अंधश्रद्धेचे बळी रोखणार कसे?

अंधश्रद्धेचे बळी रोखणार कसे?

[author title="विश्वास सरदेशमुख" image="http://"][/author]

स्वातंत्र्याचा साडेसात दशकांचा कार्यकाळ पूर्ण करून शंभरीकडे निघालेल्या आणि वैज्ञानिक क्षेत्रातील प्रगतीची नवनवीन शिखरे पादाक्रांत करणार्‍या भारतामध्ये आजही अंधश्रद्धेची पाळेमुळे खोलवर रुजलेली आहेत, हे वास्तव नाकारता येणार नाही. कधी गुप्तधनासाठी नरबळी दिला जातो, तर कुठे पोलिस ठाण्यामध्ये मांत्रिकाला बोलावून तपासाविषयीची विचारणा केली जाते. अशी अघोरी कृत्ये राजरोसपणाने घडताना पाहून वैज्ञानिक विचार समाजात रुजवण्यामध्ये आपण किती मागे पडलो आहोत, याचा प्रत्यय येतो.

कोणत्याही विषयावरील संशयाचे धुके विज्ञानाच्या मदतीने दूर होत असताना अंधश्रद्धेमुळे एका मुलाचा जीव जाण्याची ताजी घटना हीच बाब ठळकपणाने सिद्ध करणारी आहे. उत्तर प्रदेशातील इटावा जिल्ह्यात एका तांत्रिकाने दोन तरुणांसोबत मिळून आठ वर्षांच्या मुलाचा गळा चिरून खून केला, त्याच्यावर तंत्र-मंत्र विधी केला आणि खड्डा खोदून मृतदेह लपवला. या लोकांचा असा विश्वास होता की, असे केल्याने त्यांना जंगलात कुठेतरी पुरलेला खजिना मिळेल. वैज्ञानिक जाणिवेचा विकास होत असतानाही अशा घटना घडू शकतात, हे एका क्षणी अविश्वसनीय वाटते! पण आजही असे बरेच लोक आहेत, ज्यांना असे वाटते की जादू, तंत्र-मंत्राच्या मदतीने आपल्या इच्छेनुसार काहीतरी साध्य केले जाऊ शकते. शिक्षण आणि वैज्ञानिक पद्धतींचा व्यापक विकास आणि विस्तार होऊनही अशी परिस्थिती कायम असणे हे आपल्या शिक्षण पद्धतीचे, शिक्षण यंत्रणेचे घोर अपयशच म्हणायला हवे. दुसरीकडे, अंधशद्धेचा व्यापार करणारे लोकांना आपल्या जाळ्यात अडकवून त्यांना गुन्हे करायला लावण्यात यशस्वी होतात, हे आपल्या पोलिस यंत्रणेचे अपयश आहे.

आज तंत्रज्ञानाचा प्रसार दुर्गम भागात झाला आहे म्हणून आपण आपली पाठ थोपटून घेत आहोत. शाळेची पायरीही न चढलेले लोक गुगल पेवरून पैसे पाठवत आहेत, याची उदाहरणे देऊन भारत किती तंत्रज्ञान साक्षर झाला आहे, याचे ढोल शासन व्यवस्था बडवत आहे; पण या तंत्रज्ञानाच्या लाटेवर स्वार होऊन अंधश्रद्धांची जहाजेही वेगाने फिरू लागली आहेत. सोशल मीडियाच्या माध्यमातून आज अनेक भ—ामक वैज्ञानिक स्पष्टीकरणे बहुतेक लोकांपर्यंत पोहोचत आहेत. त्याचा फटका कधी कुणाला बसेल, याचा नेम नाही. ताज्या घटनेमध्ये ज्या मुलाचा बळी देण्यात आला, त्याच्या डोळ्यांनी उद्याच्या भविष्याची कितीतरी स्वप्ने पाहिली असतील; पण अंधश्रद्धेचा डंख लागून त्या स्वप्नांची राखरांगोळी झाली.

गुप्तधनाच्या नावाखाली महिलांना सोसाव्या लागणार्‍या अत्याचाराच्या घटनाही अधूनमधून समोर येत असतात. वाशिममध्ये अलीकडेच गुप्तधन मिळावे यासाठी आईकडून तीन वर्षांपासून एका मांत्रिकाच्या माध्यमातून आपला छळ केला जातो आहे, अशी तक्रार एका 15 वर्षीय तरुणीने पोलिस ठाण्यात नोंदवली. या युवतीची आई अंधश्रद्धाळू असल्यामुळे गुप्तधन मिळेल, या आशेने तीन वर्षांपासून युवतीला घरात रोज रिंगण करून भोंदू तांत्रिकाच्या माध्यमातून तिच्यावर अघोरी विद्येचे प्रयोग करत होती. या अघोरी कृत्यांदरम्यान तिला उपाशी ठेवले जायचे. हा सारा प्रकार असह्य झाल्यामुळे ती घर सोडून अमरावतीला पळून आली.

काही महिन्यांपूर्वी गुप्तधनासाठी पूजा करण्यास विरोध केल्याने महिलेवर अनैसर्गिक अत्याचार करण्यात आल्याची घटना बीडमध्ये घडली होती. वरील दोन घटनांमध्ये वेळीच तक्रार नोंदवली गेल्यामुळे फिर्यादींचे जीव वाचले; पण उत्तर प्रदेशातील ताज्या घटनेमध्ये एका निष्पाप मुलाला जीव गमवावा लागला. राज्यघटनेच्या कलम '51अ'नुसार वैज्ञानिक विचारांना चालना देण्याची जबाबदारी सरकारची आहे. गुन्हे घडल्यावर कायदेशीर कारवाई केली जाते; पण अंधश्रद्धेचे जाळे पसरवणार्‍या कारवाया थांबवल्या जाव्यात आणि लोकांमध्ये वैज्ञानिक विचारसरणी विकसित करण्यासाठी आवश्यक पावले उचलली जावीत, यासाठी शासन व्यवस्था पुरेशी सक्रिय दिसत नाही.

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news