

श्रीराम ग. पचिंद्रे
आज 27 फेब्रुवारी. थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कवी कुसुमाग्रज यांच्या जयंतीच्या औचित्याने आज मराठी भाषा गौरव दिन साजरा केला जातो. त्यानिमित्त...
आज मराठी भाषा गौरव दिन. मराठीतील थोर साहित्यिक वि. वा. शिरवाडकर तथा कविवर्य कुसुमाग्रज यांची आज जयंती. ‘ज्ञानपीठ’ पुरस्कार स्वीकारताना मराठी ही ज्ञानभाषा व्हावी, अशी भावना त्यांनी व्यक्त केली होती आणि त्यांनी अनेकदा पुनरुच्चारही केला होता. शिरवाडकर तात्यांनी मराठी भाषेच्या संवर्धन आणि समृद्धीसाठी अविरतपणे कार्य केले.
अलीकडच्या काळात मराठीला अभिजात भाषेचा दर्जा प्राप्त झाला. त्यासाठी सातत्याने प्रयत्न करणार्या सगळ्या महनीयांच्या ऋणात समस्त मराठी भाषिकांनी राहायला हवे. मराठी ही अभिजात तर आहेच; पण ती आधुनिकही आहे. अनेक नवनव्या प्रवाहांचा ती स्वतःमध्ये सतत समावेश करून घेत असते. या जगात जे नवनवीन विज्ञान आणि तंत्रज्ञान येत असते त्यातील पारिभाषिक संज्ञा स्वीकारून त्या आत्मसात करण्यात मराठी भाषा अग्रभागी आहे. विज्ञान आणि तंत्रज्ञानातील सातत्याने येत असलेल्या परिभाषा पचवून त्या परिभाषेतील विविध संकल्पना मराठीमध्ये करण्यातही मराठी भाषा अग्रभागी आहे.
कवी कुसुमाग्रजांनी आपल्या स्वातंत्र्यदेवतेची विनवणी या कवितेत...
परभाषेतही व्हा पारंगत ज्ञानसाधना करा, तरी ।
माय मराठी मरते इकडे परकीचे पद चेपु नका ॥
भाषा मरता देशही मरतो संस्कृतिचाही दिवा विझे ।
गुलाम भाषिक होऊनि अपुल्या प्रगतीचे शिर कापु नका ॥
कलम करी ये तरी सालभर सण शिमग्याचा ताणू नका ।
सरस्वतीच्या देवळातले स्तंभ घणाने तोडू नका ॥
अशी कळकळीची विनंती (स्वातंत्र्यदेवतेच्या मुखातून) देशवासीयांना केलेली आहे.
कुसुमाग्रज यांनी महाराष्ट्राच्या सांस्कृतिक क्षेत्रामध्ये मोलाचे योगदान दिलेले आहे. मराठी भाषा ही ज्ञानभाषा होण्यासाठी त्यांनी सातत्याने अथक परिश्रम घेतले आहेत. मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतींना अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस ‘मराठी भाषा गौरव दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने दिनांक 21 जानेवारी, 2013 रोजी घेतला. कुसुमाग्रजांचे मराठी साहित्य क्षेत्रात नाटककार, कथाकार, कादंबरीकार, कवी आणि समीक्षक म्हणून चौफेर योगदान आहे, ख्याती आहे. मराठीचा सन्मान वाढविण्यात ज्यांनी महत्त्वपूर्ण योगदान दिले, ज्यात ‘विवेकसिंधू’ (शालिवाहन शक 1110) हा मराठी भाषेतील पहिला ग्रंथ लिहिणारे आद्यकवी मुकुंदराज यांचे आणि मराठी भाषेला सर्वप्रथम सन 1965 मध्ये राजभाषेचा दर्जा देऊन तिच्या समृद्धीसाठी विशेष उपाययोजना करणारे तत्कालीन मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांच्याही ऐतिहासिक योगदानाचे यानिमित्ताने स्मरण केले जाते, केलेही पाहिजे.
मराठी अभिमान गीतात कविवर्य सुरेश भट म्हणतात...
आमुच्या मनामनात दंगते मराठी,
आमुच्या रगारगात रंगते मराठी,
आमुच्या उराउरात स्पंदते मराठी,
आमुच्या नसानसात नाचते मराठी!
जी मराठी भाषा ती बोलणार्या समस्त मनामनात दंगते, रगारगात रंगते, उराउरात स्पंदते आणि नसानसात नाचते, ती जगभरात केव्हाच पोहोचलेली आहे; तथापि तिचा सन्मान आपल्याच मराठी भूमीत होत आहे का? हा प्रश्न आहे.
1579 मध्ये गोव्यात आलेले फादर थॉमस स्टीफन्स हे एक इंग्रजी जेसुईट पाद्री (1549-1619) होते. जनसामान्यांत ‘बायबल’ रुजवण्यासाठी ते मराठीचे गाढे अभ्यासक बनले. मराठीविषयी ते लिहितात...
