

फिलिपाईन्स हे आग्नेय आशियातील बेट राष्ट्र, स्पेनचा राजा फिलिप दुसरा यांच्या नावावरून ओळखले जाते. तेथे दीर्घकाळ त्यांची सत्ता होती. फिलिपाईन्सचे राष्ट्राध्यक्ष फर्डिनांड मार्कोस ज्युनिअर यांची भारतभेट विशेष गाजली. कारण, ते पाच दिवसांच्या अधिकृत भेटीवर आले होते. हिंद प्रशांत क्षेत्रातील भारताचा एक विश्वासू समर्थक आणि सक्रिय पाठीराखा म्हणून फिलिपाईन्सचा अभ्युदय झाला.
प्रा. डॉ. वि. ल. धारूरकर
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समवेत विविध आंतरराष्ट्रीय परिषदांमध्ये मार्कोस यांची अनेक वेळा भेट झाली आहे. यामध्ये त्यांनी मोदी यांचा विश्वास मिळविला आहे. त्यामुळे त्यांच्या या भेटीकडे सबंध जगाचे लक्ष लागले होते. या दौर्यामध्ये दोन्ही देशांत झालेले सामंजस्य करार आणि आंतरराष्ट्रीय राजकारणात भारताच्या भूमिकांचे सक्रिय समर्थन करण्यामध्ये फिलिपाईन्सने घेतलेला पुढाकार अनेक द़ृष्टीने महत्त्वाचा आणि तेवढाच स्वागतार्ह आहे. 75 वर्षांच्या धोरणात्मक संबंधांचा विचार करता फिलिपाईन्सने एक नवी झेप घेतली आहे. आग्नेय आशियातील फिलिपाईन्स हा देश पेटी अमेरिकन स्टेट म्हणून ओळखला जातो. येथील लोकसंख्येमध्ये कॅथोलिक धर्मपंथीयांचे प्रभुत्व आहे.
हा समुदाय लोकशाही प्रजासत्ताकवादी असून तेथील जनतेने लोकशाही मूल्यांवरील शुद्ध भाव प्रकट केला आहे आणि अध्यक्ष मार्कोस यांचीही भेट उभय राष्ट्रांतील समसमान मूल्ये, प्रेरणा आणि समान आव्हानांना सामोरे जाण्याच्या ताकदीच्या संदर्भात विशेष महत्त्वाची आहे. संरक्षणाच्या द़ृष्टीने विचार करता आणि आग्नेय आशियात चीनच्या वाढत्या हालचालींना प्रतिशह देण्यासाठी भारताने बाजूने आणखी एक आग्नेय आशियाई राष्ट्राला एक भक्कम मित्र म्हणून आकर्षित केले आहे, ही गोष्ट अधोरेखित केली पाहिजे.
दोन्ही देशांतील द्विपक्षीय व्यापार हा सतत वाढत आहे आणि तो तीन अब्ज डॉलरपर्यंत पोहोचला आहे. हा व्यापार आणखी मजबूत करण्यासाठी या दौर्यामध्ये दमदार पावले टाकली आहेत, तसेच भारताचे प्राधान्यक्रम हे उभय राष्ट्रात मुक्त व्यापार कराराच्या दिशेने वाटचाल करणे हे आहे. कमळ आणि संपागुळिका या राष्ट्रीय फुलांवर आधारित तिकिटांचे अनावरण दोन्ही नेत्यांनी संयुक्तपणे केले आहे. हा उभय राष्ट्रांतील सांस्कृतिक आणि आर्थिक संबंध मजबूत करण्याच्या द़ृष्टीने महत्त्वाचा धागा आहे.
भारत आणि फिलिपाईन्सदरम्यान सहकार्याची नवनवीन क्षेत्रे उदयास येत आहेत. त्यामध्ये प्रामुख्याने आता संरक्षण, उत्पादन, राजकीय समर्थन, सागरी क्षेत्र विकास, विज्ञान-तंत्रज्ञान, हवामान बदलानंतरच्या समस्या, अंतराळ संशोधन, सहकार्य व्यापार आणि गुंतवणूक, उद्योग क्षेत्रातील गुंतवणूक व सहकार्य, उभय राष्ट्रातील कनेक्टिव्हिटी, आरोग्य, औषध निर्माण, कृषी डिजिटल तंत्रज्ञान, उदयोन्मुख क्रिटिकल तंत्रज्ञान, विकास क्षेत्रातील सहकार्याची नवी क्षितिजे, सांस्कृतिक आदान-प्रदान, पर्यटन विकास, सर्जनशील उद्योग, लोक संपर्क आणि इतर क्षेत्रांतील सहकार्याचा सेतू भक्कम करण्याचा दोन्ही देशांनी संकल्प केला आहे.
