

मृणालिनी नानिवडेकर
महाराष्ट्रात प्रश्न विचारणारा आणि व्यवस्थेला जाब मागणारा विवेकाचा आवाज परीक्षार्थी तरुणांच्या आंदोलनापासून उत्सवाच्या बदलत्या स्वरूपापर्यंतच्या घडामोडींपर्यंत अधिक ठळकपणे उमटू लागला आहे.
जंतर-मंतरच्या आंदोलनाने जनरोषाची दखल घेतली जाते हे लक्षात आले. प्रश्न हाताशी घेऊन त्याबद्दल यंत्रणांना जाब मागण्याची पद्धत रूढ होते आहे. गणेशोत्सवाच्या हिडीस स्वरूपाला विरोध करण्यासाठीचे विवेकी आवाज समोर येत आहेत. तो आवाज मुस्काडीत मारून बंद करण्याचा गावगुंडपणा केला तर लोक संतापताहेत. महाराष्ट्राच्या विवेकाला साद घालणाऱ्या विद्यानंद बापटप्रणीत गणेशोत्सव सफाई अभियानापूर्वी आधी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सुरू असलेल्या आंदोलनावर.
बेरोजगारीचे प्रमाण प्रचंड मोठे. शासकीय नोकरी अनेक अर्थांनी महत्त्वाची. तरुणाई या नोकरभरतीकडे डोळे लावून बसते. एमपीएससी पास झाल्यानंतर जन्माचे भले होईल, असे युवकांना वाटत असल्याने या परीक्षेला बसणाऱ्यांचे प्रमाण सातत्याने वाढते आहे. सहा-सात वर्षे गावातील घराकडून पैसे मागून एमपीएससीच्या परीक्षा देत नशिबाचे कवाड खुले करण्यासाठी युवक आणि युवती अभ्यास करतात. मागणी खूप जास्त आणि पुरवठा कमी या अर्थशास्त्रानुसार इथेही परीक्षार्थी जास्त अन् लाभार्थी कमी अशी गत. आशा चिवट असल्याने प्रयत्न केले जातात. अशावेळी परीक्षांमध्ये फुटलेल्या पेपरचे खापर राज्य लोकसेवा आयोगाच्या, एमपीएससीच्या प्रमुखांवर फोडणे सुरू झाले आहे.
तरुण आमदार महाराष्ट्रभर दौरे करत जनतेचे प्रश्न समजून घेतात, त्यांना वाचा फोडतात. राज्यात विरोधी पक्षनेता नेमला गेला नसताना, असे फिरणे महत्त्वाचे ठरते. सरकारला जाब विचारणे गरजेचे असते. युवा नेते त्यातून जनमानसावर स्वतःची छबी उमटवण्याचा प्रयत्न करतात. एमपीएससीबाबतच्या आंदोलनात झालेल्या घटनेशी काही संबंध नसलेल्या अधिकाऱ्यांना लक्ष्य करणे योग्य तर नाहीच, उलट विश्वासार्हतेवर प्रश्न निर्माण करणारे आहे. युवकांना न्याय मिळावा, नोकऱ्या झपाट्याने मिळाव्यात याबद्दल आंदोलन करणे योग्यच. मात्र, त्यात राजकारण आणून अधिकाऱ्याला गोवणे चूक आहे. व्यवस्थेला लोकानुकूल निर्णय घेणाऱ्या एखाद्या अधिकाऱ्याला तो मुख्यमंत्री यांच्या कार्यालयात काही काळ कामाला होता म्हणून धारेवर धरणे योग्य नाही. आतापर्यंतचे अध्यक्ष कुणाच्या तरी संपर्कात असणारच. तरुण नेत्यांनी न्याय मिळवून देणारे आंदोलन करावे, राजकीय हिशेब चुकते करण्यासाठी आंदोलनातून अधिकाऱ्यांना लक्ष्य करू नये. युवकांचा रोष शांत करण्यासाठी सरकारी पातळीवर प्रयत्न होतील, याचा आग्रह धरावा. मुख्यमंत्री होण्याची तयारी काही तरुण करत असतात. महत्त्वाकांक्षा बाळगणे चांगले; पण त्या तयारीत विवेकाचे भान गमावले जाऊ नये.
महाराष्ट्राला काय झालेय ते कळत नाही. संस्कृतीचा अभिमान असलेला गणेशोत्सव हिडीस पातळीवर का गेला, याचे आत्मचिंतन यापूर्वीच करायला हवे होते. पुण्यासारख्या समाजसुधारणेचा आणि समाजाला गती देण्याचा वसा बाळगणाऱ्या महानगरात तर यादृष्टीने हालचाली आधीच व्हायला हव्या होत्या. राजकारणी मंडळांचे बटीक झाले. प्रचंड मोठ्या आवाजाच्या डेसिबलमुळे माणसे मृत्युमुखी पडत असताना समाजमन का पेटून उठत नव्हते? राजकारणी कोणत्याही सामाजिक सुधारणा प्रत्यक्षात आणायला फार उत्सुक नसतात; कारण त्यांना जिंकून यायचे असते. कुठलाही वर्ग नाराज होणार नाही याची काळजी घ्यायची असते. परंतु, गुंड प्रवृत्तीचे लांगुलचालन कुठवर? या प्रश्नाचा जाब त्यांना विचारायला हवा. समाजमनाने मात्र विवेकवादाची कास धरणे सोडायचे नसते. एखादा विद्यानंद बापट ८ वर्षे पुण्यात राहिल्यानंतर ही समस्या बोलून दाखवत असेल तर तो बाहेरचा का आतला, हे प्रश्न न करता जनमन त्याच्या बाजूने का आहे? प्रश्न विचारण्याचे धाडस ही व्यक्ती का दाखवते आहे, याकडे लक्ष देणे आवश्यक असते. मुद्दा बापट हा नाही. तर मुद्दा कंठाळी गणेशोत्सव हा आहे. देवानेही कानावर हात ठेवावेत अशा पद्धतीच्या आवाजाचा गोंगाट उत्सवकाळात महाराष्ट्रात सुरू असतो. महाराष्ट्राचे मन म्हणजे हा आवाज का? समाज प्रबोधनाची, प्रश्न विचारण्याची, देशाच्या सामाजिक चळवळीला दिशा देण्याची क्षमता या डॉल्बीच्या आवाजासमोर क्षीण होऊन बसते? चक्क झुकते? मराठी समाजाने आजवर आवाज नको हा हट्ट का धरला नाही, असा हा प्रश्न आहे. पुणेकर आता हे आंदोलन घेऊन उभे राहिले हे उत्तम. जनतेचा रेटा फार मोठा असल्यामुळे राजकीय नेतेही आता मर्यादा पाळून उत्सव करा, असे म्हणू लागले आहेत. कदाचित डीजे, साऊंड सिस्टीमसारख्या अत्यंत घाणेरड्या प्रथा बंद होऊ शकतील. आशा जिवंत ठेवणे गरजेचे आहे.
