

अंबाजोगई : शेगावहून पंढरपुरकडे निघालेल्या संतश्रेष्ठ गजानन महाराज यांच्या पालखीचे मंगळवारी दुपारी अंबाजोगाई शहरातील भगवानबाबा चौकामध्ये शहरवासियांच्या वतीने जंगी स्वागत केले. भेटी लागे जीवा लागलिसे आस या अभंगाप्रमाणेच वारकर्यांच्या चेहर्यावर पंढरपुरची आस लागल्याचे दिसून आले.
दोन दिवसाच्या परळीतील मुक्कामानंतर आज मंगळवारी दुपारी साडेतीनच्या सुमारास ग्रामदेवता माता योगेश्वरी देवीच्या नगरीमध्ये संत गजानन महाराजांच्या पालखीचे आगमण झाले. भगवान बाबा चौकात पालखींच्या श्रींचे गावातील प्रतिष्ठीत नागरिक व भाविकांच्या वतीने स्वागत केले. त्यानंतर या पालखीची मिरवणूकी डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक, सावरकर चौक, मंडी बाजार गुरूवार पेठ, छत्रपती शिवाजी महाराज चौक मार्गे, यशवंतराव चव्हाण महाविद्यालयाच्या प्रांगणात जावून विसावली. या पालखीचे शहरातील चौका-चौकामध्ये रांगोळ्या सजवून पालखीचे जोरदार स्वागत केले. या पालखी मिरवणूकीत वारकर्यांनी विठू नामाच्या गजराचा ठेका धरल्यामुळे भाविकांत एक चैतन्य निर्माण झाले. आज मंगळवारी अंबाजोगाई शहरात पालखीचा मुक्काम असून सकाळी नाष्टा केल्यानंतरच ही पालखी लोखंडी सावरगाव येथे मार्गस्थ होणार आहे. पालखीतील वारकर्यांना शहरातील विविध सामाजिक कार्यकर्त्यांनी आल्पोहाराची व्यवस्था केली होती. त्यामुळे शहर आज या पालखीमुळे भक्तीमय झाले होते. तसेच आंबा नगरीत पालखी येताच वरूणराजा चे आगमन झाले होते देवीचे आराधी गीत गात पालखी मुक्कामी पोहचली.