तडका : बेपत्ता की परागंदा!

तडका : बेपत्ता की परागंदा!
Published on
Updated on

आपल्या भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये चमत्कारिक वाटणार्‍या घटना नेहमी घडत असतात. आपला एखादा नातेवाईक मरण पावला म्हणून त्याच्यावर अंत्यसंस्कार करणार्‍या नातेवाईकांना तोच नातेवाईक पुन्हा जिवंत घरी आलेला पाहायला मिळतो तो आपल्याच या देशात. अशीच एक घटना उत्तराखंडमधील पिठोरगड येथे घडली आहे. कुटुंबीयांकडून मृत घोषित झालेली बेचाळीस वर्षीय व्यक्ती अंत्यसंस्कारानंतर जिवंत असल्याचे आढळून आले आहे. नवीन भट असे या व्यक्तीचे नाव असून, सदर व्यक्ती ही मद्यपी होती आणि सुमारे नऊ वर्षांपासून बेपत्ता होती. त्याच्या मद्यपान सवयीला कंटाळून त्याची पत्नी त्याला सोडून मुलांसह माहेरी राहत होती. दरम्यान, नोव्हेंबर महिन्यात या व्यक्तीच्या वडिलांना पोलिसांचा फोन आला आणि पोलिसांनी त्यांना एक निनावी मृतदेह आढळल्याचे सांगितले. या मृतदेहाच्या पाकिटातील चिठ्ठीवरून संबंधिताचे नाव नवीन भट असल्याचे समजल्यानंतर कुटुंबीयांनी तिथे जाऊन मृतदेहाची ओळख पटवली आणि मृतदेह घरी आणला.

अंत्यसंस्कार सुरू असताना त्याच्या धाकट्या भावाचा मित्र तिथे आला आणि दुकान का बंद आहे, असे विचारू लागला. त्या मित्राला नवीन भट याचा मृत्यू झाला असून अंत्यसंस्कार झाले आहेत, असे सांगण्यात आले. नवीनच्या मृत्यूबाबत ऐकून त्या मित्राला धक्काच बसला. कारण, तो काही मिनिटांपूर्वीच नवीनशी बोलला होता, असे त्याने सांगितले. मग, त्याने नवीनला व्हिडीओ कॉल केला आणि कुटुंबीयांशी बोलणे करून दिले. आता कुटुंबीयांना हा प्रश्न पडला की, आपण नेमक्या कुणावर अंत्यसंस्कार केले आहेत? तुम्हाला असे वाटेल की, बातमी इथे संपली; परंतु या महान देशांमध्ये इथून पुढे खरी बातमी सुरू होते.

नऊ वर्षांपासून बेपत्ता असलेल्या नवीनला घरच्यांनी स्वीकारले. एवढेच नव्हे, तर त्याच्या पत्नीने पण स्वीकारले. नवीनचे नव्याने नामकरण नारायण असे करण्यात आले. पतीच्या मृत्यूची बातमी ऐकून त्याची पत्नीही गावात आलेली होती. तिच्याशी त्याचा पुन्हा विवाह करून देण्यात आला. या दरम्यान त्याने दारूला स्पर्शही करणार नाही, अशी शपथ घेतली आहे आणि सुखाने संसार करत आहे.

या सगळ्या गदारोळात पोलीस पुन्हा कामाला लागले असून ज्या व्यक्तीवर अंत्यसंस्कार झाला त्याचा शोध घेण्याची जबाबदारी त्यांच्यावर आहे. म्हणजे पाहा, पोलिसांना किती काम असते ते? कायदा सुव्यवस्था राखणे, रहदारी नियंत्रित करणे, पाकिटमारांना पकडणे, मर्डर, चोर्‍या, घरफोड्या यांचा तपास करून चोरांचा शोध लावणे, त्या गुन्हेगारांच्या विरुद्ध पुरावे गोळा करणे, कोर्टात केस उभी करणे आणि ती जिंकून संबंधितांना शिक्षा देणे एवढी सगळी कामे पोलीस करत असतात. नऊ वर्षे बेपत्ता असलेल्या मद्यपानाचे व्यसन असलेल्या आपल्या पतीला स्वीकारणारी महिला केवळ आपल्या देशामध्येच भेटू शकते. भारतीय विवाहिता या सहिष्णू वृत्तीच्या आणि उदार मनाच्या असतात. नवर्‍याला पटकन माफ करून पुन्हा संसाराला लागतात. आता सदरील महोदय हे कबूल केल्याप्रमाणे दारूला स्पर्शही करणार नाहीत, अशी अपेक्षा करायला हरकत नाही.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news