Jane Street Scam | जेन स्ट्रीटचा घोटाळा आणि सेबीची तत्परता

SEBI Action | जेन स्ट्रीटचा घोटाळा सेबीने अत्यंत तपशिलाने तपासून एक नियामक संस्था म्हणून आपली गुणवत्ता सिद्ध केली.
Jane Street Scam
जेन स्ट्रीटचा घोटाळा आणि सेबीची तत्परता(Pudhari File Photo)
Published on
Updated on

प्रा. विजय ककडे

Summary

जेन स्ट्रीटचा घोटाळा सेबीने अत्यंत तपशिलाने तपासून एक नियामक संस्था म्हणून आपली गुणवत्ता सिद्ध केली. हे प्रकरण तंत्र व तंत्रज्ञ यांचा कुशलतेने वापर करत प्रचंड नफा कसा कमविला जातो, याचे प्रात्यक्षिक आहे. शेअर्समधील उलाढाल नियमबद्ध पद्धतीने करणे यापेक्षा नियमांना सोयीस्कर डावलून भरमसाट व अल्पावधीत पैसा कमविणे यालाच ‘घोटाळा’ म्हटले जाते.

हर्षद मेहता, केतन पारेख यांचे मोठे घोटाळे उघड झाले असले, तरी सातत्याने अशाप्रकारचे घोटाळे घडताना दिसत असतात. केवळ सापडले ते चोर एवढेच. ‘पंप अँड डंप’ म्हणजे मोठी खरेदी (स्वस्तात) आणि मोठी विक्री (अधिक दराने) करणे हेच सूत्र विविध घोटाळ्यांप्रमाणे जेन स्ट्रीटमध्ये दिसते. हा घोटाळा अधिक तंत्रकुशल व व्यापक असल्याने ही संस्था, तिची कार्यपद्धती, मिळवलेला फायदा व त्यावर सेबीने केलेली कारवाई हे एखाद्या गतिमान, नाट्यमय पटकथेचा भाग वाटते. या घोटाळ्यातून सर्वसाधारण व तथाकथित ‘तज्ज्ञ’ (स्मार्ट) गुंतवणूकदारांना मोठा धडा घेता येतो. जेन स्ट्रीट ही अमेरिकेतील व्यापार संस्था 45 देशांतून आपल्या 2 हजार 600 कर्मचार्‍यांमार्फत विविध देशांच्या शेअर बाजारांत उलाढाल करते. भारतातही 50 टक्के इतका मोठा वाटा तिचा वायदे बाजारात असून आपल्या धनशक्तीचा वापर बाजार दरात फेरफार करण्यास या संस्थेने वापरला.

जानेवारी 2024 ते मार्च 2025 या कालखंडात केलेल्या व्यवहारांतून सुमारे 36,502 कोटी रुपयांचा नफा कमवला. यासाठी ‘बाजीगर मॉडेल’ वापरले. या खेळात ‘हरलेल्या खेळातून जिंकणे’ हा नावीन्यपूर्ण प्रकार केला. हे समजण्यास थोडे शेअर व्यवहार माहीत असणे आवश्यक आहे. शेअर्स दर वाढतील म्हणून घेणे व नंतर वाढल्यावर विकूण नफा कमवणे किंवा घसरतील म्हणून आता विकणे व नंतर खरेदी करून नुकसान टाळणे आणि नफा घेणे असे तेजीवाले आणि मंदीवाले कार्यरत असतात. रोखीचा व्यवहार करणारा आणि वायदा बाजार (एफ अँड ओ) असे व्यवहार गट आहेत. विशेषतः निप्टी या इंडेक्स फंडचा व त्यातील काही महत्त्वाच्या कंपन्या जसे एचडीएफसी, आयसीआयसीआय बँक यांच्या शेअर्सची मोठ्या प्रमाणात खरेदी-विक्री करून नफा कमविला जातो. त्यांची कार्यपद्धती आधुनिक अल्गो ट्रेडिंग वापरणारी; परंतु जुनी ‘पंप व डंप’ अशीच होती. विशेषतः वायदेबाजार निप्टीचा एक्सपायरी डेट वापरून हा फेरफार केला जात असे.

