

लोकशाहीची स्वातंत्र्य, समानता, बंधुता, न्याय, सहिष्णुता आणि मानवी प्रतिष्ठा ही मूल्ये जपण्यासाठी सतत संघर्ष करावा लागतो. मोठी किंमत मोजण्याची तयारीही ठेवावी लागते. व्हेनेझुएलाच्या विरोधी पक्षनेत्या मारिया कोरिना माचाडो यांनी याच मूल्यांसाठी दिलेल्या लढ्याचा वैश्विक गौरव झाला आहे, तो शांततेसाठी दिल्या जाणाऱ्या नोबेलने! सारे जगच लोकशाहीने दिलेल्या स्वातंत्र्यासाठी आणि खऱ्या समता-बंधुत्वासाठी रस्त्यावर उतरत असताना, सामान्य माणूस युद्धखोरी, सामाज्यवादाच्या भयंकर झळा झेलत असताना, लोकशाहीची गळचेपी आणि संकोच सुरू असताना त्यांचा होत असलेला हा गौरव ठळकपणे उठून दिसतो. एका शक्तिशाली सत्तेशी एकहाती झुंज देणे एखाद्या महिलेसाठी नक्कीच सहज शक्य गोष्ट नाही; मात्र माचाडो यांनी स्थानिक जनतेमध्ये लोकशाही रुजवण्यासाठी लोकआंदोलन उभे केले. नागरिकांना आपल्या कर्तव्याची जाणीव करून देत सरकारच्या चुकांवर नेमके बोट ठेवणाऱ्या माचाडो हुकूमशाही वृत्तीच्या व्हेनेझुएला सरकारच्या डोळ्यात खुपल्या नसत्या तरच नवल! 2010 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली. विक्रमी मतांनी राष्ट्रीय सभेवर निवडून गेल्या. लोकशाहीची नवी पहाट उजाडत असल्याचे ते संकेत होते. हेच तेथील सरकारसाठी अडचणीचे ठरले.
सर्वसामान्यांच्या हक्कासाठी त्यांनी दिलेला आवाज सहन न झाल्याने थातूरमातूर कारण पुढे करत त्यांना सभागृहातून बाहेर काढण्यात आले. लोकांमधून निवडून गेलेल्या प्रतिनिधीला अशाप्रकारे सभागृहातून हाकलून देणे हा सभागृहाचाच नव्हे, तर लोकशाहीचाही मोठा अपमान होता; मात्र या अपमानाने माचाडो यांच्यातील दृढता आणि कणखरपणा वाढवला. हार न मानता त्यांनी व्हेन्टे व्हेनेझुएला या विरोधी पक्षाची स्थापना केली. समविचारी गटांना एकत्र आणून हुकूमशाहीविरोधात आवाज उठवण्यास सुरुवात केली. गेल्या निवडणुकीपूर्वी जनआंदोलन उभे केले. निवडणूक झाल्यानंतर त्यामध्ये झालेल्या अनियमिततेवर बोट ठेवून त्यांनी यंत्रणेला जाब विचारण्यास सुरुवात केली; पण सत्ताधारी पक्षाने सर्व यंत्रणा हाताशी धरून त्यांचे आंदोलन मोडून काढले. त्यांना अटक करण्यात आली. त्यांनी केलेले आरोप त्यांना मागे घेण्यास सांगण्यात आले. नाईलाजाने माचाडो यांना सत्तेपुढे झुकावे लागले, तरीही त्या खचलेल्या नाहीत. त्यांनी नव्या दमाने हा लढा सुरू केला.
बलाढ्य सत्तेविरोधात लढा उभारून त्याला हैराण करण्याची त्यांची ताकद ओळखून नोबेल समितीने त्यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले. औद्योगिक अभियांत्रिकी आणि वित्तशास्त्र या विषयातून पदवी संपादन केलेल्या उच्चशिक्षित मारिया माचाडो यांनी मनात आणले असते, तर त्या एखाद्या मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये उच्च पदावर काम करू शकल्या असत्या. अमेरिकेसारख्या शेजारी राष्ट्राने त्यांना सन्मानाने आपल्या उद्योगांमध्ये चांगले पद दिले असते; पण त्यांचा पिंड समाजातील दुर्बल घटकांसाठी झटण्याचा असल्याने त्यांनी सामाजिक क्षेत्रात झोकून देण्याचे ठरवले. विशेषत: अनाथांसाठी विशेषत: रस्त्यावर राहणाऱ्या मुलांसाठी त्यांनी मदतीचा हात पुढे केला. मुलांसाठी काम करतानाच लोकशाहीतील मूलभूत अधिकार नागरिकांना सहजासहजी मिळत नसल्याचे त्यांच्या लक्षात आले. म्हणून त्यांनी सुमाते या संस्थेची स्थापना केली. सत्ताधीशांविरोधात लढत असताना त्यांना अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा नैतिक पाठिंबा मिळाला. म्हणून माचाडो यांनी हा पुरस्कार ट्रम्प यांना अर्पण केला. त्यांनी हा पुरस्कार जाहीर होताच तत्काळ ट्रम्प यांना फोन करून त्यांचे आभार मानले. ट्रम्प यांनीही माचाडो यांचे कौतुक केले.
