Chandrashekhar Bhadsavle | कृषी पर्यटनाचा आदर्श उदाहरण असलेली सगुणा बागची सुरूवात कशी झाली? 

Saguna Baug Neral Success Story | भारत हा कृषिप्रधान देश. इथल्या करोडो लोकांचं जीवन अजूनही शेतीभोवती फिरतं. पण ही शेती पूर्णपणे निसर्गाच्या लहरींवर अवलंबून आहे.
Saguna Baug Neral Success Story
Saguna Baug Neral Success Story
Published on
Updated on

Who is Chandrashekhar Bhadsavle Saguna Baug Founder

ललिता घोटीकर

lalita.ghotikar@gmail.com

भारत हा कृषिप्रधान देश. इथल्या करोडो लोकांचं जीवन अजूनही शेतीभोवती फिरतं. पण ही शेती पूर्णपणे निसर्गाच्या लहरींवर अवलंबून आहे. पाऊस वेळेवर पडला नाही, जास्त झाला किंवा अगदीच कमी झाला, तर एका हंगामात शेतकऱ्याचं संपूर्ण गणित कोलमडून जातं. बियाणं, खते, औषधं, मजुरी यासाठी घेतलेलं कर्ज डोक्यावर वाढत जातं. शेतीमालाला योग्य भाव मिळेल याची शाश्वती नसते. अनेकदा वर्षभर कष्ट करूनही हातात काही उरत नाही. या असहाय्यतेतून काही शेतकरी आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतात आणि तेव्हा प्रश्न फक्त एका व्यक्तीचा राहत नाही; तो संपूर्ण समाजाच्या वेदनेचा विषय बनतो.

Saguna Baug Neral Success Story
NHA Report 2026 | राज्याचा आरोग्य खर्च राष्ट्रीय सरासरीच्या तिप्पट

अशा काळात काही माणसं आशेचा किरण बनून उभी राहतात. आपल्या ज्ञानाचा, अनुभवाचा आणि आयुष्याचा उपयोग समाजासाठी करणारी ही माणसं खऱ्या अर्थाने परिवर्तन घडवतात. कोकणातील शेतकऱ्यांसाठी असेच एक “देवदूत” ठरले- चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे. 

अमेरिकेत उच्च शिक्षण घेऊन परत आलेल्या या अभ्यासू शेतकऱ्याने आधुनिक संशोधन, स्थानिक परिस्थिती आणि पारंपरिक शहाणपण यांची सांगड घालत शेतीकडे पाहण्याची नवी दृष्टी दिली. त्यांच्या कार्याची दखल घेत महाराष्ट्र शासनाने त्यांना शेतकऱ्यांसाठीचा सर्वोच्च मानला जाणारा “कृषिरत्न” पुरस्कार प्रदान करून गौरविले. महाराष्ट्रात कृषी पर्यटनाची संकल्पना रुजवण्याचं श्रेयही त्यांनाच जातं. आज त्यांच्या कार्यामुळे हजारो शेतकऱ्यांना नव्या वाटा सापडल्या आहेत.

चंद्रशेखर भडसावळे यांचा जन्म २९ जानेवारी १९५० रोजी एका सुसंस्कृत, विचारवंत आणि समाजसेवक कुटुंबात झाला. त्यांचे वडील हरिभाऊ भडसावळे आणि आई शकुंतला भडसावळे. घरात देशभक्ती, समाजकार्य आणि त्याग यांचे संस्कार होते. हरिभाऊ हे स्वातंत्र्यसैनिक होते. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात त्यांनी सक्रिय सहभाग घेतला. हुतात्मा भाई कोतवाल यांच्या आझाद दस्त्याशी संबंधित कामांमध्ये त्यांनी सहभाग घेतला होता. ब्रिटिश सत्तेला हादरे देण्यासाठी विजेचे पायलन पाडणे, रेल्वे रुळ उखडणे अशा धाडसी कारवायांमध्ये ते सहभागी झाले.

१९४४ मध्ये ब्रिटिशांनी त्यांना अटक केली आणि त्यांच्यावर खटला चालवला; मात्र पुढे ते निर्दोष सुटले. त्याआधी १९३२ च्या सत्याग्रहात सहभागी झाल्याबद्दल त्यांना तुरुंगवासही भोगावा लागला होता. नाशिकच्या तुरुंगातून सुटल्यानंतर ते वर्धा येथे विनोबा भावे यांच्या आश्रमात राहिले. विनोबांच्या विचारांचा त्यांच्या जीवनावर खोल प्रभाव पडला. भूदान चळवळीत त्यांनी सक्रिय सहभाग घेतला आणि आयुष्यभर समाजसेवा हीच आपली दिशा मानली.

