Dubai to Tel Aviv flight | टळलेल्या ‌‘अनर्था‌’चा धडा

Dubai to Tel Aviv flight |
Dubai to Tel Aviv flight | टळलेल्या ‌‘अनर्था‌’चा धडा
Published on: 
Updated on: 

नागरी विमान वाहतूक विश्वात सुरक्षिततेची अखेरची अभेद्य तटबंदी म्हणून ज्या रचनेकडे पाहिले जाते, ती म्हणजे विमानातील ‌‘कॉकपिट‌’चा चिलखती पोलादी दरवाजा. अमेरिकेवरील ११ सप्टेंबरच्या दहशतवादी हल्ल्यानंतर बाहेरील कोणताही उपद्रवी, अपहरणकर्ता, हल्लेखोर अथवा समाजकंटक चालकाच्या आसनापर्यंत पोहोचता कामा नये, या उद्देशाने विमानांच्या कॉकपिटचे दरवाजे बुलेटप्रूफ, कोड क्रमांकाशिवाय न उघडणारे आणि पूर्णपणे अभेद्य करण्यात आले. परंतु, ज्या वैमानिकांवर आणि त्यांच्या विवेकावर शेकडो निष्पाप जीवांची मदार सोपवलेली असते, त्यापैकीच एकाच्या मनात क्रूर भावना निर्माण झाली तर काय होऊ शकते याचा रक्तरंजित आणि थरकाप उडवणारा अनुभव नुकताच जगाने पाहिला. दुबईहून तेल अवीवच्या दिशेने झेपावलेल्या विमानामध्ये ३० हजार फूट उंचीवर जे काही घडले, त्याने आंतरराष्ट्रीय नागरी विमान सुरक्षेच्या चौकटीला मोठा छेद दिला.

अहमदाबादमधील भीषण विमान अपघात लोकमनातून पुसला गेलेला नाही. विविध कंपन्यांच्या प्रवासी विमानांमध्ये उड्डाणादरम्यान तांत्रिक दोष निर्माण होणे, हवेत इंजिन बंद पडणे, टर्ब्युलन्स अथवा हायड्रॉलिक प्रणाली निकामी झाल्यामुळे इमर्जन्सी लँडिंग या घडामोडी नियमित बनल्या आहेत. ताज्या घटनेने तांत्रिक दोषांपलीकडचे मानवी मानसिकतेचे अतिशय धोकादायक वास्तव समोर आणले. फ्लायदुबईच्या विमानातील घटना दोन वैमानिकांमधील वादंग किंवा वैयक्तिक हेवेदाव्यांचा संघर्ष नव्हता. सुमारे १७५ प्रवाशांना घेऊन चाललेले विमान जमिनीवर वेगाने आदळवून सर्वांचा एकत्रित बळी घेण्याचा विघातक कट होता, असे समोर आले आहे. या थरारात स्मित मच्छार या भारतीय वैमानिकाने दाखवलेला अद्वितीय निर्धार, असीम धैर्य आणि अभूतपूर्व प्रसंगावधान विमान वाहतुकीच्या आणि मानवी इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरले जावे असेच आहे. विमान नियमित उंचीवर स्थिर असताना, अचानक सहवैमानिकाच्या मनात विकृती संचारली. त्याने मुख्य वैमानिकावर प्राणघातक हल्ला चढवला. कॉकपिटमधील काही चौरस फुटांच्या चिंचोळ्या जागेत हालचालींनाही मर्यादा असतात. अशा ठिकाणी या अनपेक्षित हल्ल्यात भारतीय वैमानिक गंभीर जखमी झाला. हल्लेखोराने ते महाकाय विमान वेगाने हजारो फूट जमिनीच्या दिशेने नेले.

प्रवाशांसाठी तो काळजाचा ठोका चुकवणारा क्षण होता. अशा जीवघेण्या परिस्थितीत, रक्ताच्या थारोळ्यात पडलेले असतानाही, स्मित यांनी केवळ स्वतःचा जीव वाचवण्याचा विचार केला नाही. विमानातील पावणेदोनशे प्रवाशांची जबाबदारी आपल्यावर आहे, याचे विवेकभान ठेवून त्यांनी हा अनर्थ टाळला. प्रचंड संघर्ष करत या शूर वैमानिकाने हल्लेखोर सहवैमानिकाशी प्रतिकार चालू ठेवला. विमानाचे सुकाणू पूर्णपणे त्याच्या नियंत्रणात जाऊ न देता धाडसाने आपत्कालीन संदेश यंत्रणेचा वापर केला. आधी धोक्याचा सामान्य संदेश आणि पाठोपाठ बेकायदेशीर हस्तक्षेप अथवा विमानाचे अपहरण दर्शवणारा आंतरराष्ट्रीय पातळीवरील धोक्याचा ‘७५००’ हा कोड संदेश रडारवर प्रसारित केला.