अराजकसदृश स्थिती असताना त्या स्थितीशी झुंजत माचाडो यांनी लोकशाही जिवंत ठेवण्याचे प्रयत्न चालवले आहेत, अशा शब्दांत ट्रम्प यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या; पण त्याच वेळी हा पुरस्कार मला मिळायला हवा होता, हे सांगण्यास ते विसरले नाहीत. भारत आणि पाकिस्तान यांच्यात मे महिन्यात झालेल्या युद्धानंतर शांततेचा नोबेल पुरस्कार आपल्यालाच मिळायला हवा, यासाठी ट्रम्प यांनी सातत्याने वातावरणनिर्मिती केली होती. सात महिन्यांमध्ये आपण सात युद्धे रोखली, असा दावा करत ‘नोबेल’वर आपलाच अधिकार आहे, अशा थाटात ट्रम्प वावरत होते. इतकी ‘उत्तुंग’ कामगिरी करूनही नोबेलची समिती आपली हवी तशी दखल घेत नाही, अशी खंत त्यांनी वारंवार व्यक्त केली होती. संयुक्त राष्ट्राच्या आमसभेतही त्यांनी हाच पाढा वाचला होता. नोबेल पुरस्कारासाठी ट्रम्प पात्र ठरतात का, या प्रश्नावर अवघ्या 22 टक्के लोकांनी होकार भरला, तर 76 टक्के लोकांनी अपात्र ठरवले होते. दोन टक्के लोक यावेळी तटस्थ राहिले. यावरून ट्रम्प यांची जगभरातील विश्वासार्हता लक्षात येण्यास हरकत नाही. वास्तविक, जगात अनेक ठिकाणी सुरू असलेल्या उद्रेकांमध्ये तेल ओतून तो शांत करण्याचा बनाव करण्यात ट्रम्प यांचा हात कुणीच धरू शकत नाही.
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्ध आपण थांबवले, हे ट्रम्प यांनी तब्बल 30 वेळा जगाला ओरडून सांगितले. सुरुवातीला भारताने त्याकडे दुर्लक्ष केले; पण अती झाल्यानंतर ट्रम्प यांचा दावा खोडून काढला. ट्रम्प तोंडावर पडले, तरी ते सुधारले नाहीत. मुळात ट्रम्प युद्धखोर आहेत. अमेरिकेकडून मिळालेली युद्धसामग््राी वापरून आणि अमेरिकेच्याच परवानगीने इस्रायलने इराणच्या अण्विक तळांवर हल्ले घडवले. गाझा युद्धातही तेल ओतणारे तेच होते. आंतरराष्ट्रीय स्तरावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी प्रचंड मुत्सद्दीपणा आणि संयम लागतो. राजनैतिक सभ्यताही असावी लागते. एखाद्या गोष्टीसाठी मनापासून प्रयत्न करावे लागतात आणि यातील एकही गुण ट्रम्प यांच्याकडे नाही. मुळात आजपर्यंतच्या अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांमध्ये ट्रम्प हेच सर्वांत वादग््रास्त अध्यक्ष ठरले आहेत. राष्ट्रप्रमुख म्हणून घेतलेल्या अनेक निर्णयांवर अमेरिकेतील जनतेने तीव आक्षेप नोंदवलेले आहेत. त्यांच्या अनेक निर्णयांना आव्हान दिले गेले आहे, तरीही ट्रम्प यांना शांततेच्या नोबेलची आस शेवटपर्यंत लागून राहिली होती. नोबेल पुरस्कार समितीने त्यांना त्यांची जागा दाखवून दिली.