गेली दहा वर्षे तरी कंठाळी डीजे आणि हिडीस बेंजो महाराष्ट्राच्या महानगरांमध्ये धुमाकूळ घालत होता. या ओंगळवाण्या उत्सवाबद्दलचा विवेकाचा आवाज यावेळी जसा जागृत झाला आहे तसा खरे तर आजवर कधीच झाला नव्हता. उत्सवात मंगलमयता आणावी यासाठी कित्येकांनी प्रयत्न केले खरे; पण त्याला सामाजिक दबाव गटाचे स्वरूप येत नव्हते. मध्यमवर्गीय कानावर हात ठेवून घरी बसत होते. गणेशोत्सव काळात राहण्याच्या जागा बदलत होते. आता विद्यानंद बापटांमुळे सगळी जनता बोलू लागली आहे. जंतर-मंतर येथे युवकांच्या आंदोलनानंतर सरकारबद्दल आदर असलेली मंडळीही जे वाईट आहे त्याला बोल लावू लागली आहे. व्यवस्थेतील ओंगळपणा दूर होतच नसल्यामुळे जे होते आहे ते बघून अगतिक झालेले लोक का पेटले याचा अर्थ समजून घ्यायला हवा. राजकारणी हळूहळू या विवेकी स्वराचा अंदाज घेत स्वतःचे मत बनवू लागले. प्रारंभी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जे काय व्हावे ते सामोपचाराने आणि सहमतीने व्हावे, असे विधान केले. समाजाचा आवाज जसा वाढू लागला तशी महाराष्ट्रातील उत्सवांची गत बदलणे आवश्यक असल्याचे कुठेतरी राज्यकर्त्यांनाही पटू लागल्याचे दिसते.
मुंबईत तर हा गणेशोत्सव इथल्या खास अवतारात प्रगट होत असतो. मुंबापुरीत पुणेकरांसारख्या एखाद्या प्रश्नाला वेळ देण्याची चैन करता येत नाही. मुंबईतील नागरिकांनाही उत्सवामुळे रस्ते अडवणे हे नकोसे वाटते. अर्थात, सातत्याने अतिक्रमणांचा सामना करणाऱ्या मुंबईकरांना कोणी मंडप घातले किंवा उतरवले तरी त्याचे फारसे काही वाटायला मुळात वेळच नसतो. तरीही मुंबईकरांनीही सामाजिक सुधारणांत स्वतःचे वेगळेपण दाखवायची गरज आहे. मुंबई देशाच्या हाकेला कायम प्रतिसाद देत आली आहे.
प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्ती प्रदूषण करत असतील तर त्या नकोत, हा विचार मांडला गेला पाहिजे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीदेखील यासंदर्भात आवाहन केले आहे. गेल्यावर्षी न्यायालयाने केवळ यावर्षी अशा मूर्तींच्या विसर्जनाला परवानगी देता येईल, असे नमूद केले होते; मात्र याही वर्षी मंडळांनी प्लास्टर ऑफ पॅरिसला पर्याय नसल्याची भूमिका घेतली आहे ती काहीशी अनाकलनीय आहे. असे वागून पर्यावरणाच्या समस्यांत भर टाकून काय मिळत असते? गणेशोत्सवात मुंबईत सुमारे ३,००० कोटींची उलाढाल होत असते. मिठाईच्या विक्रीत ४० टक्के वाढ होते. अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे या गोष्टीकडे नक्कीच पाहत असतील.
विवेक हा महाराष्ट्रातील सर्वसामान्यांनीही व्यक्त करायला हवा. केवळ आवाज वाढवून आणि मोठाली ध्वनिक्षेपके समोर आणून गणेश प्रसन्न होतो का, याचे काय उत्तर हे ज्याने त्याने शोधावे. खरे तर राजकारणी-कंत्राटदार यांची अभद्र युती जनतेच्या रोषाचा विषय आहेत. सार्वजनिक मंडळे या अभद्र युतीचा लाभ घेत गणेशोत्सवात पैसा आणतात. काही मंडळे लोकोपयोगी कामही करतात. या प्रक्रियेतून कार्यकर्ते तयार होतात. मात्र, महत्त्वाचा झाला आहे तो आवाज, झिंग आणणारी वाद्ये. हे आता पुरे झाले. यातून बाहेर पडण्यासाठी देव सर्वसंबंधितांना प्रकाश दाखवो, ही प्रार्थना.