Met gala and anna wintour | मेट गाला आणि अ‍ॅना विंटॉर

Met gala and anna wintour |
Met gala and anna wintour | मेट गाला आणि अ‍ॅना विंटॉर
Published on
Updated on

अक्षय निर्मळे

द डेव्हिल वेअर्स प्राडा या चित्रपटाचा सिक्वेल रीलिज झाल्याने त्या चित्रपटातील मिरांडा प्रिस्टली हे पात्रही पुन्हा चर्चेत आले आहे. हे पात्र फॅशन विश्वातील प्रभावशाली व्यक्तिमत्त्व अ‍ॅना विंटॉर यांच्यापासून प्रेरित असल्याचे मानले जाते. हॉलीवूडपासून उद्योगजगतापर्यंत, राजकारणापासून पॉप कल्चरपर्यंत अनेक प्रभावशाली चेहरे एका रात्रीसाठी एका छताखाली जमतात आणि जगभरातील माध्यमांचे लक्ष न्यूयॉर्ककडे वळते तो क्षण असतो मेट गालाचा. अत्यंत एक्सक्लुझिव्ह असलेल्या या कार्यक्रमात निमंत्रितांनाच प्रवेश मिळतो. त्यामुळेच मेट गालाचे निमंत्रण हे केवळ कार्यक्रमाचे तिकीट नसते, ती जागतिक प्रतिष्ठेची पावती मानली जाते आणि ही पावती कोणाला द्यायची, याचा अंतिम निर्णय घेतात अ‍ॅना विंटॉर.

त्या 1995 पासून मेट गालाचे नेतृत्व करताहेत. जवळपास 37 वर्षे ‘व्होग’ या मासिकाच्या संपादक राहिलेल्या अ‍ॅना या फॅशन विश्वाच्या दिशादर्शक मानल्या जातात. फॅशन, स्टाईलचे अनेक ग्लोबल ट्रेंडस् त्यांच्यामुळे आकाराला आलेत. तथापि, इतक्या वर्षात बॉब कट आणि डोळ्यांवर गडद काळ्या रंगाचा गॉगल ही त्यांची सिग्नेचर स्टाईल मात्र तशीच आहे. दरवर्षी परंपरेप्रमाणे मे महिन्याच्या पहिल्या सोमवारी मेट गाला पार पडला. हा मूळ फंड रेझिंग कार्यक्रम आहे. एक विशिष्ट थीम निवडली जाते. त्यानुसार जगभरातील सर्वोत्तम डिझाइनर्स तिथे आपली कला सादर करतात. येथे एका तिकिटाची किंमत एक लाख डॉलर्सच्या घरात जाते; पण तरी जगभरातले मोठमोठे लक्झरी ब्रँडस् दहा जणांसाठीचे टेबल्स खरेदी करतात आणि त्यातून कोट्यवधीचा निधी उभारला जातो. हा निधी फॅशनचे जतन, संशोधन, प्रदर्शनांसाठी वापरला जातो. गतवर्षी यात 250 कोटी रुपयांहून अधिक निधी जमा झाला होता आणि यंदा तो आकडा 400 कोटींवर गेल्याचे समजते.

या कार्यक्रमाच्या आयोजक म्हणून अ‍ॅना यांचे महत्त्व मोठे आहे. कारण, त्यांच्या एका निर्णयामुळे एखाद्या ब्रँडचे नशीब पालटू शकते किंवा तो ब्रँड संपूही शकतो. त्यांच्या वैयक्तिक मान्यतेशिवाय कुणीही या रेड कार्पेटवर पाऊल ठेवू शकत नाही. मग, ती कायली जेनर असो की शाहरूख खान. येथे येणार्‍यांना कार्यक्रमात सेल्फी घेण्यास किंवा कार्यक्रम काळात सोशल मीडिया वापरास बंदी असते. अनेक नवोदित मॉडेल्स, डिझाइनर्स आणि फॅशन हाऊसेसना जागतिक ओळख मिळवून देण्यातही अ‍ॅना यांची भूमिका महत्त्वाची राहिली आहे. फॅशनच्या चौकटीपलीकडे जाऊन त्यांनी मिशेल ओबामा, कमला हॅरिस आणि हिलरी क्लिंटन यांसारख्या प्रभावशाली महिलांना कव्हरपेजवर आणले होते.

मेट गाला हा केवळ फॅशनचा सोहळा नाही. तो जागतिक प्रभाव, अभिरुची आणि सांस्कृतिक शक्ती यांचा आरसा आहे. त्या एका रात्रीत कोणते चेहरे केंद्रस्थानी येतील, कोणते विचार चर्चेत राहतील आणि पुढच्या काळात सौंदर्य, स्टाईल व प्रतिष्ठेच्या व्याख्या कशा बदलतील, याचे संकेत जगाला मिळतात आणि या सगळ्याच्या मध्यभागी असतात अ‍ॅना विंटॉर. फॅशन जगतातील अशी व्यक्ती, जिच्या एका मान्यतेने ट्रेंड निर्माण होतात आणि एका नकाराने इतिहास बदलू शकतो.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news