किती हा अविचार!

pudhari tadka article
किती हा अविचार!Pudhari File Photo
Published on
Updated on

आपण कुठेही आसपास पाहिले की, दोन गटांत हाणामारीच्या बातम्या हमखास असतात. काही राजकीय पक्षांचा, तर ‘खळखट्याक’ हा परवलीचा शब्द आहे. याने त्याचे डोके फोडले, त्याने त्याच्यावर वार केला अशा प्रकारच्या हिंसक वार्ता आता आपल्या सवयीच्या झाल्या आहेत; पण परवा घडलेला प्रकार अद्भुत आणि आश्चर्यजनक आहे. विधिमंडळाच्या लॉबीमध्ये चक्क दोन आमदारांच्या दोन गटांमध्ये हाणामारी झाली. विधिमंडळात आता केवळ एवढेच व्हायचे बाकी होते. विचाराने विचाराचा सामना करण्याऐवजी जागोजागी अविचार राज्यात दिसून येत आहे, ही काळजीची बाब आहे. किमान आजघडीला वाद झालेल्या दोन्ही आमदारांनी दिलगिरी व्यक्त केली आहे, ही त्यातल्या त्यात समाधानाची गोष्ट म्हणावी लागेल. विधिमंडळाच्या आत बरेचदा मोठे वादविवाद होतात. एकमेकांच्या अंगावर धावून जाण्याचे प्रकार पण होतात. आपली बाजू तावातावाने मांडताना आमदारांना राग अनावर होतो आणि ते सभापतींच्या समोर जाऊन उभे राहतात. एक वेळ हे सर्व विकासासाठी आहे असे समजले, तरी देशातील अनेक विधानसभांमध्ये यापेक्षा गंभीर प्रकार घडलेले आहेत.

बिहार विधानसभेच्या सभागृहात चार-पाच आमदारांमध्ये हाणामारी झाली होती. सभागृहामध्ये शांतता ठेवण्याचे कार्य सभापतींना करावे लागते. किंबहुना ही त्यांचीच जबाबदारी असते. एखादा सभासद आटोक्याबाहेर जात आहे, असे लक्षात आले तर विधानभवनात मार्शल उभे असतात. हे मार्शल लोक सभापतीच्या सांगण्यावरून गोंधळ करणार्‍या आमदाराला उचलतात आणि बाहेर घेऊन जातात. विधानसभा अधिवेशन म्हणजे आपल्या मतदारसंघातील प्रश्न मांडण्याची महत्त्वाची जागा असते. आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी विधानभवनाच्या पायर्‍यांवर आमदार मंडळी आंदोलने करत असतात. हे आंदोलन होत असताना सत्ताधारी पक्षाचे मंत्री समोरून जातात तेव्हा खेळीमेळीचे वातावरण पाहायला मिळते.

केवळ आमदारच नव्हे, तर सर्व समाजातच प्रत्येक गोष्टीबाबत हातघाईवर येण्याचा प्रकार वाढलेला आहे, असे तुमच्या लक्षात येईल. पक्षीय अभिनिवेश बाजूला ठेवून आमदार हसत हसत बोलत आहेत, असे द़ृश्य क्वचित पाहायला मिळते. दोन वेगळ्या पक्षांचे दोन आक्रमक आमदार असतील आणि योगायोगाने ते एकमेकांच्या समोर आले, तर वाद हा निश्चितच होणार आहे. एकंदरीत विधानसभा हा राज्यातील समाजजीवनाचा आरसा होऊ घातलेला आहे असे म्हटले, तर वावगे ठरणार नाही. जे समाजात घडते तेच विधानसभेत घडते, असे म्हणून याचे समर्थन करता येणार नाही. लोकप्रतिनिधी हे जबाबदारीने वागणारे असले पाहिजेत, तरच जनतेसमोर चांगले उदाहरण उभे राहू शकेल. मुद्द्यावरून गुद्यावर येण्याची भाषा नेहमीच केली जाते. संस्कृतीची जपणूक करण्याची जबाबदारी आता आमदारांवर आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news