Jane Street Scam
Pudhari Editorial : मुलींतील परिवर्तनशील शैक्षणिक जागरुकता

जेन स्ट्रीटची कार्यपद्धती समजून घेणे महत्त्वाचे आहे. दोन टप्प्यांत हा फेरफार खेळ रचला जातो. पहिल्या टप्प्यात सकाळच्या सत्रात निप्टीचे महत्त्वाचे शेअर्स व फ्युचर्स मोठ्या प्रमाणात खरेदी करावयाचे व त्यातून त्यांचे दर वाढवायचे. बाजारात तेजीचे वातावरण पाहून अनेकजण या लाटेत सहभागी होतात. आता दुपारी हे सर्व घेतलेले शेअर्स वेगाने विकायचे. यातून दर घसरतात. बाजार पडतो. हे सर्व करण्यात जेन स्ट्रीटला 7,687 कोटी रुपयांचा तोटा झाला; पण खरा खेळ पुढेच आहे. जेन स्ट्रीट सकाळच्या सत्रात वाढत्या किमतीच्या वातावरणात वाढलेला कॉल विकत व घसरलेला पूट खरेदी करत (कॉल व पूट हे वायदे बाजारातील व्यवहार प्रकार मोठ्या व्यवहारात वापरतात.) दुपारच्या सत्रात बाजार घसरल्याने कॉल घटतो व पूट वाढतो. नेमका हाच फायदा जेन स्ट्रीटने उचलत 43,289 कोटी रुपयांचा फायदा मिळवला. यातील रोखीच्या गटात 7,687 कोटी रुपयांचा तोटा वजा जाता केवळ 36,502 कोटी रुपयांचा नफा कमावला आणि हारी बाजी जितनेवाला जेन स्ट्रीट बाजीगर ठरला! या व्यवहारात भारतातील 93 टक्के गुंतवणूकदारांनी आपले नुकसान करून घेतले.

Jane Street Scam
Editorial : जी-20 आणि भारतीय शेती

जेन स्ट्रीटचा हा व्यवहार फेरफार लक्षात आल्यानंतर फेब्रुवारी 2025 मध्येच याबाबत एनएसईने सूचना दिली; परंतु जेन स्ट्रीटने हा खेळ सुरूच ठेवला. सेबीने 18 दिवसांच्या व्यवहारांचा तपशील अभ्यासून 105 पानांचा अहवाल तयार केला आणि 4 जुलै 2025 रोजी या संस्थेचे सर्व व्यवहार गोठवले. सेबीने बँकांना आदेश देऊन 43 हजार कोटी रुपयांची रक्कम गोठवली. तसेच जेन स्ट्रीटच्या भारतीय शेअर बाजारात व्यवहार बंदी घालण्यात आली. महत्त्वाचे म्हणजे, 21 दिवसांत जेन स्ट्रीटने स्पष्टीकरण द्यावयाचे असून या फसवणूक पद्धतीवर त्यांची बाजू मांडणे आवश्यक आहे. शेअर बाजारात आधुनिक तंत्राचा वापर करून झालेला हा महाघोटाळा सेबीने शोधून कारवाई केली, हे निश्चितच गुंतवणूकदारांना दिलासादायक ठरते.

जेन स्ट्रीटचा घोटाळा शेअर्स दरावर आपल्या मोठ्या खरेदी-विक्रीतून एका दिवसात प्रभाव टाकणारा असून हे तंत्र अल्गो ट्रेड आणि अल्ट्रा फास्ट ट्रेड वापरून केले. बाजारावर नियंत्रण व फेरफार होऊ नये, यासाठी ‘सेबी’ ही नियामक संस्था प्रथमच एका आंतरराष्ट्रीय संस्थेवर कारवाई तातडीने करते, हे भारतीय बाजाराचे गुणलक्षण ठरते. जेन स्ट्रीट व त्यांच्या सहकारी संस्था आपण नियमात राहूनच व्यवहार केल्याचे म्हणू शकतात व कायदेशीर मार्ग स्वीकारू शकतात; पण एकूण भारतीय वायदे बाजारात 50 टक्के वाटा असणारी संस्था जेव्हा व्यवहार करू शकत नाही, तेव्हा हा धक्का बाजार कसा पचवते, यावर आपली प्रतिकार क्षमता ठरणार, हे मात्र नक्की! बाजारात गुंतवणूक, अनेक तंत्रे व मोठ्या व्यवहारांतून भरपूर कमाईची स्वप्ने पाहणार्‍या ट्रेडर्सना मात्र ही मोठी शिकवण जेन स्ट्रीटने दिली असून ते रस्त्यावर का येतात, याचा खुलासा केला, असे म्हणावे लागते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news