पहिला चहा : बाप रे बाप!

Mallikarjun Kharge
Mallikarjun Kharge
Published on: 
Updated on: 

‘भांडता भांडता कळ आणि धुता धुता मळ’ अशी एक म्हण आहे. भांडणात माणसाचा तोल कधी सुटेल आणि मनातला मळ कधी बाहेर पडेल, याचा काही नेम नसतो. राजकीय नेत्यांच्या बाबतीत तर हे अधिकच खरं! माईक हातात आला की, शब्दांना पाय फुटतात आणि राग अनावर झाला की, बुद्धी रजेवर जाते. आता मल्लिकार्जुन खर्गे हे काही गल्ली-बोळातले नेते नाहीत. राष्ट्रीय पक्षाचे अध्यक्ष आहेत; पण एका कार्यकर्त्याने घोषणा दिल्या, टोकले आणि त्यांच्या संतापाचा पारा चढला. मग काय, मुद्द्याचं उत्तर मुद्द्याने देण्याऐवजी गाडी थेट बापापर्यंत पोहोचली!

राजकारणात विरोधकाला गप्प करण्याचे अनेक मार्ग असतात; पण बाप काढणे हा काही त्यातला अधिकृत संसदीय मार्ग नाही. दुसऱ्याच्या बापाचा उद्धार करून स्वतःच्या विचारांची उंची वाढत नाही. राजकारणात भाषण करताना कार्यकर्ते टाळ्या वाजवतात, घोषणा देतात, नेते खूश होतात; पण टाळ्यांच्या गजरात स्वतःच्या शब्दांवरचा ताबा सुटला, तर दुसऱ्या दिवशी त्याच शब्दांचा गजर बातम्यांमध्ये होतो. मग, स्पष्टीकरणांची धावपळ, समर्थकांची सारवासारव आणि राजकीय विरोधकांची दिवाळी... सगळं एका मागोमाग एक! निव्वळ एका वाक्याने एवढा राजकीय मनोरंजनाचा कार्यक्रम होतो की, आयोजकांनाही तिकीट लावावेसे वाटेल. मुळात राजकीय विरोधकाने प्रश्न विचारला की, त्याला उत्तर द्यायचे असते. त्याच्या बापाला चर्चेत बोलावून काय साध्य होते? हे राजकारण आहे की कौटुंबिक स्नेहसंमेलन?

खर्गे असोत किंवा अन्य कुणी, मोठ्या पदावर बसलेल्या व्यक्तीने संयम राखणे अपेक्षित असते. कारण, सामान्य माणूस रागावला, तर त्याचे भांडण होते. मोठा नेता रागावला, तर त्याची राष्ट्रीय बातमी होते. तोंडातून निघालेला शब्द आणि धनुष्यातून सुटलेला बाण परत येत नाही. कार्यकर्त्याने दोन घोषणा दिल्या म्हणून नेत्यांनी शब्दांची घसरगुंडी करायची? मग, कार्यकर्त्यांनी घोषणा द्यायच्या की नेत्यांना ध्यानधारणा शिकवायची?

आणि समजा, राजकीय विरोधकांनीही उद्या हाच कित्ता गिरवला, तर मग बापांच्या वंशावळींचीच चर्चा होईल. जनतेच्या प्रश्नांची कोण आठवण काढणार? शेवटी, राजकारणात विरोधकाला हरवायचे असते, त्याच्या बापाला नाही! मुद्द्यांवर लढा, विचारांनी उत्तर द्या. गाडीचा ब्रेक फेल झाला तर अपघात होतो. जिभेचा ब्रेक फेल झाला, तर राजकीय अपघात होतो. फरक एवढाच, गाडी दुरुस्त करता येते; पण विधान दुरुस्त करण्यासाठी पत्रकार परिषद घ्यावी लागते!

- दिनू मास्तर

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news