India Space Mission | अंतराळातील हुकमी एक्का

India Space Mission |
India Space Mission | अंतराळातील हुकमी एक्का(Pudhari File Photo)
Published on
Updated on

भारतीय अंतराळ संस्थेने (इस्रो) इओएस ०५ इमेजिंग उपग्रहाचे ४ सप्टेंबर रोजी यशस्वीरीत्या प्रक्षेपण केले आणि अंतराळ संशोधनातील वाटचालीत भारताने नवा इतिहास नोंदवला. आंध्र प्रदेशातील श्रीहरीकोटा येथून सतीश धवन अंतराळ केंद्राच्या दुसऱ्या प्रक्षेपण तळावरून जीएसएलव्ही एफ १७ रॉकेटद्वारे या उपग्रहाचे लाँचिंग झाले. भारताच्या सरहद्दीवरील प्रदेशांची हा उपग्रह सतत छायाचित्रे घेऊ शकेल व चीन-पाकिस्तानसह नजीकच्या देशांतील हालचालींवर नजर ठेवणे भारताला शक्य होईल. इओएस ०५ हा भारताचा पहिला उपग्रह आहे की, तो जिओसिंक्रोनस ऑर्बिटमधून म्हणजेच ३६ हजार किमी. उंचीवरून छायाचित्रे घेऊ शकेल. भारताच्या नजीकच्या देशांवर या उपग्रहाचे लक्ष असेल. तसेच आजुबाजूच्या देशांतील हालचालींवर लक्ष ठेवण्याचे काम या उपग्रहाकडून होईल. भारताला वेळेवर इशारा देण्यासाठीही त्याची मोठी मदत होणार आहे, पर्यायाने तो भारतासाठी अंतराळातील हुकमी एक्का ठरणार आहे. या उपग्रहामुळे जागतिक पातळीवर अंतराळ क्षेत्रात भारताची मान उंचावली आहे. 'इस्रो'ने आठ महिन्यांनंतर नव्या उपग्रहाचे प्रक्षेपण केले. त्यापूर्वी जानेवारी २०२६ व मार्च २०२६ मध्ये 'इस्रो'चे प्रक्षेपण अयशस्वी झाले होते.

भारतीय वेळेनुसार ४ सप्टेंबर रोजी पहाटे दोन वाजून पंचावन्न मिनिटांनी इएसओ ०५चे प्रक्षेपण यशस्वीपणे पार पडले. पृथ्वीचे अत्याधुनिक निरीक्षण या उपग्रहाकडून केले जाईल व त्याचा लाभ भारताला मिळू शकेल. इएसओ ०५ चे प्रक्षेपण हे केवळ भारताने अंतराळात आणखी एक उपग्रह सोडला, एवढ्यापुरते मर्यादीत नाही. भारताने पृथ्वी निरीक्षणाच्या नव्या कक्षा ओलांडून अधिक क्षमतेकडे पाऊल टाकले आहे. पृथ्वीवरील विविध भागांचे निरीक्षण करून विविध बाजूंनी प्रतिमा मिळवून त्या भारताकडे पाठविण्याचे काम हा नवा उपग्रह करणार आहे. जीएसएलव्ही एफ १७ हे भारताच्या जीएसएलव्ही मालिकेतील १९ वे उड्डाण आहे. पृथ्वीवरून दिसणाऱ्या अंतराळातील बाबींचे निरीक्षण करून छायाचित्र घेणे व अंतराळाच्या कक्षेतून पृथ्वीचे निरीक्षण करून छायाचित्र घेणे यात मोठा फरक आहे. पृथ्वीचे निरीक्षण करणाऱ्या या उपग्रहात अतिशय शक्तिशाली व संवेदनशील कॅमेरे आहेत. उपग्रहात अत्याधुनिक संवेदक आहेत. उपग्रहाकडून मिळणारी छायाचित्रे व माहितीचा उपयोग बदलते हवामान, शेती, जलसंपत्ती, शहरी नियोजन, आपत्ती व्यवस्थापन, पर्यावरण, नैसर्गिक संसाधनांचे निरीक्षण आदी बाबतीत होऊ शकतो. पृथ्वीच्या निरीक्षणामुळे सर्वाधिक उपयोग कृषी क्षेत्राला होईल.

शेतातील पिकांची स्थिती, बदलणारे हवामान, जमिनीचा वापर, वन क्षेत्र, किनारपट्टीत होणारे बदल, पर्यावरणातील घडामोडी व होणारे बदल या माहितीचा अभ्यास करून उपाययोजना आखता येतील. तसेच येणाऱ्या नैसर्गिक संकटाची चाहूल लागली, तर शेतकरी व सामान्य जनतेलाही सावध करता येईल. पूर, वादळ, चक्रीवादळ, त्सुनामी, मुसळधार किंवा अतिवृष्टी, भूस्खलन किंवा अन्य नैसर्गिक संकटाच्या काळात मिळणाऱ्या माहितीवरून परिस्थितीचे आकलन करणे शक्य होईल व उपाय योजता येतील. इओएस ०५ या उपग्रहाचे प्रक्षेपण हे केवळ अंतराळ संशोधनासाठीच नाही, तर त्याने दिलेल्या माहितीवरून व दिलेल्या छायाचित्रांवरून पृथ्वीवरील जीवन अधिक बारकाईने समजावून घेता येईल. प्रशासकीय व आपत्ती का‌ळातील व्यवस्थापन व मदत यंत्रणा अधिक प्रभावी व सक्षम करण्यासाठी या उपग्रहाने दिलेल्या माहितीचा भारताला खूप उपयोग होऊ शकेल.