स्वातंत्र्यानंतर जंजिरा संस्थान मुक्त करण्याच्या लढ्यातही हरिभाऊंनी सहकाऱ्यांसह काम केलं. पुढे हंगामी सरकारचे  ‘कारभारी’ म्हणून  त्यांनी म्हसळा संस्थानाची जबाबदारी  सांभाळली. स्वातंत्र्यानंतर त्यांनी आपल्या सहकाऱ्यांसोबत नेरळ येथे “कोतवालवाडी”ची स्थापना केली. त्यासाठी पन्नास एकर जमीन विकत घेण्यात आली. या कार्यासाठी साने गुरुजी फंड आणि त्यांचे बंधू गोविंद भडसावळे यांनी आर्थिक मदत केली होती.

हरिभाऊंनी कर्जत परिसरातील आदिवासी समाजासाठी अतिशय मोलाचं कार्य केलं. ठाकूर, कातकरी आणि इतर वंचित समाजघटकांना शिक्षण मिळावं म्हणून त्यांनी सातत्याने प्रयत्न केले. मुलींसाठी वसतिगृह सुरू केलं. स्वातंत्र्यलढ्यात सहभागी झालेल्या अनेक दुर्लक्षित कार्यकर्त्यांना सरकारी निवृत्तीवेतन मिळावं यासाठी त्यांनी शासनदरबारी सतत पाठपुरावा केला आणि त्यात यशही मिळवलं.

या सगळ्या संघर्षमय प्रवासात त्यांच्या पत्नी शकुंतलाबाई खंबीरपणे त्यांच्या पाठीशी उभ्या राहिल्या. अत्यंत साधेपणाने, काटकसरीने आणि समाधानाने त्यांनी संसार सांभाळला. घर, मुलं, पाहुणचार, समाजकार्याची धावपळ — हे सगळं त्यांनी शांतपणे आणि निष्ठेने सांभाळलं. त्याग, संवेदनशीलता आणि सामाजिक जाणीव यांचे संस्कारच जणू या घरात श्वास घेत होते.

अशा चारित्र्यसंपन्न, समाजासाठी झटणाऱ्या आई-वडिलांच्या पोटी वाढलेले चंद्रशेखर भडसावळे यांच्यात लहानपणापासूनच समाजाबद्दलची आस्था, प्रयोगशील वृत्ती आणि निसर्गाशी नातं जपण्याची जाणीव निर्माण झाली. पुढे त्यांनी शेती क्षेत्रात केलेलं कार्य हे केवळ कृषी संशोधन नव्हतं; तर शेतकऱ्याला आत्मविश्वास देण्याचं, जमिनीला पुन्हा जिवंत करण्याचं आणि शेतीला सन्मान मिळवून देण्याचं एक मोठं सामाजिक आंदोलन होतं.

चंद्रशेखर भडसावळे यांचे बालपण माथेरानच्या पायथ्याशी वसलेल्या नेरळ या छोट्याशा, निसर्गरम्य गावात गेले. घरची आर्थिक परिस्थिती सामान्य होती. पण घरात समाधान, संस्कार आणि माणुसकीची श्रीमंती होती. शेखर, त्यांचे भाऊ प्रदीप आणि बहीण संध्या हे तिघेही साधेपणात, प्रेमळ वातावरणात लहानाचे मोठे झाले. घरात सतत समाजकार्य, देशसेवा या गोष्टी ऐकायला मिळत असल्यामुळे लहानपणापासूनच त्यांच्या मनावर जनसेवेचे उत्तम संस्कार झाले.

लहान वयातच शेखर यांना शेतीविषयी विशेष आकर्षण वाटू लागले होते. मातीचा वास, पिकांची वाढ, निसर्गाचे बदलते रंग — हे सगळं त्यांना मोहवून टाकायचं. शेती ही केवळ उपजीविकेचं साधन नसून ती जीवनपद्धती आहे, याची जाणीव त्यांना अगदी लहानपणापासून होती. त्यामुळे माध्यमिक शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कोणताही संभ्रम न ठेवता डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ येथे कृषीशास्त्राच्या अभ्यासासाठी प्रवेश घेतला. अभ्यासात ते अत्यंत हुशार आणि जिज्ञासू होते. १९७० साली त्यांनी कृषीशास्त्रात बी.एस्सी. पदवी संपादन केली.

पण शेखर यांची स्वप्नं इथेच थांबणारी नव्हती. त्यांना आधुनिक कृषीशास्त्र आणि अन्नतंत्रज्ञानाचा सखोल अभ्यास करायचा होता. उच्च शिक्षणासाठी अमेरिकेला जाण्याची त्यांची तीव्र इच्छा होती. घरची परिस्थिती साधी असली तरी वडील हरिभाऊंनी त्यांना कर्ज मिळवून दिलं आणि शेखर अमेरिकेला रवाना झाले.

