लवंगी मिरची : मनातले आवाज!

लवंगी मिरची : मनातले आवाज!
Published on
Updated on

मित्रा, इजरायलमध्ये एका विद्यापीठामध्ये झालेले संशोधन वाचलेस का? संकट ओढवले की झाडेही रडतात, पाणी मागतात म्हणे. असाच शोध शंभर वर्षांपूर्वी आपले भारतीय शास्त्रज्ञ जगदीश चंद्र बोस यांनी लावला होता. त्यावर तेल अविव विद्यापीठाच्या संशोधकांनी शिक्कामोर्तब केले आहे, याचा मला खूप आनंद झाला आहे.

होय तर, या निमित्ताने झाडांचा आवाज पकडण्यात संशोधकांना यश आले आहे. कोणत्याही संकटात किंवा अगदी पाण्याची प्रचंड गरज असेल, तर झाडे अल्ट्रासोनिक रेंजमध्ये रडतात, ओरडतात, मदत मागतात असा दावा या संशोधकांनी केला आहे आणि हे आवाज वटवाघुळ, उंदीर, किडे ओळखू शकतात असेही सिद्ध झाले आहे. झाडांची ही संवेदना त्याही पूर्वी संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांनी मांडली आहे. 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे' अशा शब्दात तुकोबांनी झाडांशी आपले जिवंत नाते स्पष्ट केले आहे.

संकट आले, अडचण आली की रडणे, ओरडणे ही मानवी भावना आहे. आता आपल्या भारतीय समाजाचे घे ना. उन्हाळ्यात काही भागात पाण्याची कमतरता असते. लोक रात्र-दिवस पाण्यासाठी वणवण भटकत असतात. शेवटी नाईलाजाने रिकाम्या घागरी घेऊन मोर्चे काढतात. ही संवेदना आणि झाडांची संवेदना एकच आहे, असेही म्हणता येईल. बरेचदा गावाला जायला रस्ता नसतो. मग त्या गावातील लोक मतदानावर बहिष्कार टाकतात. त्याची प्रसिद्धी होते. मग कोणी पुढारी येऊन त्यांची समजूत घालतात आणि त्यांना मतदान करण्यासाठी राजी करतात. पुढच्या इलेक्शनपर्यंत त्यांच्याकडे कोणीही पाहत नाही, मागणी कायम असते. मग पुन्हा निवडणुका आल्या की, पुन्हा बहिष्कराची भावना बोलून दाखवली जाते. ही भावनासुद्धा झाडांच्या त्या भावनेसारखीच आहे, असे मला वाटते.

भूक लागली की तान्हे बाळसुद्धा रडते किंबहुना ते रडल्याशिवाय त्याला भूक लागली आहे, हे आईला कळत नाही. अशावेळी जगण्यासाठी, पाण्यासाठी झाडे ओरडली नसती तरच नवल होते. फक्त त्यांचा आवाज आपल्याला ऐकू येत नव्हता. या संशोधनामुळे तो आवाज आता ऐकता येईल.

खरं तर असे न ऐकू येणारे आवाज ओळखण्याचे तंत्र अवगत झाले, तर बर्‍याच गोष्टी सोप्या होतील. म्हणजे उदाहरणार्थ एखाद्या तरुणाचे एखाद्या तरुणीवर प्रेम असते; पण ती प्रेमाला प्रतिसाद देत आहे की नाही हे त्याला समजत नसते. अशावेळी त्या तरुणीचा आतला आवाज काय सांगतो आहे, हे जाणून घेण्याचे कोणतेही उपकरण अस्तित्वात नाही. असे काही तंत्रज्ञान निघाल्यास एकतर्फी प्रेमातून घडणार्‍या घटना पण टाळता येतील. बरेचदा माणसांच्या मनात एक असते आणि ते बोलतात भलतेच. तर या माणसांच्या मनातला आवाज नेमकं काय सांगत आहे, हे ओळखण्याचे पण तंत्र निघाले पाहिजे. आजकाल आपल्या देशात घटस्फोटांची संख्या खूप वाढत चालली आहे. अशावेळी जोडप्याच्या मनातील आतला आवाज नेमका कोणता आहे ते ओळखता आले, तर असे घटस्फोट टाळता येतील.

असे आवाज ओळखण्याचे तंत्र समाजाचे जगणे सुसह्य करेल हे नक्की. म्हणजे गुन्हेगाराच्या मनातील आवाज ओळखता आला, तर त्याला वेळीच सावध करून गुन्ह्यापासून परावृत्तही करता येईल.

– झटका

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news