उभय राष्ट्रांच्या मैत्रीचा सेतू अधिक भक्कम करण्यात अनेक नवीन आव्हाने समोर आहेत. विशेषतः चिनी ड्रॅगनच्या साऊथ चायनामधील वाढत्या हालचाली, सागरातील वाढती चाचेगिरी यांसारख्या समस्यांना सामोरे जात असताना दोन्ही देशांना नवे प्राधान्यक्रम समोर ठेवून काम करावे लागेल. त्यासाठी मुक्त खुले पारदर्शक नियमांवर आधारित सर्वसमावेशक समृद्ध आणि तेवढेच लवचिक हिंद प्रशांत क्षेत्र विकसित करण्यासाठी दोन्ही देशांना नवा ‘रोड मॅप’ तयार करावयाचा आहे. त्यातच दोन्ही देशांचे सामूहिक हित सामावलेले आहे. हिंद प्रशांत क्षेत्रात भारताने आशियान हे संघटन विकसित केले आहे. त्यातही फिलिपाईन्स एक सक्रिय भागीदार आहे. या आशियानकेंद्री संबंधांचा धागा घेऊन नवी व्यूहरचना अधिक भक्कमपणे करण्यावर दोन्ही देशांचा भर आहे. त्यासाठी एक सक्रिय समर्थ भागीदार म्हणून फिलिपाईन्सचा उदय झाला आहे आणि दोन्ही देशांतील संरक्षण, सिद्धता, सागरी प्रशिक्षण केंद्रांतील आदान-प्रदान, सराव आणि प्रशिक्षण यासारख्या उपक्रमांमुळे ही भूराजनैतिक भागीदारी अधिक भक्कम आणि तेवढीच दमदार होत आहे. या भेटीचे सर्वात महत्त्वाचे फलित म्हणजे दोन्ही देशांनी साध्य केलेली सक्रिय भागीदारीची कल्पना होय. या अनुषंगाने विचार करता उभय नेत्यांनी द्विपक्षीय सहकार्याची पूर्ण जाणीव करून देण्यासाठी एक नवे संकल्पचित्र विकसित करण्यात केले आहे आणि त्या-त्या आधारे पुढील राजकीय संबंधांची वीण भक्कम करण्यावर भर दिला आहे.
फिलिपाईन्सच्या अध्यक्षांचा हा पाच दिवसांचा दौरा अनेक द़ृष्टीने फलदायी ठरला आहे. मार्कोस हे भारतीय नेतृत्वावर पूर्णपणे विसंबून असून त्यांनी भारताच्या नव्या जगातील नेतृत्वावर संपूर्ण विश्वास प्रकट केला आहे आणि प्रगतीचे एक नवे स्वप्न, संरक्षण, सुरक्षा सहकार्य, संरक्षण सामग्रीचे उपयोजन तसेच सागरी सहकार्य ही नवी क्षेत्रे या दौर्यांतून उजळली आहेत. सागरी तटरक्षक, जहाज बांधणी तसेच सागरी संपर्क, किनारी देखरेख याबरोबरच मानवतावादी मदतीच्या द़ृष्टीनेसुद्धा दोन्ही देशांचे सहकार्य वरदान ठरू शकेल. आपत्ती निवारण क्षेत्रातसुद्धा दोन्ही देशांनी मजबूत भागीदारी सुरू करण्यावर भर दिला आहे.
जलविज्ञान क्षेत्रात सहकार्य वाढविण्यासाठी संकल्प करण्यात आला आहे. पुरवठा साखळी मजबूत करणे आणि संरक्षण क्षेत्रात नवनवे प्रकल्प हाती घेणे, परस्पर व्यापाराला चालना देण्यासाठी झालेला प्राधान्य व्यापार करार महत्त्वाचा आहे. त्यामुळे दोन्ही देशांतील सध्याचा व्यापार दुप्पट करण्याच्या द़ृष्टीने प्रयत्न केले जाणार आहेत. विविध क्षेत्रांत गुंतवणूक वाढविणे आणि व्यापाराला चालना देणे यावर अधिक भर देण्यात आला आहे. पायाभूत विकास आणि कनेक्टिव्हिटी याचे महत्त्व लक्षात घेऊन त्याद़ृष्टीने नवनवीन प्रकल्प आखण्यात येत आहेत. उभय देशात विज्ञान-तंत्रज्ञानाच्या आधारे क्षमतांचे संवर्धन करणे आणि संयुक्त संशोधन उपक्रमांना चालना देणे, आरोग्य प्रणाली मजबूत करणे, कायदेशीर क्षेत्रांत नवे उपक्रम आखणे, तज्ज्ञांच्या प्रशिक्षण व देवाण-घेवाण कार्यक्रमांवर भर देणे, आयुर्वेद व पारंपरिक औषधांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांच्या आदान-प्रदानाला चालना देणे या गोष्टींवर भर देण्यात आला आहे. अवकाश संशोधन आणि तंत्रज्ञान या क्षेत्रात नव्या संधी निर्माण करण्यावर भर देण्यात आला आहे. सायबर सुरक्षा, गोपनीयता, ई-गव्हर्नन्स, आर्थिक समावेशन, डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधा, बंदरातील परस्पर संपर्क यावरसुद्धा भर देण्यात आला आहे. त्यामुळे व्यापारवृद्धीला चालना मिळू शकेल.