अमेरिकेतील University of California, Davis या जगप्रसिद्ध विद्यापीठात त्यांनी ‘फूड टेक्नॉलॉजी’ विषयात एम.एस. पदवीसाठी प्रवेश घेतला. मेहनत, अभ्यासू वृत्ती आणि संशोधनाची आवड यामुळे त्यांनी तिथेही आपला ठसा उमटवला. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांना चांगली नोकरी मिळाली. ग्रीन कार्ड मिळालं. संशोधनाला वाव देणारं, सुरक्षित आणि आर्थिकदृष्ट्या स्थिर असं आयुष्य त्यांच्या समोर उभं होतं. अनेकांच्या दृष्टीने हेच यशाचं अंतिम शिखर होतं.

Saguna Baug Neral Success Story
Konkan Railway Monsoon Timetable | कोकण रेल्वेचा वेग मंदावणार !

पण चंद्रशेखर यांच्या मनात मातृभूमीबद्दलची ओढ कायम होती. एक दिवस त्यांच्या एका अमेरिकन मित्राने सहजच त्यांना प्रश्न विचारला —

“शेखर, तुम्ही भारतीय मंडळी शिक्षणासाठी इथे येता आणि मग परत आपल्या देशात जातच नाही. असं का? तुमचा देश एवढा मागासलेला आहे का?”

हा प्रश्न शेखर यांच्या मनाला खोलवर भिडला. त्या एका प्रश्नाने त्यांना अस्वस्थ करून टाकलं. त्यांनी स्वतःलाच विचारायला सुरुवात केली — “आपण एवढं शिक्षण घेतोय, अनुभव मिळवतोय… पण हे सगळं फक्त स्वतःच्या सुखासाठीच का? आपल्या देशासाठी, आपल्या शेतकऱ्यांसाठी, आपल्या मातीसाठी आपली काही जबाबदारी नाही का?”

त्यांना जाणवलं की भारतातील लाखो शेतकरी संकटात जगत आहेत, आणि आपण मात्र परदेशात सुखाची नोकरी करत बसलो आहोत. त्यांनी ठरवलं — आपण मिळवलेलं ज्ञान आपल्या देशासाठी वापरायचं. आपल्या मातीत परत जायचं.

आणि मग त्यांनी एक धाडसी निर्णय घेतला. दुसऱ्याच दिवशी त्यांनी आपल्या चांगल्या नोकरीचा राजीनामा दिला आणि भारतात परतण्याचं तिकीट काढलं.One way!  त्यांच्या मित्रांना हा निर्णय वेडेपणाचा वाटला. “इतकं चांगलं आयुष्य सोडून कोण परत जातं?” असा प्रश्न अनेकांनी विचारला. पण शेखर यांचा निर्णय पक्का होता.

१९७६ साली अमेरिकेतलं सुरक्षित, सुखाचं आयुष्य मागे सोडून चंद्रशेखर भडसावळे कायमचे नेरळला परतले. परदेशात अत्याधुनिक तंत्रज्ञान, शिस्तबद्ध व्यवस्था आणि प्रगत संशोधनाची दुनिया पाहिल्यानंतर जेव्हा त्यांनी आपल्या गावाकडे नजर टाकली, तेव्हा वास्तव फार वेदनादायक होतं. शेतीची अवस्था बिकट होती. गावात धड रस्ते नव्हते. विजेचा सतत लपंडाव सुरू असे. त्यामुळे पंपाने शेतीला पाणी देणंसुद्धा अवघड व्हायचं. फोनसारख्या मूलभूत सुविधा नव्हत्या. शेतकरी कष्ट करत होता, पण त्याच्या कष्टाला दिशा आणि आधुनिक ज्ञानाची जोड नव्हती.

अशा परिस्थितीत अनेकजण परत अमेरिकेला गेले असते; पण शेखर यांनी हार मानली नाही. उलट त्यांनी हीच परिस्थिती आपलं कार्यक्षेत्र मानली. “इथंच काहीतरी बदल घडवायचा,” असा निर्धार करून त्यांनी अत्याधुनिक कृषितंत्रज्ञानाची कास धरत शेतीत प्रयोग सुरू केले.

याच काळात त्यांच्या आयुष्यात अनुराधा बेंद्रे आल्या. उच्चशिक्षित, संवेदनशील आणि विचारांनी समृद्ध अशा अनुराधाताईंनी लग्नानंतर भडसावळे कुटुंबात प्रवेश केला. त्या कॉलेजमध्ये प्राध्यापिका होत्या. पण केवळ नोकरीपुरतं आयुष्य न जगता त्यांनीही शेखर यांच्या स्वप्नात स्वतःला झोकून दिलं. दोघांनी मिळून काहीतरी वेगळं उभं करायचं, असा संकल्प केला.

