

दहशत निर्माण करणार्यांना दहशतवादी असे संबोधले जाते. त्या अर्थाने महाराष्ट्रातील ‘बिबटे’ नावाचे दहशतवादी राज्यात जागोजागी दिसून येत आहेत आणि त्यांनी मानवांवर चांगलीच दहशत बसवली आहे. उत्तर पुणे, तसेच जुन्नर, अकोले, नाशिक, कोल्हापूर या भागात अनेक बिबट्यांचा मुक्त संचार आहे. आजपर्यंत जंगल आणि गावापर्यंत असणारा बिबट्या थेट शहरातही येतो. हायवेवरदेखील दिसून येतो. बिबट्या हा प्राणी कोणत्याही कारणाशिवाय मानवावर हल्ला करणारा म्हणून ओळखला जातो. हा निशाचर असल्यामुळे संध्याकाळनंतर बिबट्याप्रवण क्षेत्रातील लोक घराबाहेर पडत नसतात. बिबट्यांची संख्या वाढलीय. त्यामुळे आजकाल ते कधीही हल्ला करत आहेत.
बिबट्यांच्या हल्ल्यापासून वाचण्यासाठी खिळे असलेला गळ्याभोवती बांधायचा पट्टा आधी परिसरातील कुत्र्यांसाठी उपलब्ध होता. आता चक्क माणसे आणि महिला हा पट्टा गळ्यामध्ये बांधून शेतात कामाला जात आहेत. भक्षकवर्गातील प्राणी नेहमी माणसाच्या किंवा प्राण्यांच्या गळ्याला जबड्याने विळखा घालत असतात. गळ्याभोवती असे काही संरक्षक अणकुचीदार असेल, तर बिबट्या हल्ला करेल; परंतु जीव घेऊ शकणार नाही, हे निश्चित!
दररोज कुठे ना कुठेतरी बिबट्याने माणसांवर हल्ला केल्याच्या बातम्या येत असतात. या बिबट्यांच्या मुक्त संचाराचे सामाजिक परिणामही दिसायला लागले आहेत. परवाच संपलेल्या दिवाळीच्या सुट्ट्यांमध्ये ज्या मुलांच्या मामाचे गाव या बिबट्याप्रवण क्षेत्रामध्ये आहे ती मुले मामाकडे जाऊया, असे न म्हणता आपल्याच घरी बसून राहिली. मामाच्या गावी जाण्याचे मुलांना खूप आकर्षण असते; परंतु तिथे असलेली बिबट्यांची भीती पाहून त्यांच्या आई-वडिलांनी मुलांना मामाकडे न पाठवण्याचे ठरवले होते. असाच आणखी एक सामाजिक परिणाम ज्या तरुणांची लग्ने जुळत नाहीत त्यांच्यावरही झाला आहे. ग्रामीण भागात शेतकरी मुलांचे लग्न होणे आधीच अवघड झालेले आहे. मुली शेतकर्याकडे जाण्यास व नांदण्यास तयार नाहीत. त्यात पुन्हा नवरदेव म्हणजे लग्नाचा उमेदवार बिबट्याप्रवण क्षेत्रातील असेल, तर मुलींचे आई-वडील आपल्या पोटचा गोळा या भागात देण्यास अजिबात तयार नाहीत.
संसार असो, शेती असो वा व्यवसाय असो, काहीही असले, तरी तुम्हाला घराबाहेर पडावेच लागते. अशावेळी दबा धरून बसलेले बिबटे आजूबाजूला असतील, तर या भागात आपली मुलगी देण्यास कोण तयार होईल बरे? आधीच जटील झालेला मुलांच्या लग्नाचा प्रश्न बिबट्याप्रवण क्षेत्रामध्ये आता गंभीर रूप घेण्यापर्यंत येऊन पोहोचला आहे, हे निश्चित!