

नुकत्याच प्राप्त झालेल्या श्वानदंश म्हणजेच कुत्रे चावण्याच्या घटनांच्या नोंदणीबाबत असे निदर्शनास आले आहे की संपूर्ण देशात महाराष्ट्र क्रमांक एकवर आहे. भटक्या कुत्र्यांची संख्या देशभर सर्वत्र आहे आणि साहजिकच ग्रामीण भागात त्याचबरोबर शहरी भागातसुद्धा प्रचंड आहे. अगदी मुंबईसारख्या महानगरातसुद्धा हे भटकेश्वर श्वान आपला उदरनिर्वाह निवांत करत असतात. देशात महाराष्ट्रातील श्वानदंशाची संख्या सर्वात अधिक आहे. याचा अर्थ महाराष्ट्रातील कुत्री अत्यंत हौशी आहेत आणि माणसांना चावण्यामध्ये आघाडीवर आहेत. नेमके कोणत्या प्रकारचे श्वान माणसांना चावतात, याविषयी निरीक्षण नोंदवलेले नाही. परंतु, आपल्या राज्यातील सर्व कुत्री ही चिडक्या स्वभावाची आणि रागीट असावीत, असा संशय घेण्यास जागा आहे.
भटका कुत्रा दुरून दिसला, तरी आपल्यासारखी सामान्य माणसे वाट वेगळी करून जातात किंवा घाबरत घाबरत त्यांच्या बाजूने जातात. घाबरलेला माणूस दिसला की त्याच्यावर आक्रमण करायचे, हा माणसाचा नाहीतर कुत्र्यांचापण स्वभाव असावा. अन्यथा इतक्या मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात अशा घटना घडल्या नसत्या. दुरून कुत्रा दिसल्यानंतर माणसे दोन कारणाने घाबरतात. एक तर कुत्र्याचा चावा आणि त्याच्यामुळे होणारी जखम आणि दुसरे म्हणजे श्वानदंशाची म्हणजे अँटीरेबिजची घ्यावी लागणारी लस. फार पूर्वी नव्हे तर अवघ्या तीस वर्षांपूर्वी एखादा कुत्रा माणसाला चावला, तर सुमारे 14 इंजेक्शन्स त्याला घ्यावी लागत असत. शिवाय इंजेक्शन्स पोटामध्ये म्हणजेच पोटावरच्या कातडीमध्ये घ्यावी लागत. आता आधुनिक काळात या इंजेक्शन्सची संख्या केवळ तीनवर आली आहे आणि तेही इंजेक्शन्स शरीराच्या कुठल्याही मांसल भागात घेता येतात.
ग्रामीण भागात आणि शेतात रात्री होणार्या चोर्या आणि दरोडेखोरी यापासून संरक्षण व्हावे, यासाठी कुत्री पाळली जातात. शहरांमध्ये बंगला प्रकारचे घर असेल, तर सुरक्षेसाठी कुत्रे पाळले जाते. घरात कुत्रा नसतानाही एका महाभागाने आपल्या घराबाहेर 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी लावून त्यासोबत कुत्र्याचे चित्रही जोडलेले होते. ज्याच्याकडे श्वान नाही, त्यांनी अशा पाट्या का बरे लावाव्यात? सदर गृहस्थांना आम्ही कुत्रा नसतानाही पाटी का लावलीत असा प्रश्न विचारला असता, त्यांनी त्याचे फार गमतीदार उत्तर दिले. त्यांचे म्हणणे असे होते, की चोरी ही नेहमी पाळत ठेवून होते.
ज्या घरी चोरी करायची त्या घरात येणार्या, जाणार्या लोकांचा वावर, त्यावेळी घरात असणार्या लोकांची संख्या हे सर्व किमान पंधरा दिवस आधी पाळत ठेवून नंतरच चोरीचा मुहूर्त काढला जातो. अशावेळी त्या घरामध्ये कुत्रा आहे का, याची पण माहिती चोर घेत असणारच. चोर हे फारसे शिकले नसतात. त्यांच्या मनात आणि माहितीत अजूनही कुत्रा चावला, तर 14 इंजेक्शन्स घ्यावी लागतील, हेच आहे. त्यामुळे ज्या घराबाहेर 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी असेल, ते घर चोर निवडणारच नाहीत, याची खात्री असल्यामुळे सदर व्यक्तीने 'कुत्र्यापासून सावधान' अशी पाटी लावलेली आहे.