या तरुणांनो, परत फिरा रे...

Nitesh Rane
पालकमंत्री नितेश राणेpudhari photo
Published on
Updated on

कोकण मुंबई गतिमान दळणवळणातून शेतीमालातून बाजारपेठ मिळवून देण्‍याच्या मुद्द्यावर चर्चा झाल्या; पण त्यात निष्‍पत्ती काही झाली नाही. त्यामुळे शेतीत समृद्धता असूनही त्याकडे दुर्लक्ष झाल्याने स्थलांतराचा मुद्दा अधिक गंभीर स्वरूपात पुढे आला. शेती व्‍यवसायाचे अर्थकारण सक्षम कसे होईल, याकडे लक्ष देण्‍याची गरज आहे.

कोकणात सर्वाधिक लोकसंख्‍या घटल्याचा निष्‍कर्ष अनेक गणनांमधून पुढे आला आहे. मतदानाच्या एसआयआरमध्‍येही मतदार संख्‍या घटत असल्याचे पुढे आले. एका सिंधुदुर्ग जिल्ह्यात साडेतीनशे शाळा एक शिक्षकी असल्याचा अहवालही पुढे आला. एकूण कोकणात विशेषत: ग्रामीण भागामध्‍ये रोजगारासाठी मोठ्या प्रमाणावर स्थलांतर होत असल्याने लोकसंख्‍या घटल्याचे प्रमाण वाढत आहे. 'या तरुणांनो, परत फिरा रे...' अशी हाक मंत्री नितेश राणे यांनी दिली आहे; पण हे तरुण परत कसे येणार, यासाठी रोजगाराच्या कोणत्या संधी आहेत, याबाबतचा ऊहापोह त्यांनी करायला हवा. खरं तर, शिक्षणातच बदल अपेक्षित आहेत. स्वत:ला बदलण्‍याची क्षमता असलेले शिक्षक दिले गेले पाहिजेत. आज बहुतांश शिक्षण संस्था ज्यांच्या हातात आहेत, त्यांनी नवनवीन शैक्षणिक संस्थांसाठी आणि स्पर्धांसाठी पुढे यायला हवे. कोकणात खरं तर कृषी बेस शिक्षणाची गरज आहे. कोकणात कृषी विद्यापीठ आहे; पण तरुणांसाठी कृषीविषयक असलेल्या संधी याचा व्‍यापक विचार करण्‍यात आपण कमी पडत आहोत. पूर्वी प्रत्येक झाडा-पेडांमध्‍ये इथला माणूस रोजगाराच्या संधी शोधत होता. प्रत्येक गावामध्‍ये कमावण्‍याचे मार्ग त्यावेळी शोधले गेले होते; पण ती जीवनशैली आता पूर्णत: बदलली आहे. महानगरांच्या मोहात तरुणवर्ग असल्याने गावांमध्‍ये रोजगाराच्या संधीचा योग्य वापर केला जात नाही. परिणामी, गावांमध्‍ये लोकसंख्‍या कमी होऊन आणि महानगरांमध्‍ये भरमसाट पद्धतीने वाढणे असा लोकसंख्‍या वाढीचा असमतोल सर्वच भागांत पाहायला मिळत आहे.

कोकणात पूर्वी गरिबी होती, तरीही लोक मनाने श्रीमंत होते. पैसा नसला, तरी वस्तुरूपाने व्‍यवहार होत होते आणि लोक समाधानी होते. आंबा, फणस, काजू, कोकम अशा फळ पिकांतून आणि भात शेतीतून रोजगाराच्या संधी तरुण शोधायचे आणि समाधानाने जगायचे; मात्र तरुण पिढीचे विचारविश्‍वच बदलले आहे. आज जग पूर्णपणे बदलले, तरी कोकणचा शेती पॅटर्न 'जैसे थे'च आहे. या तोच-तोचपणाच्या आणि आर्थिक दृष्‍ट्या न परवडणाऱ्या शेतीमुळे स्थलांतर वाढू लागले. कोकणात राहणाऱ्या तरुणाचे मार्केट लग्नाच्या बाजारातही शून्यासम आहे. आज कोकणातल्या कौलारू घरात स्वच्छ हवेत जीवन जगण्‍यापेक्षा मुंबईच्या चार बाय चारच्या खोलीत संसार थाटणाऱ्या मुली अधिक आहेत. या सर्व स्थितीमुळे तरुण बारावी नाही, तर पदवीधर झाला की मुंबई गाठतो. अनेक संकटांशी सामना देत तो मुंबईतच राहतो. गावात मोलमजुरी करण्‍यास लाजणारा, बुजणारा तरुण रोजंदारीवर मुंबईत वाटेल ती कामे करतो; पण गावाकडे जाणं त्याला अपमान वाटतो. ही बदललेली विचारशक्ती स्थलांतराचे मूळ कारण आहे. कोकणची शेती हा सर्वात मोठा संधीचा विषय आहे.

कोकणचा पीक पॅटर्न बदलला, तर ते शक्य आहे. कोकणात हापूसच्या बागा आहेत. नारळी, पोफळी आहेत. कोकम आहे. काजू आहे. हा हक्काचा व्‍यवसाय आज परप्रांतीयांच्या हातात जाऊ लागला आहे. जिथे करण्‍यासारखे आहे, त्याचाच विसर पडला आहे. मायबाप सरकार घोषणा अनेक करते; पण मूर्तरूपाने काहीच हाताशी लागत नाही. दुधापासून तूप बनविण्‍याची एक प्रक्रिया आहे. ती पूर्ण रूपाने केली, तरच त्याचा योग्य निकाल मिळतो. अन्यथा निराशाच पदरी येते. तीच अवस्था कोकणच्या एकूण शेतीची झाली आहे. या व्‍यवसायाला योग्य दिशा दिली आणि शेती व्‍यवसायाला प्रतिष्‍ठा मिळाली, तरच कोकणचे स्थलांतर थांबू शकेल. खरं तर, कोकणातल्या शेतीला मुंबई ही मोठी बाजारपेठ आहे; पण आज दळणवळणाच्या बाबतीतही कोकण मागे आहे. १४ वर्षे रखडलेला मुंबई-गोवा महामार्ग गणेशोत्सवाच्या वेळी सुसज्ज होईल, अशा घोषणा राज्य सरकारने वारंवार केल्या; परंतु यावेळचा गणेशोत्सवही खड्ड्यांतील प्रवासाचाच ठरणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news