चतुरस्र कलावंताचा वियोग!

चतुरस्र कलावंताचा वियोग!
Published on
Updated on

अर्धशतकाहून अधिक काळाचा अभिनयप्रवास करणार्‍या आणि रंगभूमी, मालिका, सिनेमा असा चौफेर संचार करणार्‍या जयंत सावरकर (अण्णा) यांचे निधन तमाम मराठी रसिकांना चटका लावून जाणारे आहे. अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे बिनविरोध अध्यक्ष झालेल्या अण्णांचा बॅकस्टेज कलावंतापासूनचा प्रवास अचंबित करणारा आहे. त्यांची कारकीर्द नुसतीच प्रदीर्घ नव्हती, तर त्या कारकिर्दीला लोकाश्रयही मिळाला होता.

सुमारे 60 वर्षांची अभिनय कारकीर्द असणार्‍या जयंत सावरकर (अण्णा) यांनी नुकताच जगाचा निरोप घेतला. रंगभूमी, मालिका, सिनेमा असा चौफेर संचार करणार्‍या अण्णांचा अनुभव खूप दांडगा होता. हिंदी चित्रपटसृष्टीतही त्यांनी अभिनयाची छाप पाडली होती. 2016 मध्ये पार पडलेल्या अखिल भारतीय नाट्यसंमेलनाचे ते अध्यक्ष होते. ही निवड त्यांच्या आजवरच्या कारकिर्दीतील मुकुटमणी ठरली. मुळातच, अण्णा हे अभ्यासक होते. माणसे जोडण्याची, त्यांना आपलेसे करण्याची वृत्ती त्यांच्यात होती. जुन्या काळातील नाटकांपासून ते आजच्या काळातील रंगभूमीपर्यंतच्या सर्व स्थित्यंतरांचे अण्णा साक्षीदार होते. अभिनयाच्या क्षेत्रातील तीन पिढ्यांबरोबर त्यांनी काम केले असल्यामुळे तीनही पिढ्यांच्या अडचणी त्यांना योग्य प्रकारे ज्ञात होती. नाटकात येण्यापूर्वी अण्णा कमानी इंजिनिअरिंग कंपनीमध्ये स्टेनोग्राफर म्हणून काम करत होते. आपण जे करू त्यामध्ये प्रावीण्य मिळालेच पाहिजे, हा त्यांचा सुरुवातीपासून मूलमंत्र होता आणि तो शेवपटपर्यंत त्यांनी जपला होता.

जवळपास 12 वर्षे अण्णांनी बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणून काम केले होते. हौशी नाट्यसंस्थांमधून त्यांनी सुरुवातीला लहानसहान कामे केली. मुंबई मराठी साहित्य संघात स्वयंसेवक, कार्यकर्ता म्हणूनही अण्णा काही काम करत होते. त्यांनी अनेकदा प्रॉम्टिंग केले, प्रॉपर्टी मांडण्याचे काम केले. बॅकस्टेज कलावंतापासून नाट्यसंमेलनाध्यक्ष बनण्यापर्यंतचा त्यांचा प्रवास अचंबित करणारा होता. कलाकार हा उत्तम माणूस असेल तरच तो उत्तम कलाकार होऊ शकतो, असे अण्णा नेहमी सांगायचे. अत्यंत चतुरस्र असा हा कलावंत होता. पु.लं.च्या 'व्यक्ती आणि वल्ली' या पुस्तकावर आधारित नाटकात अण्णांनी साकारलेला अंतू बर्वा अनेकांच्या आजही स्मरणात असेल.

वयाच्या विसाव्या वर्षीपासून अण्णांची अभिनयाची कारकीर्द सुरू झाली आणि सहा दशकांच्या या प्रवासात अण्णांनी 100 पेक्षा अधिक मराठी चित्रपट आणि नाटकांत काम केले. हिंदी चित्रपट आणि मालिकांमध्येही वेगळा ठसा उमटला. त्याकाळात रंगभूमीविषयक काम करणारी सर्वच माणसे व्यासंगी, उच्चशिक्षित होती. त्याचा त्यांना फायदा झाला असल्याचे ते सांगत. त्या सर्वांच्या सहवासातून मी शिकत गेलो असल्याचे प्रांजळपणाने सांगताना त्यांची जीभ कधी अडखळली नाही. इना मिना डीका, कुरुक्षेत्र, गुलाम-ए-मुस्तफा, तेरा मेरा साथ रहें, प्रतिसाद : द रिस्पॉन्स, बडे दिलवाला, युगपुरुष, रॉकी हॅन्डसम, लव्ह का तडका, वास्तव : द रिलिटी, सिंघम आदी हिंदी चित्रपटांतील त्यांच्या भूमिका उल्लेखनीय राहिल्या. अलीकडच्या काळातील उदाहरणे सांगायची झाल्यास समांतर या सुहास शिरवाळकरांच्या कादंबरीवर आधारित वेब सीरिजमध्ये त्यांनी एका ज्योतिषाची भूमिका केली होती.

याखेरीज अपराध मीच केला, अपूर्णांक, आम्ही जगतो बेफाम, एकच प्याला, लग्नाची बेडी, व्यक्ती आणि वल्ली, सूर्यास्त, सूर्याची पिल्ले अशा एकाहून एक गाजलेल्या नाटकांमधील त्यांच्या भूमिकाही प्रेक्षकांची दाद मिळवून गेल्या. तुझं आहे तुजपाशी हे नाटक 1957 मध्ये रंगभूमीवर आले तेव्हा अण्णा या नाटकासाठी बॅकस्टेजला काम करत होते. मी या नाटकात काम करीन, तर श्यामचीच भूमिका करीन, असे ठरवले होते. अखेरीस त्यांना श्यामचीच व्यक्तिरेखा मिळाली आणि 700-800 प्रयोगांमध्ये त्यांनी हा श्याम स्टेजवर साकारला. पुढे याच नाटकात आचार्यांची भूमिकाही त्यांनी केली. नाटकातला प्रत्येक शब्द लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे. त्यासाठी भाषेवर विशेष लक्ष द्या, असे ते सांगत. नैसर्गिक अभिनयावर त्यांचा विशेष भर होता. मी दामू केंकरेंचा शिष्य आहे, असे ते सांगत. त्यांच्या जाण्याने मराठी रंगभूमी, सिनेमा आणि मालिका विश्वातील एक चतुरस्र कलावंत हरपला आहे.

– अरुण नलावडे, ज्येष्ठ अभिनेते

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news