जैसे हरळांमाजी रत्नकिळा । कि रत्नांमाजि हिरा निळा । तैसी भाषांमाजी चोखळा । भाषा मराठी ॥
जैसी पुष्पांमाजि पुष्प मोगरी । किं परिमळांमाजि कस्तुरि । तैसी भाषांमाजि साजिरी । भाषा मराठी ॥
पखियांमध्ये मयोरु । ब्रुखियांमध्ये कल्पतरु । भाषांमध्ये मानु थोरु । मराठियेसी ॥
तारांमध्ये बारा रासी । सप्तवारांमध्ये रवि-शशि । या दीपिंचेया भाषांमध्ये तैसी । बोली मराठीया ॥
(पखिया म्हणजे पक्षी, मयोरू म्हणजे मोर, ब्रुखिया म्हणजे वृक्ष).
मराठी भाषा सुमारे 2,400 वर्षांहून अधिक प्राचीन आहे. जगात ज्या काही प्राचीन भाषा आहेत, त्यांच्यापैकी मराठी एक प्राचीन भाषा आहे. ही भाषा मूळ ‘महाराष्ट्री प्राकृत’ या भाषेपासून विकसित झाली आहे. नाणेघाटातील शिलालेखासारख्या प्राचीन पुराव्यांवरून मराठीचा इतिहास 2,400 वर्षांपूर्वीचा असल्याचे सिद्ध होते. मराठी भाषिकांनी या गोष्टीचे भान बाळगण्याची आवश्यकता आहे. आजवर जगातील काही भाषांचा मृत्यू झालेला आहे. जगात आज 7,000 भाषा अस्तित्वात आहेत; पण दुर्दैवाची गोष्ट अशी आहे की, दर दहा वर्षांमध्ये सुमारे 200 भाषांचा मृत्यू होत आहे. मराठी भाषेच्या बाबतीत ही चिंता आज तरी बाळगण्याचे काही कारण नाही. पण, ‘माझ्या ग्रँड सन आणि ग्रँड डॉटरला ना, मराठी बोलताना डिफिकल्टच जातं, यू नो?’ अशी वाक्ये घरोघरी - तीही अभिमानाने उच्चारली जायला लागली, तर मराठीची मृत्युघंटा वाजायला वेळ लागणार नाही. पण, ‘माझ्या नातीला तिचा बाप इंग्लिश मीडियाच्या शाळेत घालणारच हाय; पण तोपर्यंत बसू दे मराठी शाळेत,’ अशी घरोघरच्या आज्यांची-आयांची भाषा मराठी भाषा आणि संस्कृतीसाठीही घातक आहे. बर्याच मराठी पालकांना आपली मुले इंग्लिश माध्यमातून शिकतात किंवा शिकणार आहेत, याचा एक भोंगळ अभिमान वाटतो. वास्तविक, माणसाचा वंश हा मातृभाषेतून विचार करतो. मातृभाषेच्या माध्यमातून विचारांची प्रक्रिया चालत असते. म्हणून मातृभाषेतून शिकणारी मुलेच अधिकाधिक ज्ञान ग्रहण करू शकतात. कामासाठी, कारकिर्दीसाठी परदेशात वास्तव्यास असलेल्या पालकांनी आपल्या मुलांना घरीच मातृभाषेतून शिक्षण दिले पाहिजे. म्हणजे मातृभाषेसोबतच ते परभाषाही लवकर आत्मसात करायला लागतात. मातृभाषेतून शिक्षण घेतल्यानंतर मुलांचे भावविश्वही अभंग राहते, समृद्ध होत जाते, संपन्न होत जाते. पूर्वी एकदा मी एका बाईंना हे सांगायला लागलो होतो, तर त्या बाईंनी काय म्हणावं? त्या बाई म्हणाल्या, ‘तसं काही नाही ओ, यू नो? माझी मुलं करतात इंग्रजीतून विचार. तुमच्यासारख्यांना ते कळत नाही; पण मला कळतंय ना, यू नो?’
मराठी भाषेच्या सागराला ज्ञानाच्या अनेक नद्या येऊन मिळाल्यानंतर हा सागर अधिकच विशाल आणि सखोल होत जाईल. हे सारे ज्ञान मराठी शब्दांतून प्रकट होण्यासाठी नियोजनबद्ध प्रयत्न व्हायला हवेत. मराठी ही ज्ञानभाषा होण्यातील आपल्या प्रत्येकाचा एक खारीचा वाटासुद्धा मराठी भाषेचा गौरव वाढवणारा ठरणार आहे. तेव्हाच...
माझा मराठीची बोलू कौतुके । परी अमृतातेही पैजा जिंके ॥ ऐसी अक्षरे रसिके । मेळविन ॥
असे आपण सानंदे म्हणू शकेन!