India Won T20 World Cup | इतिहास घडवला!

India Won T20 World Cup
India Won T20 World Cup | इतिहास घडवला!(Pudhari File Photo)
Published on
Updated on

टी-20 विश्वचषकावर सलग दोनवेळा आणि एकूणच तिसर्‍यांदा देशाचे नाव कोरून जिगरबाज भारतीय संघाने इतिहास घडवला. विश्वविजयाची पंचमी साजरी केली. इतिहास याचसाठी की, आतापर्यंत कोणत्याही देशाला तीनवेळा हा चषक जिंकता आलेला नव्हता. रविवार सुट्टीच्या दिवशी याच विश्वविजयाने प्रत्येक भारतीय हर्षोल्हासात न्हाऊन निघाला. न्यूझीलंडविरोधात या ट्वेंटी-20 क्रिकेटच्या विश्वचषकात इतिहास घडवताना न्यूझीलंडचा 96 धावांनी पराभव करून मायदेशात कोणत्याही देशाला जिंकता न आलेला विश्वचषक जिंकला, तो मोठ्या आत्मविश्वासाने आणि संघशक्तीने. सूर्यकुमार यादवच्या नेतृत्वात खेळणार्‍या चमूने प्रथम फलंदाजी करताना न्यूझीलंडच्या गोलंदाजांना अक्षरशः ठोकून काढले. त्यानंतर गोलंदाजांनी न्यूझीलंडला आरंभीच खिंडार पाडून विश्वविजय सोपा केला.

19 नोव्हेंबर 2023 रोजी अहमदाबादमधील एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारताला ऑस्ट्रेलियाकडून पराभूत व्हावे लागले होते. त्यावेळी प्रतिस्पर्धी ऑस्ट्रेलिया संघात पॅट कमिन्स, जोश हेझलवूड आणि मिचेल स्टार्क असे एकापेक्षा एक वेगवान गोलंदाज होते. या कारणाने चाहते तणावाखाली होते. यावेळी मात्र संघ क्रिकेट सामना जिंकेल, असा विश्वास लाखो क्रिकेट रसिकांना होता. मुख्य म्हणजे भारताने पहिल्या गड्यासाठीच 43 चेंडूंमध्ये 98 धावांची भक्कम भागीदारी केली. संजू सॅमसन आणि अभिषेक शर्मा या दोघांच्या फलंदाजीत आत्मविश्वास दिसून आला. हा आक्रमक डावखुरा फलंदाज वेगाने धावा करण्यासाठी ओळखला जातो. कोणत्याही दबावाशिवाय निर्भयपणे खेळण्याची क्षमता अभिषेकने पुन्हा सिद्ध केली. पावणेदोन वर्षांपूर्वी झिम्बाब्वेविरुद्धच्या पहिल्या आंतरराष्ट्रीय ट्वेंटी-20 मध्ये भारताकडून पदार्पण केल्यानंतर अभिषेकने पहिले शतक झिम्बाब्वेविरुद्धच्या दुसर्‍या सामन्यात झळकावले. देशाला पुन्हा जेतेपद मिळवून देण्यात सॅमसनचे योगदान महत्त्वाचे ठरले. विश्वचषकाच्या आरंभी अंतिम 11 मध्ये स्थान मिळवणेही त्याला जड जात होते. मात्र संजू हा चपळ यष्टिरक्षक असून, तो मधल्या फळीत किंवा सलामीवीर म्हणूनसुद्धा चांगला असल्याचे सिद्ध झाले. संपूर्ण ट्वेंटी-20 वर्ल्ड कप 2026 स्पर्धेत भारतीय संघाला चांगली सुरुवात मिळत नव्हती. मात्र यावेळी अभिषेकने सावध सुरुवात केली, तर संजूने आक्रमकपणे.

संजूला या स्पर्धेतील आरंभीचे सामने खेळण्याची संधी मिळाली नव्हती. परंतु ती मिळताच वेस्ट इंडिजविरुद्ध खेळताना त्याने नाबाद 97 धावांची, तर इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात 89 धावांची खेळी केली. ईशान किशनच्या 54 धावांच्या कामगिरीचाही आवर्जून उल्लेख करावा लागेल. भारताच्या या मोठ्या आव्हानाचा मुकाबला करताना न्यूझीलंड संघाची सुरुवातच वाईट झाली. सलामीवीर टिम सेफर्टने एका बाजूने किल्ला लढवला नसता, तर न्यूझीलंडचे आणखी वांदे झाले असते. घरच्या मैदानावर जगद्विख्यात गोलंदाज जसप्रीत बुमराहने चार गडी बाद करत कर्तृत्व सिद्ध केले. बुमराहने स्लोव्हर चेंडूचा वापर करत न्यूझीलंडच्या तळाच्या फलंदाजांचा खुर्दा उडवला. अंतिम सामन्यात न्यूझीलंडचे फिन अ‍ॅलन, ग्लेन फिलिप्स आणि डॉरेल मिशेल हे महत्त्वपूर्ण बळी मिळवून अक्षर पटेलने विजयात मोलाची कामगिरी बजावली.