जीएसएलव्ही एफ १७च्या यशामुळे प्रक्षेपण वाहकाच्या विश्वासार्हतेवरही या निमित्ताने शिक्कामोर्तब झाले आहे. महत्त्वाचे म्हणजे, यापूर्वी जीएसएलव्ही एफ १६ मोहिमेद्वारे नासा-इस्रो अशा संयुक्त मोहिमेतून निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण झाले होते. अंतराळ संशोधनात प्रत्येक मोहीम उत्सुकता वाढवणारी असते. त्यासाठी शास्त्रज्ञ, संशोधक व अनेक तज्ज्ञांची टीम वर्षानुवर्षे अहोरात्र अभ्यास व मेहनत करीत असते. सर्वच मोहिमा यशस्वी होतात असे नाही. अपयश आले, तरी खचून जायचे नाही, झालेल्या चुका शोधून पुन्हा नवीन मोहीम हाती घ्यायची, हा मंत्र लक्षात ठेवून अंतराळ संशोधनाचा यज्ञ अखंडपणे चालू असतो. २०२१ मध्ये जीएलएसव्ही एफ १० इओएस ०३ ही मोहीम यशस्वी झाली नव्हती. त्यानंतर सखोल तपसणी करून, झालेल्या तांत्रिक चुका सुधारून नवीन मोहिमा चालू ठेवण्यात आल्या. अनुभवातून अनेक गोष्टी शिकायला मिळाल्या. त्याचा बोध घेऊन नवीन मोहिमांची आखणी केली गेली.

अंतराळ संशोधनातील शिकण्याची प्रक्रिया ही भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे एक वेगळेपण आहे. 'अपयश हे थांबण्यासाठी नसून ती पुढील यशाची प्रयोगशाळा आहे' हेच तत्त्व 'इस्रो'ने अंगीकारले आहे. म्हणूनच भारताची अंतराळातील कामगिरी चमकदार आहे. श्रीहरीकोटा हे भारताच्या अंतराळ कार्यक्रमाचे सर्वात महत्त्वाचे व प्रमुख केंद्र आहे. येथूनच पीएसएलव्ही, जीएसएलव्ही अशा अनेक प्रक्षेपण वहनाच्या मोहिमा पार पडल्या आहेत. श्रीहरीकोटाहून झालेल्या प्रक्षेपणांच्या संख्येचा विचार केला, तर तो शंभरच्या पुढे आहे. इओएस ०५ या उपग्रहाचे झालेले प्रक्षेपण ही त्या यादीतील १०६ वी नोंद आहे. ही केवळ आकडेवारी नाही, तर श्रीहरीकोटाने उपग्रह प्रक्षेपणाची केलेली सुरुवात आता जागतिक पातळीवर उंच पोहोचली आहे. भारताने अंतराळ संशोधनात केलेली वाटचाल ही भारताच्या वैज्ञानिक आत्मनिर्भरतेची कहाणी आहे. ही वाटचाल केवळ शासकीय संस्था किवा उपक्रमांपुरचीच मर्यादीत नाही.

गेल्या सहा-सात वर्षांत भारताने अंतराळ संशोधन धोरणात अनेक सुधारणा केल्या व खासगी क्षेत्रालाही अंतराळात प्रवेश खुला केला. खासगी क्षेत्रालाही अंतराळ संशोधनात संधी उपलब्ध झाली आहे. १८ जुलै २०२६ रोजी स्कायरूट एरोस्पेस या खासगी कंपनीने विक्रम १चे श्रीहरीकोटावरून अंतराळात यशस्वी प्रक्षेपण केले. भारताच्या भूमीवरून खासगी कंपनीने अंतराळात केलेले हे पहिलेच प्रक्षेपण होते. अंतराळ संशोधनातील भारताची ही वाटचाल केवळ तंत्रज्ञानाच्या प्रगतीची नव्हे, तर आत्मविश्वास, आत्मनिर्भरता आणि सातत्यपूर्ण प्रयत्नांची कहाणी आहे. अपयशातून शिकत, नव्या तंत्रज्ञानाचा स्वीकार करत आणि खासगी क्षेत्रालाही सोबत घेत भारताने अंतराळ क्षेत्रात स्वतःचे स्थान अधिक भक्कम केले आहे. आकाशाला गवसणी घालणाऱ्या या वैज्ञानिक प्रवासात प्रत्येक यशामागे असंख्य शास्त्रज्ञांचे अथक परिश्रम आहेत. त्यामुळे इओएस ०५चे यश हे केवळ एका मोहिमेचे यश नसून, आत्मनिर्भर भारताच्या अंतराळ स्वप्नाला मिळालेली नवी उंची आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news