Lieutenant General Susan Coyle | लेफ्टनंट जनरल सुसान कोयल

Lieutenant General Susan Coyle |
Lieutenant General Susan Coyle | लेफ्टनंट जनरल सुसान कोयल
Published on
Updated on

मुरलीधर कुलकर्णी

ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षांच्या लष्करी इतिहासात एक सुवर्ण पान लिहिले गेले आहे. लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांची देशाच्या पहिल्या महिला लष्करप्रमुख म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. ही केवळ एका व्यक्तीच्या पदोन्नतीची गोष्ट नसून, जागतिक लष्करी पटलावर महिलांच्या वाढत्या कर्तृत्वावर उमटलेली मोहोर आहे. ऑस्ट्रेलियाच्या लष्करी परंपरेत आजवर एकाही महिलेने या सर्वोच्च पदापर्यंत मजल मारली नव्हती. त्यामुळे सुसान यांची ही निवड ऐतिहासिक आहे. पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांनी 13 एप्रिल 2026 रोजी त्यांच्या नावाची घोषणा केली, तेव्हा संपूर्ण जगाचे लक्ष या रणरागिणीकडे वेधले गेले. कोयल या जुलै 2026 मध्ये लेफ्टनंट जनरल सायमन स्टुअर्ट यांच्याकडून पदभार स्वीकारतील. ‘कोयल’ हे मूळ आयरिश आडनाव असून त्या पूर्णतः ऑस्ट्रेलियन वंशाच्या आहेत.

सुसान कोयल यांचा जन्म 21 मे 1970 रोजी क्वीन्सलँडमधील कॅर्न्स येथे एका सर्वसामान्य कुटुंबात झाला. त्यांचे वडील साखर कारखान्यात कामाला होते, तर आईने घराची जबाबदारी सांभाळली. कोणत्याही मोठ्या लष्करी पार्श्वभूमीशिवाय सुसान यांनी 1988 मध्ये कॅडेट म्हणून ऑस्ट्रेलियन डिफेन्स फोर्सेस अकादमीत प्रवेश केला आणि तिथूनच त्यांच्या झंझावाती कारकिर्दीला सुरुवात झाली. रॉयल मिलिटरी कॉलेज, डंट्रून येथून प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर त्यांनी ‘रॉयल ऑस्ट्रेलियन कॉर्प्स ऑफ सिग्नल्स’मध्ये सेवा सुरू केली. तंत्रज्ञान आणि लष्करी दळणवळण क्षेत्रात त्यांनी सुरुवातीला विशेष प्रावीण्य मिळवले. शिक्षण आणि प्रशिक्षणाप्रति असलेल्या ओढीमुळेच त्यांनी संरक्षण आणि धोरणात्मक अभ्यासात पदव्युत्तर पदवीही मिळवली.

सुसान यांनी अफगाणिस्तानमधील संघर्षात महत्त्वाची भूमिका बजावली. जिथे दळणवळण आणि लष्करी हालचालींच्या समन्वयाची मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. याशिवाय मध्यपूर्वेतील विविध मोहिमांमध्ये त्यांनी आपल्या नेतृत्वाची चुणूक दाखवली. 2020 मध्ये जेव्हा त्यांची नियुक्ती ‘जॉईंट टास्क फोर्स 633’च्या कमांडरपदी झाली, तेव्हा त्यांनी एक नवा विक्रम प्रस्थापित केला होता. मध्य पूर्वेतील ऑस्ट्रेलियाच्या संपूर्ण लष्करी ऑपरेशनचे नेतृत्व करणार्‍या त्या पहिल्या महिला अधिकारी ठरल्या होत्या. या मोहिमांमधील त्यांच्या योगदानाबद्दल त्यांना ‘डिस्टिंग्विश्ड सर्व्हिस क्रॉस’ आणि ‘मेडल ऑफ द ऑर्डर ऑफ ऑस्ट्रेलिया’ यांसारख्या प्रतिष्ठेच्या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे.

वैयक्तिक आयुष्यात सुसान कोयल या पत्नी आणि तीन मुलांच्या माता आहेत. त्यांचे पतीही लष्करात असल्याने लष्करी जीवनातील आव्हाने पेलणे त्यांना सुकर झाले. त्यांनी अत्यंत कौशल्याने कौटुंबिक जबाबदार्‍या आणि देशाप्रती असलेले कर्तव्य यांचा समतोल राखला आहे. आधुनिक युगात लष्कराचे नेतृत्व करण्यासाठी केवळ शारीरिक सामर्थ्य नाही, तर धोरणात्मक चपळता आणि तांत्रिक ज्ञान किती महत्त्वाचे असते, याचे सुसान कोयल या उत्तम उदाहरण आहेत. जुलैमध्ये त्या पदभार स्वीकारतील, तेव्हा त्या केवळ ऑस्ट्रेलियन लष्कराचे नेतृत्व करणार नाहीत, तर जगभरातील लाखो तरुणींना लष्करी सेवेत येण्यासाठी प्रेरणा देतील. त्यांची निवड जागतिक स्तरावर स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने टाकले गेलेले एक आश्वासक पाऊल आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news