भीषण झटापटीत स्मित यांनी कॉकपिटचा बंदिस्त दरवाजा बाहेरून उघडता येईल, अशी कळ दाबली. त्यामुळे केबिन कर्मचारी आणि धाडसी प्रवासी आत घुसले आणि त्यांनी माथेफिरू हल्लेखोराला जखडले. विमानात उपस्थित पर्यायी वैमानिक पथकाने तत्काळ सूत्रे हाती घेऊन विमानाचा मार्ग बदलला आणि सौदी अरेबियातील तबूक विमानतळावर ते सुखरूप उतरवले. अंगभूत शौर्य, साहस असणे आणि बिकट प्रसंगी त्याचा कौशल्यपूर्ण वापर करणे या दोन गोष्टी भिन्न आहेत. यातील दुसरी बाब अधिक महत्त्वाची ठरते आणि तीच या भारतीय वैमानिकाने दाखवल्याने सर्व प्रवाशांच्या चेहऱ्यावर मरणाच्या दारातून परतल्याचे ‌’स्मित‌’ उमलले. जगभरातून या वैमानिकावर कौतुकांचा वर्षाव होत आहे. पण या घटनेने विमान वाहतूक विश्वापुढे निर्माण केलेले मूलभूत आणि गंभीर प्रश्न दुर्लक्षित करून चालणार नाही. गेल्या दोन दशकांत आपण विमानाचे कॉकपिट बाहेरील जगासाठी अभेद्य केले, पण आतील चालकांची माथी भडकल्यास काय होऊ शकते, या संभाव्य धोक्याचा कोणताही विचार जागतिक सुरक्षा प्रणालीने केलेला दिसत नाही.

ताज्या घटनेत भारतीय वैमानिकाने दरवाजा उघडण्याची व्यवस्था केली म्हणून प्रवासी बचावले. पण दरवाजा उघडणे शक्य झाले नसते, तर? कॉकपिट सुरक्षेची रचना एकतर्फी विश्वासावर आधारलेली आहे. वैमानिकाची निवड करताना तांत्रिक क्षमता, विमानाचे उड्डाण, लँडिंगचे कौशल्य, सिम्युलेटरवरील अचूकता पाहिली जाते. मात्र, त्यांच्या मानसिक स्थितीचे काय? विमान कंपन्यांमधील स्पर्धा, वैमानिकांचे व्यस्त वेळापत्रक, अपुरी झोप, उड्डाणांचे विचित्र तास, ताणतणाव, मानसिक आरोग्य, व्यसनाधीनता याचे भेदक वास्तव सातत्याने समोर येत आहे. काही दिवसांपूर्वी झ्युरिख-दिल्ली एअर इंडिया फ्लाईटचा एक पायलट उड्डाणापूर्वी मद्यधुंद अवस्थेत आढळला. आंतरिक सुरक्षा यंत्रणेच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला; पण अशा घटना विमान वाहतुकीच्या सुरक्षिततेवर प्रश्नचिन्ह निर्माण करतात. त्यामुळे वैमानिकांची पार्श्वभूमी तपासणे ही कागदी औपचारिकता बनून चालणार नाही. नियमित वैद्यकीय तपासणी, अमली पदार्थ किंवा मद्यपानाची चाचणी तसेच वैमानिकांचे मानसिक आणि वर्तणूक परीक्षणही काटेकोरपणे वेळोवेळी होणे गरजेचे आहे. विमान कंपन्यांमध्ये अशी गोपनीय आणि विश्वासार्ह समुपदेशन व्यवस्था हवी, जिथे कोणतीही भीती न बाळगता वैमानिक मनातील नैराश्य, ताण किंवा वैयक्तिक संकटांबद्दल मन मोकळे करू शकतील.

मानसिक विकृती किंवा अनियंत्रित रागाच्या सूक्ष्म लक्षणांची वेळीच दखल घेणारी यंत्रणा कार्यरत नसेल, तर कॉकपिटमध्ये बसलेला प्रत्येक असंतुलित माणूस हा चालता-बोलता टाईम बॉम्ब ठरू शकतो. कॉकपिटमध्ये दोन चालकांत हिंसक झटापट सुरू झाली, तर केबिन कर्मचाऱ्यांनी नक्की काय करावे, आत कसा प्रवेश मिळवावा, विमान नियंत्रणात ठेवण्यासाठी तिसरा सुरक्षित मार्ग कोणता असावा, याचे ठोस आणि स्पष्ट नियम आवश्यक आहेत. कर्मचाऱ्यांना त्याचे नियमित प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले पाहिजे. विमानतळांवर प्रवाशांकडून नेल कटरसुद्धा जप्त केले जात असताना, कॉकपिटमध्ये आधीच एक धारदार कुऱ्हाड असणे ही बाब गंभीर आहे. केवळ बाह्य धोक्यांकडे लक्ष देत राहून आतील धोक्यांकडे डोळेझाक करण्याचे धोरण बदलावे लागेल. भारतीय वैमानिकाने असीम शौर्याने केलेला बचाव निःसंकोचपणे अभिमानास्पद असला, तरी तो जागतिक विमान वाहतूक व्यवस्थेला मिळालेला अखेरचा धोक्याचा इशारा आहे. आंतरराष्ट्रीय नियामकांनी यातून बोध घेऊन तातडीने कॉकपिट सुरक्षेचे नवे, सर्वसमावेशक निकष लागू केले नाहीत, तर काल टळलेला अनर्थ भविष्यात घडण्याचा धोका आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news