

डॉ. कृष्णकुमार रत्तू
छत्तीसगडच्या भूमीवर शतकानुशतके घुमणारी महाभारताची कथा क्षणभर थांबून गेली असली, तरी तीजनबाई त्यांच्या आवाजातून, अभिनयातून आणि संघर्षमय जीवनगाथेतून सदैव स्मरणात राहतील.
पंडवानी या लोककथागायन परंपरेला वैशिष्ट्यपूर्ण गायकी, अभिनय आणि अद्वितीय सादरीकरणातून अमरत्व प्राप्त करून देणाऱ्या ज्येष्ठ लोकगायिका तीजनबाई आता आपल्यात नाहीत. जिद्द, संघर्ष आणि कलेवरील निष्ठेच्या बळावर त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. छत्तीसगडच्या भूमीवर घुमणारी महाभारताची कथा थांबून गेली असली, तरी तीजनबाई त्यांच्या आवाजातून, अभिनयातून आणि संघर्षमय जीवनगाथेतून सदैव स्मरणात राहतील. सामाजिक रुढींना धैर्याने आव्हान देणाऱ्या, स्त्रीच्या प्रतिभेला समाजाने आखून दिलेल्या मर्यादा मोडून काढणाऱ्या आणि अथक साधनेच्या बळावर लोककलेला नवे वैभव प्राप्त करून देणाऱ्या एका विलक्षण स्त्रीचे चरित्र म्हणून भारतीय लोकसंस्कृतीच्या इतिहासात त्यांची नोंद केली जाईल. प्रतिभेला लिंगभेदाचे बंधन नसते आणि खरी साधना कोणत्याही अडथळ्यापुढे कधीही हार मानत नाही, हे त्यांनी जीवनकार्यातून जगासमोर मांडले.
महाभारतातील विविध प्रसंगांचे सादरीकरण करताना तीजनबाईंनी भारतीय संस्कृतीतील सत्य, न्याय आणि मूल्यांचा आत्मा जिवंत ठेवला. त्यांच्या संवादांमधील तेज, आवाजातील ताकद आणि अभिनयातील ओजस्वीपणा थेट प्रेक्षकांच्या हृदयापर्यंत पोहोचत असे. दूरदर्शनसाठी त्यांच्या कार्यक्रमांचे चित्रीकरण होत असताना प्रत्येक क्षण अविस्मरणीय वाटत असे. पंडवानी सादर करण्याची त्यांची बेधडक, मुक्त आणि नैसर्गिक शैली ही केवळ अद्वितीय होती. त्या मनमोकळ्या, धाडसी आणि जिद्दी होत्या. स्वतःच्या अटींवर त्या आयुष्य जगल्या. जगायचे असेल, तर गावाच्या साधेपणात आणि मोकळ्या मनाने जगा, हा त्यांचा दृष्टिकोन होता. भिलाईजवळील गनियारी या गावात त्यांचा जन्म झाला. लहानपणी त्या आजोबा ब्रजलाल यांच्याकडून महाभारताच्या कथा ऐकत. त्याच कथांनी त्यांच्या मनात कलेचे बीज रुजवले. उमेदसिंह देशमुख यांनी त्यांना मार्गदर्शन केले. कौटुंबिक परंपरेतूनच तीजनबाईंनी तेराव्या वर्षी पहिल्यांदा सार्वजनिक व्यासपीठावर पंडवानीचे सादरीकरण केले. त्या काळात पंडवानीची कापालिक शैली, ज्यात कलाकार उभे राहून अभिनयासह कथा सादर करतो, हे पूर्णतः पुरुषांचे क्षेत्र मानले जात असे. स्त्रियांना यात मर्यादित स्थान होते; पण तीजनबाई यांनी या परंपरेची भिंत मोडून काढली. त्यांना टीकेला सामोरे जावे लागले. रुढीवादी विचारांचा विरोध सहन करावा लागला.
छोट्या-छोट्या गावांतील चौकांपासून आणि जत्रांपासून सुरू झालेला त्यांचा प्रवास जिल्हास्तरीय कार्यक्रम, राष्ट्रीय मंच आणि पुढे जगभरातील प्रतिष्ठित सांस्कृतिक महोत्सवांपर्यंत पोहोचला. प्रत्येक टप्पा त्यांनी स्वतःच्या कष्टाने गाठला. त्यांच्या पाठीशी मोठी गुरू परंपरा नव्हती, साधनसामग्री नव्हती, प्रसिद्धीचे माध्यम नव्हते. होती फक्त बुलंद आवाजाची देणगी, विलक्षण स्मरणशक्ती, प्रभावी अभिनय कौशल्य आणि लोकपरंपरेवरील अढळ श्रद्धा. तीजनबाईंचा कार्यक्रम मंत्रमुग्ध करणारा अनुभव असायचा. हातात तंबोरा घेऊन त्या मंचावर उभ्या राहताच वातावरण बदलून जायचे. काही क्षणांतच त्या भीमाच्या भूमिकेत शिरत. पुढच्याच क्षणी अर्जुनाचा आवेश त्यांच्या देहबोलीत दिसू लागे. त्यानंतर द्रौपदीची वेदना त्यांच्या चेहऱ्यावर उमटत असे आणि काही क्षणांतच श्रीकृष्णाचे स्मित व त्यांची नीती त्यांच्या स्वरातून घुमू लागे. हातातील तंबोरा कधी गदेत रूपांतरित होई, कधी धनुष्य बने, तर कधी युद्धाचे प्रतीक ठरत असे. त्यामुळे जणू समोर महाभारत प्रत्यक्ष घडत आहे, हीच प्रेक्षकांची अनुभूती असायची. प्रदीर्घ काळानंतर देशातील विविध सांस्कृतिक संस्थांनी त्यांच्या प्रतिभेची दखल घेतली आणि त्यानंतर आंतरराष्ट्रीय व्यासपीठांची दारे त्यांच्यासाठी खुली झाली. त्यांच्या कलेचा आणि साधनेचा गौरव म्हणून त्यांना पद्मश्री, पद्मभूषण आणि पद्मविभूषण या नागरी सन्मानांनी गौरविण्यात आले. आज त्या आपल्यात नसल्या, तरी त्यांचा स्वर अजूनही काळाच्या अवकाशात घुमत आहे. जणू कुठेतरी दूरवरून पुन्हा एकदा महाभारतातील एखादा प्रसंग ऐकू येत आहे... भीमाची गर्जना, श्रीकृष्णाचे विचार आणि भारतीय लोकजीवनाची अखंड स्पंदने आजही त्यांच्या आवाजातून जिवंत असल्याची अनुभूती देत आहेत.