

अक्षय निर्मळे
प्राचीन रोममध्ये ग्लॅडिएटर होते. सत्ताधारी आणि श्रीमंतवर्गाच्या करमणुकीसाठी हे योद्धे एकमेकांशी किंवा हिंस्र प्राण्यांशी झुंज देत. त्यात त्यांचा जीवही जात असे; पण प्रेक्षकांमध्ये मात्र जल्लोष व्हायचा. इतिहासातील ही क्रूरता संपली, असे आपण मानतो; पण स्वरूप बदलून ती पुन्हा आपल्यासमोर उभी तर राहत नाहीय ना? इराण-अमेरिका युद्धविरामावर बेटिंगमधून लाखो डॉलर्सची कमाई झाल्याचे समोर आल्याने हा प्रश्न पडतो. एकीकडे या युद्धविरामामुळे जगाने सुटकेचा नि:श्वास टाकला; पण युद्धविराम होणार ही माहिती आधीच निवडक लोकांना होती आणि या ‘इनसायडर’ माहितीचा वापर करून काही लोकांनी बेटिंगमध्ये लाखो डॉलर्सचा आर्थिक नफा मिळवला आहे.
‘पॉलीमार्केट’ या डिजिटल प्रेडिक्शन मार्केट प्लॅटफॉर्मवरील काही नव्या खात्यांनी (वॉलेटस्) 7 एप्रिल रोजी अमेरिका-इराण युद्धविराम होईल, यावर मोठ्या प्रमाणात पैज लावली होती. विशेष म्हणजे, त्या दिवशी सकाळपर्यंत युद्धविरामाचे कोणतेही स्पष्ट संकेत नव्हते. उलट, ट्रम्प यांनी ‘आज रात्री एक संपूर्ण संस्कृती नष्ट होईल,’ असा इशारा दिला होता. तरीदेखील काहींनी अगदी खात्रीलायक माहिती असल्याप्रमाणे बेटिंग लावून नफा कमावला. जवळपास 50 खाती नव्याने सक्रिय केली गेली होती आणि ही त्यांनी लावलेली पहिलीच ‘पैज’ होती.
यामुळेच संशय निर्माण झाला आहे. ब्लॉकचेन डेटाच्या माहितीतून एका नवीन वॉलेटने यात 72 हजार डॉलर्स गुंतवून 2 लाख डॉलर्स नफा कमावला. दुसर्या वॉलेटने सव्वा लाख डॉलर्स, तर आणखी एका खात्याने काही मिनिटांत 48,500 डॉलर्स नफा कमावला. विशेष म्हणजे, हे सर्व व्यवहार ट्रम्प यांच्या युद्धविरामाच्या घोषणेपूर्वीच झाले होते. या लोकांनी ट्रम्प माघार घेतील, या अपेक्षेने पैज लावलेली असू शकते; पण मग याआधीही व्हेनेझुएलाचे राष्ट्राध्यक्ष निकोलस मादुरो यांच्या अटकेपूर्वी तसेच इराणशी संबंधित लष्करी हालचालींपूर्वी अशा पैजा लावल्या गेल्या आणि लाखोंचा नफा मिळवला गेला.
प्रत्येकवेळी एक पॅटर्न यातून दिसतो. नवीन खाती, मोठी गुंतवणूक, अचूक अंदाज आणि मोठा नफा. ब्लॉकचेनमुळे हे व्यवहार पारदर्शक असले, तरी खात्यांमागील व्यक्ती ओळखणे कठीण ठरते. एकाच व्यक्तीला अनेक वॉलेटस् तयार करण्याची मुभा असल्याने ती व्यक्ती नेमकी ‘कोण’ आहे, हा प्रश्न अनुत्तरित राहतो. परिणामी, कायद्याची अंमलबजावणी करणार्या संस्थांसमोर आव्हान उभे राहते. युद्ध, जीवितहानी, राजकीय अस्थिरता या सर्वांवर पैज लावून नफा कमावणे ही कल्पना अस्वस्थ करणारी आहे. अलीकडच्या काळात ‘स्क्विड गेम’सारख्या वेबसीरिज गाजल्या. जिवंत राहण्यासाठी झुंज देणारे लोक एकामागून एक जीवघेण्या संकटांतून पुढे जातात; अनेकांचा मृत्यू होतो आणि हे सर्व कुणीतरी ‘लाईव्ह’ पाहत, त्यांच्या वेदनेतून करमणूक शोधत असते. युद्धविरामाच्या इनसाईड माहितीतून पैज लावून लाखो कमावणारी प्रवृत्ती काही वेगळी नाही. युद्धसंघर्षासारख्या संवेदनशील घटनांचे व्यापारीकरण रोखण्यासाठी प्रेडिक्शन मार्केटवर कडक आणि स्पष्ट नियमन अपरिहार्य वाटते. हे नियमन केवळ बाजारासाठी नाही, तर माणुसकीसाठीही महत्त्वाचे आहे.