

अलीकडेच विशाखापट्टणम येथील एका कार्यक्रमात देशाची दुसरी अणुशक्तीवर चालणारी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुडी ‘आयएनएस अरिघात’ नौदलाच्या ताफ्यात सामील झाल्याने भारताचे नौदल सामर्थ्य अनेक पटींनी वाढले आहे. नव्या पाणबुडीमुळे भारताकडे आता कार्यरत बॅलेस्टिक क्षेपणास्त्र पाणबुड्यांची संख्या दुप्पट झाली आहे. आण्विक पाणबुडी क्षमता मिळवत भारताने आण्विक त्रिकुट म्हणजे न्यूक्लिअर ट्रायडची क्षमता आणखी मजबूत केली. यामुळे शत्रुदेश हे भारतावर अणुहल्लाच काय, पण सर्व स्तरांवरील पारंपरिक युद्ध लढण्यासही कचरतील.
अण्वस्त्र सुसज्ज दुसरी स्वदेशी बनावटीची पाणबुडी अरिघात भारतीय नौदलात सामील झाल्याने भारताला एकप्रकारे ब्रह्मास्त्र लाभले असून, ते क्वचितच वापरण्याची गरज भासेल. आयएनएस अरिघात पाणबुडीचे वजन सहा हजार टन असून, तिची लांबी 112 मीटर आहे. ‘आयएनएस’च्या आतमध्ये अणुभट्टी असून, त्यामुळे पाणबुडीला वेग मिळतो. ही पाणबुडी सागरी पृष्ठभागावर कमाल 12-15 नॉटस् (22 ते 28 किलोमीटर प्रतितास) आणि पाण्याखाली 24 नॉटस् (44 किलोमीटर प्रतितास) वेग देऊ शकते. ‘अरिघात’मध्ये दुहेरी हुल, बॅलास्ट टँक, दोन सहायक इंजिन आणि आपत्कालीन स्थितीत शक्ती आणि गतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी थ्रस्टर बसविले आहे. सागरी किनार्यावर अतिशय शांतपणे गस्त घालणार्या आण्विक पाणबुडीमुळे भारतावर कोणताही देश अण्वस्त्र हल्ला करण्याचे धाडस दाखविणार नाही.
अरिघातच्या समावेशाने सागरी विश्वात भारताचा दबदबा वाढणार आहे. 8 वर्षांपूर्वी 2016 मध्ये भारतीय नौदलात आण्विक विजेवर चालणारी पहिली पाणबुडी आयएनएस अरिहंतला सामील केले होते. आयएनएस अरिघात अरिहंतपेक्षा अधिक सामर्थ्यशाली आहे. यात साडेतीन हजार किलोमीटरपर्यंत लक्ष्य भेदणारे चार आण्विक बॅलेस्टिक क्षेपणास्त्र (के-4) बसविणे शक्य आहे. युद्धाच्या स्थितीत ही पाणबुडी शत्रूच्या किनारपट्टीवर गुप्तपणे जाऊ शकते आणि मोक्याच्या ठिकाणांवर हल्ला करू शकते. भारतावर अणुहल्ला झाल्यास आणि भारतीय लष्कर जमिनीवरचे अग्नी बॅलेस्टिक क्षेपणास्त्र तसेच राफेल किंवा सुखोई-30 विमाने शत्रूवर अणुहल्ला करण्याच्या स्थितीत नसतील तर अशावेळी ‘अरिघात’च्या कमांडरला हल्ला करण्याचा निर्देश दिले जातील. आण्विक पाणबुडी क्षमता मिळवत भारताने आण्विक त्रिकुट म्हणजे न्यूक्लिअर ट्रायडची क्षमता आणखी मजबूत केली. यामुळे शत्रुदेश हे भारतावर अणुहल्लाच काय, पण सर्व स्तरांवरील पारंपरिक युद्ध लढण्यासही कचरतील. दुसर्या शब्दांत सांगायचे झाल्यास, आण्विक पाणबुडीची शक्ती ही देशात सीमेवर शांतता राहण्यास उपयुक्त ठरेल.
भारताने शत्रुदेशांत धडकी भरविण्यासाठी अग्नी क्षेपणास्त्र तैनात केले असून, हवाई दलाच्या लढाऊ विमानांनाही अण्वस्त्रसज्ज केले आहे; मात्र सागरी मार्गावर आण्विक पाणबुडीची आणि क्षेपणास्त्रांची उणीव भासत होती. त्यामुळे अशाप्रकारची शस्त्रसज्जता देशासाठी ‘सेकंड स्ट्राईक’ म्हणजेच प्रत्युत्तराच्या स्थितीत नेहमीच महत्त्वाची ठरते. मे 1998 मध्ये दुसर्या अणुचाचणीनंतर भारताने जगाला अणुहल्ला न करण्याची हमी दिली; पण त्याचवेळी एखाद्याने अणुहल्ला केला तर देश प्रत्युत्तर म्हणून महाविनाशकारी हल्ला करण्यास स्वतंत्र असेल, असाही संदेश दिला गेला. अण्विक पाणबुडी तयार करताना भारताला अमेरिकी किंवा अन्य युरोपीय देशांचे सहकार्य लाभले नाही; परंतु रशियाने महत्त्वाचे तंत्रज्ञान सहकार्य केले. ‘अरिहंत’ आणि ‘अरिघातफ’च्या विकासात रशियाच्या अभियंत्यांनी बरेच काम केले. तत्पूर्वी रशियाने भारताला दोन आण्विक पाणबुड्या भाड्याने दिलेल्या आहेत. 1989 मध्ये त्यांनी चार्ली श्रेणीतील पाणबुड्या दिल्या आणि त्याचे नाव चक्र-1 असे दिले; परंतु त्याचा भाडेकरार संपल्यानंतर अकुला श्रेणीतील दुसरी पाणबुडी दहा वर्षांच्या भाड्यावर आणण्यात आली. आता रशिया दहा वर्षांच्या भाडेकरारावर आणखी एक आण्विक पाणबुडी देण्याची तयारी दर्शवत आहे.