदरील रुग्ण शुद्धीवर आला आणि त्याने ठणठणीत असल्याचे सांगितले. दरम्यान, पुढे दोन दिवस या रुग्णाला डिस्चार्जही मिळाला आणि आज ते घरी सुखाने सर्व व्यवहार करत आहेत. या रुग्णाला मृत घोषित करणार्या आणि तत्काळ ‘डेथ सर्टिफिकेट’ देणार्या डॉक्टरवर टीकेची झोड उठण्यास सुरुवात झाली. सदरील घटनेवर या डॉक्टरांनी दिलगिरी व्यक्त केली आणि मी तपासले तेव्हा नस सापडली नाही आणि आजूबाजूला गोंगाट असल्यामुळे हृदयाचे ठोके ऐकू आले नाहीत, असे स्पष्टीकरण दिले.