

संजीव खाडे
मुला, जर तू आज जिंकलास तर हे संपूर्ण जग तुझ्या पाठीशी उभं राहील; पण जर तू नाही जिंकू शकलास, तरीही मी नेहमी तुझ्या सोबतच असेन, हे बळ देणारे आश्वासक शब्द होते भारताचे दिग्गज नेमबाज आणि खंबीरपणे खेळाडूंच्या पाठीशी राहणारे प्रशिक्षक जसपाल राणा यांचे. राणा यांचे नुकतेच वयाच्या केवळ ४९ व्या वर्षी आकस्मिक निधन झाले आणि भारतीय नेमबाजीच नव्हे, तर संपूर्ण क्रीडाविश्व हळहळले. राणा यांनी भारताचा अव्वल नेमबाज अनिश भानवाला याला बळ देताना वापरलेले वरील आश्वासक शब्द आजही अनिशप्रमाणेच ऑलिम्पिकवीर मनू भाकर आणि इतर नेमबाजांच्या कानात घुमत असतील.
जसपाल राणा यांचा ‘अर्जुनवीर’ नेमबाज ते ‘द्रोणाचार्य’रूपी प्रशिक्षक हा प्रवास वेगवान असाच राहिला. उत्तराखंडमध्ये २८ जून १९७६ रोजी जन्मलेल्या राणा यांच्यात निसर्गाने लहानपणापासून विलक्षण अशी प्रतिभा कुटून कुटून भरली होती, हे त्यांनी वयाच्या बाराव्या वर्षी म्हणजे १९८८ मध्ये राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत रौप्य पदक जिंकून सिद्ध केले. त्यांचा राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्पर्धांतील लक्षवेधी प्रवासही डोळे दीपवणारा ठरला. १९९४ मध्ये इटलीतील कनिष्ठ गटाच्या जागतिक अजिंक्यपद नेमबाजी स्पर्धेत त्यांनी जागतिक विक्रमासह सुवर्णपदक जिंकून नेमबाजी विश्वात खळबळ माजवली होती. देशाअंतर्गत स्पर्धा गाजविल्यानंतर १९९४ पासून २००६ पर्यंत राणा यांनी आशियाई, राष्टकुल स्पर्धांत अचूक लक्ष्यवेध करत तब्बल १५ सुवर्णपदकांची कमाई केली. १९९६ च्या अटलांटा ऑलिम्पिकमध्ये त्यांनी भारताचे प्रतिनिधित्व केले खरे; पण त्यांना पदक मिळविता आले नाही, त्याची त्यांना आयुष्यभर खंत राहिली.
जसपाल राणा प्रशिक्षकाच्या भूमिकेत आले, तेव्हा त्यांनी केवळ तंत्रज्ञान शिकवले नाही, तर खेळाडूंचे आयुष्य घडवले. मैदानाबाहेरील वादळांशी लढायला शिकवणारे ते खंदे पाठीराखेही होते. 'मैदानातील लक्ष्य वेधण्यापूर्वी मनातलं द्वंद्व थांबलं पाहिजे,' हा त्यांचा मूळ मंत्र राहिला आहे. मनू भाकर आणि राणा यांच्यात भावनिक नाते होते. टोकियो ऑलिम्पिकमधील अपयशानंतर जेव्हा मनू भाकर पूर्णपणे खचली होती, तिच्यावर टीका होत होती आणि तिने नेमबाजी सोडण्याचा निर्णय घेतला होता, तेव्हा जणू एका पित्याच्या अधिकाराने जसपाल राणा तिच्या पाठीशी उभे राहिले. जेव्हा मनूने आंतरराष्ट्रीय स्तरावर पुन्हा पदकांची कमाई केली, तेव्हा टीकाकारांची तोंडे बंद झाली. त्यावेळी मनूच्या डोळ्यांतील अश्रू हे जसपाल सरांच्या अथक परिश्रमाची आणि विश्वासाची पावती होते.
राणा यांनी सौरभ चौधरी, अनिश भानवाला आणि चिंकी यादव यांसारख्या अनेक जागतिक दर्जाच्या नेमबाजांना घडविले. आजच्या व्यावसायिक युगात जिथे अनेक प्रशिक्षक स्वतःच्या प्रसिद्धीसाठी धडपडतात, तिथे जसपाल राणा कायम प्रकाशझोतापासून दूर राहिले. भारत सरकारने त्यांचा १९९४ मध्ये अर्जुन पुरस्कार आणि १९९७ मध्ये पद्मश्री पुरस्काराने गौरव केला होता. त्यानंतर द्रोणाचार्य पुरस्काराने त्यांच्यातील गुरूचाही सन्मान केला होता. राणा यांच्या आकस्मिक जाण्याने भारतीय नेमबाजीतील ‘अर्जुन’ आणि ‘द्रोणाचार्य’ काळाच्या पडद्याआड गेला आहे. भारतीय नेमबाजीच्या इतिहासाच्या ग्रंथातील सुवर्ण पानावर मात्र ते कायम अमर राहतील.