

युवराज इंगवले
काही लोक इतके ध्येयवेडे असतात की, ध्येय साध्य केल्याशिवाय ते स्वस्थ बसत नाहीत. विशेषतः गिर्यारोहक हे प्रतिकूल हवामान आणि अशक्य वाटणारे पर्वत पादाक्रांत करत यशाचे शिखर गाठतात. खरे तर खडतर गिर्यारोहणाचा पाया नेपाळी लोकांनी घातला आहे. अशातच एका नेपाळी गिर्याराहकाने नुकतेच उंच पर्वतावर चढाई करत असताना जगाचा निरोप घेतला. ते म्हणजे ४३ वर्षीय निर्मल निम्स पुर्जा होत. पाकिस्तानातील ब्रॉड पीक पर्वतावर झालेल्या हिमस्खलनात त्यांना जीव गमवावा लागला. ब्रॉड पिक हे जगातील १२ व्या क्रमांकाचे सर्वात ऊंच शिखर आहे. त्याची उंची सुमारे ८,०४७ मीटर आहे. काराकोरम पर्वतरांगेतील हे शिखर कठीण चढाई आणि सतत बदलणाऱ्या हवामानासाठी ओळखले जाते. पुर्जा यांचे पथक सुमारे ६ हजार ६०० मीटर उंच अंतरावर असताना हिमस्खलन झाले आणि नेपाळने इतिहासातील सर्वात महान गिर्यारोहकापैकी एकाला गमावले.
जागतिक विक्रमवीर आणि आधुनिक उच्च हिमालयीन गिर्यारोहणाला नवी दिशा देणारे म्हणून पुर्जा यांना ओळखले जाते. 'अशक्य असे काहीच नसते. फक्त प्रयत्न न केलेल्या गोष्टी असतात' या मंत्राने त्यांनी वाटचाल केली आणि गिर्यारोहणाच्या इतिहासात नाव अजरामर केले. विरळ हवेतही वेगाने आणि आत्मविश्वासाने चढाई करणारी त्यांची शैली जगप्रसिद्ध होती. त्यांनी अनेकवेळा अनुभवी गिर्यारोहकांनाही अशक्य आव्हाने स्वीकारली आणि ती यशस्वी पूर्ण केली.
२०१९ मध्ये त्यांनी जगातील ८,००० मीटरपेक्षा अधिक उंच असलेली सर्व १४ शिखरे अवघ्या ६ महिने आणि ६ दिवसांत सर करून इतिहास रचला. या अभूतपूर्व कामगिरीमुळे त्यांचे नाव जगभर पोहोचले. नेपाळच्या म्याग्दी जिल्ह्यात जन्मलेल्या पुर्जा यांचे बालपण चितवनमध्ये गेले. लहानपणी त्यांचे स्वप्न एव्हरेस्ट सर करण्याचे नव्हते, तर गुरखा सैनिक बनण्याचे होते. २००३ मध्ये त्यांनी ब्रिटिश लष्करात प्रवेश केला. नंतर ते स्पेशल बोट सर्व्हिस (एसबीएस) या ब्रिटनच्या विशेष दलात दाखल होणारे ते पहिले गुरखा सैनिक ठरले. त्यांनी सुमारे १६ वर्षे सैन्यात सेवा बजावली. २०१२ मध्ये एव्हरेस्ट बेस कॅम्प ट्रॅकवेळी त्यांना प्रथमच गिर्यारोहणाची आवड निर्माण झाली. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदा धौलागिरी हे ८ हजार मीटर उंचीचे शिखर सर केले आणि त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही. २०१८ मध्ये त्यांनी सैन्याची नोकरी सोडून प्रोजेक्ट पॉसिबल ही मोहीम सुरू केली. यासाठी त्यांनी स्वतःचे घरही गहाण ठेवले. या मोहिमेतून त्यांनी ८ हजार मीटर उंच शिखरे १४ वेळा विक्रमी वेळेत सर केली. एव्हरेस्टवरील शिखरांच्या रांगेचा त्यांनी काढलेला फोटो जगभर चर्चेचा विषय ठरला.
२०२१ मध्ये त्यांनी १० नेपाळी गिर्यारोहकांच्या पथकासह के-२ या जगातील सर्वात कठीण शिखरावर पहिली हिवाळी यशस्वी चढाई केली. विशेष म्हणजे, पुर्जा यांनी ही चढाई ऑक्सिजनशिवाय पूर्ण केली. शिखरावर पोहोचल्यावर संपूर्ण पथकाने नेपाळचे राष्ट्रगीत गायिले. हा क्षण नेपाळसाठी ऐतिहासिक ठरला. २०२४ मध्ये त्यांनी ऑक्सिजनशिवाय सर्व ८ हजार मीटर उंच शिखरे सर केली आणि असा विक्रम करणारे ते जगातील पहिले गिर्यारोहक ठरले. त्यानंतर त्यांनी निम्सदाई फाऊंडेशन स्थापन करून नेपाळ, पाकिस्तान आणि ब्रिटनमधील गिर्याराेहकांसाठी विविध सामाजिक उपक्रम सुरू केले. त्यांचे आत्मचरित्र 'बिहाईंड पॉसिबल' आणि '१५ पीक्स : नथिंग इज इम्पॉसिबल' या माहितीपटामुळे ते जागतिक स्तरावर लोकप्रिय झाले. त्यांनी नेपाळी शेर्पा आणि गिर्यारोहक मार्गदर्शकांच्या योगदानाला योग्य मान्यता मिळावी, यासाठी सातत्याने आवाज उठवला. त्यांनी जगाला एक गोष्ट निश्चित शिकवली ती म्हणजे, नेपाळी गिर्यारोहक केवळ सहायक नाहीत, तर जागतिक गिर्यारोहणाचे खरे नायक आहेत.