

रखरखत्या उन्हाळ्यानंतर धरणीमातेलाच नव्हे, तर प्रत्येकाच्या मनामनालाही हिरवा गारवा देत येणारा आषाढ महिना हवाहवासाच वाटतो यात शंकाच नाही. अशा आषाढाचा पहिलाच दिवस हा महाकवी कालिदासांशी जोडलेला आहे, हा आणखी एक सुंदर योग आहे.
एखाद्या कवीच्या काव्यपंक्तीमुळे एखादा दिवस त्या कवीशी जोडला जाणे, हे जगभरातील कदाचित एकमेव उदाहरण असेल. ‘मेघदूत’ या अजरामर विरहकाव्यातील दुसरा श्लोक या दिवसाच्या उल्लेखाने सुरू होतो. हा मूळ श्लोक असा : ‘आषाढस्य प्रथमदिवसे मेघमाश्लिष्टसानुं। वप्रक्रीडापरिणतगजप्रेक्षणीयं ददर्श ॥2॥’ महाकवी कालिदासांच्या काळाच्या पटलावर अजरामर ठरलेल्या संस्कृत रचनांमध्ये ‘मेघदूत’चा समावेश होतो. हे एक अनोखे दूतकाव्यही आहे. यामधील दूत आहे आषाढाच्या पहिल्या दिवशी पर्वतशिखरांभोवती घुटमळत असलेला श्यामल मेघ. त्याला दूत बनवणारी व्यक्ती म्हणजे एक यक्ष आहे. देवांचा कोषाध्यक्ष असलेल्या कुबेराच्या अलकापुरीत अशा यक्षांचा निवास असतो. कर्तव्यात कसूर केल्याने या तरुण यक्षाला कुबेराने शिक्षा म्हणून एक वर्षासाठी अलकापुरीतून बाहेर काढले होते आणि तो रामगिरी पर्वतावर राहत होता. केवळ देहानेच तो या पर्वतावर होता आणि त्याचे मन, हृदय गुंतले होते अलकापुरीत राहणार्या आपल्या पत्नी किंवा प्रेयसीमध्ये! तिच्या विरहात जणू जळत असलेला हा यक्ष या पावसाळी ढगालाच आपले दूत बनवून तिच्याकडे पाठवू इच्छितो.
‘मेघदूत’चे दोन खंड आहेत. ‘पूर्वमेघ’ या खंडात यक्ष ढगाला रामगिरी ते अलकापुरीदरम्यानच्या मार्गाचे वर्णन करून सांगतो आणि ‘उत्तरमेघ’ खंडात त्याचा प्रसिद्ध असा विरहदग्ध संदेश आहे, जो महाकवी कालिदासांच्या प्रेमाने ओथंबलेल्या अंतःकरणाची हृदयंगम रचना आहे. काही विद्वानांनी ‘मेघदूत’ला कालिदासांचेच आत्मकथन मानले आहे. अर्थात, कोणतीही रचना ही त्याच्या कर्त्याच्या भावनांचे किंवा विचारांचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष प्रतिबिंबच असते. दूतकाव्य ही संकल्पना महाभारताच्या काळापासूनच पाहायला मिळते. महाभारताचेच एक उपाख्यान असलेल्या नल-दमयंतीच्या कथेत या प्रेमीयुगुलांनी एका हंसाला आपला दूत बनवल्याचे वर्णन आहे. रामायण आणि महाभारताला ‘आर्षकाव्य’ म्हणजेच ऋषींनी संस्कृत भाषेत लिहिलेले काव्य असे म्हटले जाते. त्यांच्यावर आधारित अन्य कवींनी नंतर लिहिलेल्या संस्कृत काव्यांना ‘उपजिव्य काव्य’ असे म्हणतात. रामायण आणि महाभारतानंतर सर्वाधिक प्रसिद्ध संस्कृत रचना कालिदासांच्याच आहेत. त्यांच्या सप्तरचनांमध्ये ‘रघुवंश’ आणि ‘कुमारसंभव’ या महाकाव्यांचा तसेच ‘मेघदूत’ आणि ‘ऋतुसंहार’ या खंडकाव्य किंवा गीतीकाव्यांचा समावेश होतो. कालिदासांच्या तीन प्रसिद्ध संस्कृत नाटकांमध्ये ‘अभिज्ञानशाकुंतलम’, ‘विक्रमोर्वशीय’ आणि ‘मालविकाग्निमित्र’ यांचा समावेश आहे. जगभरात नाटककार आणि कवी म्हणून शेक्सपिअरची ख्याती आहे; मात्र सोळाव्या-सतराव्या शतकातील या महान कवी-नाटककाराच्या किती तरी शतके आधी म्हणजेच चौथ्या-पाचव्या शतकात आपल्या महान भारत देशात संस्कृत भाषेला अजरामर अक्षरलेणे बहाल केलेला महाकवी कालिदास होऊन गेला, हे कुण्याही भारतीयाने कदापि विसरता कामा नये. अनेक पाश्चात्त्य साहित्यिकांनी, विद्वानांनीही कालिदासांना गौरवले आहे. जर तुम्हाला या मर्त्यलोकातच स्वर्ग अनुभवायचा असेल, तर माझ्या मुखातून केवळ एकच नाव बाहेर पडते, ते म्हणजे महाकवी कालिदासांची रचना ‘शाकुंतलम’ असे उद्गार जर्मन कवी गटे यांनी काढले होते.
महाभारतातील शकुंतलेच्या आख्यानावर आधारित हे नाटक अद्यापही लोकप्रिय आहे आणि त्यावर आधारित समंथा रुथ प्रभूचा एक चित्रपट अलीकडेच येऊन गेला होता. ‘मेघदूत’लाही अशीच नित्यनूतन लोकप्रियता लाभलेली आहे. प्राचीन काळापासूनच प्रेम, विरह अशा भावनांवर आधारित काव्यरचना होत आहेत. त्यामध्ये ‘मेघदूत’ने स्वतःचे असे एक उत्तुंग स्थान निर्माण केलेले आहे. त्यामधील कवी कल्पना, श्लोकांची सुंदर रचना, भाव आणि आशय अशा सर्वच बाबतीत हे रसाळ काव्य सरस आहे. अशा अनेक सुंदर रचनांचे कर्ते महाकवी कालिदासांचे आषाढाच्या पहिल्या दिवशी केलेले हे कृतज्ञतापूर्वक स्मरण!