

मुरलीधर कुलकर्णी
कायद्याच्या क्षेत्रात आंतरराष्ट्रीय पातळीवर अवघ्या 21 व्या वर्षी मोठे यश मिळवून इतिहास रचणार्या कृष्णांगी मेश्राम या भारतीय वंशाच्या सर्वात तरुण सॉलिसिटर म्हणून ओळखल्या जाताहेत. त्यांचा जीवनप्रवास मेहनत, शिस्त आणि द़ृढ निश्चयाचे जिवंत उदाहरण आहे.
कृष्णांगी यांचा जन्म 15 डिसेंबर 2003 रोजी पश्चिम बंगालमधील इस्कॉन संस्थेला वाहून घेतलेल्या एका धार्मिक कुटुंबात झाला. त्यांच्या वडिलांचे नाव गोपाल मेश्राम असून ते इस्कॉनमधील सेवाकार्यात कार्यरत होते. आई वृंदावनीदेवी यादेखील अध्यात्मिक व सामाजिक उपक्रमांमध्ये सहभागी होत्या. मुळात मेश्राम कुटुंबाचे मूळ गाव महाराष्ट्रातील नागपूरजवळ आहे आणि त्यांच्या पिढ्यांचा संबंध विदर्भाशी जोडलेला आहे. त्यामुळे कृष्णांगी यांची महाराष्ट्राशी घट्ट नाळ जुळलेली असून त्यांच्या यशाचा अभिमान त्यामुळेच महाराष्ट्रालाही वाटतो. कृष्णांगी यांचे प्राथमिक शिक्षण इस्कॉनच्या शाळांमध्ये झाले. त्या नेहमीच अभ्यासात पुढे होत्या. वयाच्या केवळ 15 व्या वर्षी त्यांनी इंग्लंडमधील मिल्टन किन्स ओपन युनिव्हर्सिटीमध्ये एलएलबी अभ्यासक्रमाला प्रवेश घेतला.
एवढ्या लहान वयात विदेशी विद्यापीठात कायद्याचा अभ्यास करणे हे एक मोठे धाडस होते; पण त्यांच्या मेहनतीमुळे केवळ तीन वर्षांत, म्हणजे वयाच्या 18 व्या वर्षी, त्यांनी हा अभ्यासक्रम उत्तम गुणांनी (फर्स्ट क्लास ऑनर्स) पूर्ण केला आणि त्या विद्यापीठाच्या इतिहासातील सर्वात तरुण कायदा पदवीधर ठरल्या. त्यानंतर त्यांनी लीगल प्रॅक्टिस कोर्स (एलपीसी) आणि एमएससी इन बिझनेस, लॉ अँड मॅनेजमेंट हे दोन पदव्युत्तर अभ्यासक्रमही पूर्ण केले. दोन्ही ठिकाणी त्यांनी डिस्टिंक्शन मिळवून गुणवत्ता सिद्ध केली. पुढे 2024 मध्ये त्यांनी सॉलिसिटर्स क्वालिफाईंग एक्झामिनेशन (एसक्यूई) उत्तीर्ण केले. अखेरीस एप्रिल 2025 मध्ये वय अवघे 21 वर्षे 4 महिने असताना त्या इंग्लंड व वेल्समध्ये अधिकृतपणे सॉलिसिटर म्हणून नोंदणीकृत झाल्या आणि त्या जगातील सर्वात तरुण सॉलिसिटर ठरल्या.
एका प्रख्यात आंतरराष्ट्रीय लॉ फर्ममध्ये काम करताना त्यांनी विविध प्रकरणांचा अभ्यास केला. तसेच सिंगापूरमधील एका संस्थेत त्यांनी इंटर्नशिप पूर्ण केली. त्यांना विशेषतः डिजिटल तंत्रज्ञान, फिनटेक, ब्लॉकचेन आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या क्षेत्रांतील कायदेविषयक प्रश्नांवर काम करण्याची विशेष आवड आहे. भविष्यात त्या इंग्लंड किंवा संयुक्त अरब अमिराती येथे या क्षेत्रात ठसा उमटवण्याचा मानस बाळगून आहेत. कृष्णांगी यांच्या या यशाची दखल जगभरातील विविध ठिकाणांहून घेण्यात आली आहे. इंग्लंडमधील लॉ सोसायटीच्या गॅझेटमध्ये त्यांच्या बद्दल विशेष लेख प्रसिद्ध झाला असून ओपन युनिव्हर्सिटीनेही त्यांच्या कामगिरीबद्दल अभिमान व्यक्त केला आहे. भारतीय आणि आंतरराष्ट्रीय माध्यमांनी त्यांच्या या अद्भुत प्रवासाचे कौतुक केले. कृष्णांगी यांची वाटचाल ही केवळ शैक्षणिक यशाची कथा नाही, तर ती समर्पण आणि ध्येयवेडेपणाचे एक उत्कृष्ट उदाहरणच! वयाच्या अवघ्या 21व्या वर्षी सॉलिसिटर होणे हे त्यांच्या कठोर मेहनतीचे फळ आहे.