वानखेडेच्या मैदानावर झालेल्या सामन्यात इंग्लंडच्या हॅरी ब्रूक आणि विल जॅक्स या दोन प्रमुख फलंदाजांना बाद करण्यात अक्षरचे योगदान महत्त्वाचे होते. ब्रुकचा झेल घेण्यासाठी अक्षरने कव्हरमधून 24 मीटर मागे जाऊन घेतलेला झेल तर सर्वोत्तम ठरला. जानेवारी 2026 मधील न्यूझीलंडविरुद्धच्या पहिल्या ट्वेंटी-20 सामन्यात बोटाच्या दुखापतीमुळे अक्षरला काही सामन्यांतून बाहेर पडावे लागले होते. सूर्यकुमारने शांत, निडर आणि तरुण खेळाडूंना प्रोत्साहन देणारे नेतृत्व सिद्ध केले. तरुणांमध्ये तो आत्मविश्वास जागा करतो. सूर्यकुमार हा एक अद्भुत लीडर असून, तो मैदानावरील वातावरण शांत ठेवतो, असे सार्थ कौतुक मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर याने केले आहे. सूर्याचे सर्व खेळाडूंशी चांगले जमते आणि सर्वांना तो समान वागणूक देतो. मैदानावर कोणत्याही वादात तो अडकत नाही. तो अत्यंत फिट खेळाडू आहे आणि वन डे व कसोटी सामनेही तो समर्थपणे खेळू शकतो.

क्रिकेट हा सामूहिक खेळ असल्यामुळे यशामागे सर्वांचेच प्रयत्न कारणीभूत असतात. आवश्यकता असेल तेव्हा एखादा फलंदाज, क्षेत्ररक्षक किंवा गोलंदाज मोक्याच्या वेळी जबाबदारी खांद्यावर घेतात आणि ती पार पाडतात, हेच यावेळी दिसून आले. वास्तविक या स्पर्धेत सर्वाधिक धावा किंवा सर्वाधिक बळी घेतलेल्या गोलंदाजांच्या यादीत भारतीय खेळाडू आघाडीवर नव्हते. संपूर्ण स्पर्धेचा विचार करता फलंदाज म्हणून सूर्यकुमारने गरज असताना विजयासाठी मोलाची कामगिरी बजावली. सेमीफायनलमध्ये बुमराह, हार्दिक पंड्या यांचा त्याने ज्याप्रकारे वापर केला, तो कमालीचा होता. तंदुरुस्त नसलेला बुमराह अमेरिकेविरुद्धच्या पहिल्या सामन्यात खेळला नव्हता. परंतु पाकिस्तानविरोधात त्याने दोनच ओव्हर टाकून, साईम अयूब आणि सलमान आगा या दोन महत्त्वाच्या विकेट घेतल्या.

पाकविरोधात आणि नंतर अगदी सुपर 8च्या पहिल्या सामन्यातही संजू सॅमसनला संधी मिळाली नव्हती. पण नंतर वेस्ट इंडिजविरुद्धच्या सामन्यात त्याने सर्वोत्तम खेळी केली. ईशान किशन बर्‍याच कालावधीपासून भारतीय संघाबाहेर होता. पण यावेळी निवड समितीने त्याच्या नावाचा विचार केला आणि त्याला संघात घेण्याचा निर्णय योग्य ठरला. एखाद्या संघात हार्दिक पंड्यासारखा अष्टपैलू क्रिकेटपटू कसा उपयुक्त ठरू शकतो, हे त्याने या स्पर्धेत दाखवून दिले. शिवम दुबे या अष्टपैलू खेळाडूनेही महत्त्वाच्या क्षणी चांगली कामगिरी केली. तिलक, अर्शदीप, सुंदर, वरुण, कुलदीप, सिराज या सर्वांचीच कामगिरी उल्लेखनीय होती. निराश न होता प्रयत्नांची पराकाष्ठा आणि उत्तम टीमवर्क असल्यास भारताला कोणीही रोखू शकत नाही हेच यावेळी सिद्ध झाले. तरुण खेळाडूंना योग्य वेळ हेरून त्यांना संधी दिल्यास ते आपल्यावरील विश्वास सार्थ ठरवतात, हे पुन्हा एकदा दिसून आले. यावेळी गगनाला गवसणी घातल्यामुळे भारताची मान आणखी उंचावली आहे!

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news