याच काळात शेतावर वारंवार साप निघत असत. सुरुवातीला इतरांप्रमाणे शेखर हेही साप मारत असत. पण साप हे पर्यावरणातील अत्यंत महत्त्वाचे घटक आहेत ही जाणीव झाल्यानंतर त्यांनी साप मारणं पूर्णपणे बंद केलं. 

उलट साप पकडून मुंबईतील हाफकिन संस्था येथे देण्यास सुरुवात केली. तिथे त्यांनी साप पकडण्याचं तंत्र, विषारी आणि बिनविषारी साप ओळखण्याचं प्रशिक्षण घेतलं. हळूहळू त्यांच्या कौशल्याची ख्याती परिसरात पसरली. गावोगावी साप पकडण्यासाठी त्यांना बोलावणं येऊ लागलं. लोक त्यांना प्रेमाने “सापवाले दादा” म्हणू लागले.

१९८५ च्या सुमारास भडसावळे कुटुंबाच्या स्वप्नांना प्रत्यक्ष आकार मिळू लागला. फळांनी लगडलेली झाडं, मत्स्यशेतीचे तलाव, विविध पिके, हिरवागार परिसर अशा रम्य स्वरूपात “सगुणा बाग” उभी राहिली. “सगुणा” हे नाव शेखर यांच्या आजीचं होतं. आपल्या मातीतल्या संस्कारांना आणि कुटुंबाच्या परंपरेला जपणारं हे नावच पुढे महाराष्ट्रभर प्रसिद्ध झालं.

हळूहळू गावातील लोक, आजूबाजूचे प्रतिष्ठित व्यक्ती, विद्यार्थी, अभ्यासक सगुणा बागेत येऊ लागले. इथली शेती, प्रयोग आणि निसर्गाशी जुळलेलं जीवन पाहून लोक भारावून जात. अनुराधाताई जीवशास्त्राच्या प्राध्यापिका असल्यामुळे त्या आलेल्या पाहुण्यांना झाडं, पक्षी, साप, कीटक, जैवविविधता यांची अतिशय रंजक माहिती सांगत. 

अनेक पाहुणे तिथून जाताना एकच गोष्ट म्हणायचे — “आम्हाला इथेच राहावंसं वाटतं.”

आणि याच भावनेतून पुढे कृषी पर्यटनाची कल्पना आकाराला आली. सुरुवातीला काही छोट्या खोल्या बांधल्या गेल्या. वारली चित्रांनी सजवलेल्या टुमदार झोपड्या उभ्या राहिल्या. लोक तिथे राहायला येऊ लागले.

मधमाश्यांचं पालन, गोबर गॅस प्रकल्प, गांडूळ खत निर्मिती, मत्स्यशेती, विविध पक्षी, त्यांचे आवाज ओळखण्याचं प्रशिक्षण अशा असंख्य गोष्टी लोक इथे शिकत. जवळून वाहणाऱ्या उल्हास नदीत डुंबण्याचा आनंद घेत. शहराच्या धकाधकीतून आलेली माणसं इथे काही दिवसांतच निवांत होत.

भडसावळे कुटुंबासाठी आलेला प्रत्येक पाहुणा हा “ग्राहक” नव्हता; तो घरचा माणूस होता. “अतिथी देवो भव” ही भारतीय संस्कृती त्यांनी मनापासून जगली. गरमागरम, चविष्ट कोकणी जेवण, मनापासून केलेलं स्वागत आणि घरच्यासारखी वागणूक यामुळे सगुणा बागेत आलेली माणसं परत जाताना पुन्हा येण्याचं ठरवूनच जात.

चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांची सगुणा बाग महाराष्ट्रातील कृषी पर्यटनाचा एक आदर्श नमुना बनली. 

चंद्रशेखर नेहमी म्हणतात —

“कृषी पर्यटन व्यवसाय करू इच्छिणाऱ्या शेतकऱ्याकडे तीन गोष्टी असल्या पाहिजेत — फळती-फुलती शेती, मित्र मिळवण्याची उर्मी आणि अनोळखी पाहुण्यांची सेवा करण्याची मनापासून इच्छा.”

हीच विचारसरणी पुढच्या पिढीतही उतरली. त्यांचा मुलगा चंदन परदेशात शिक्षण घेऊन परत आला आणि आता तो व त्याची पत्नी मिळून सगुणा बागेचा वाढता व्याप समर्थपणे सांभाळत आहेत. त्यांच्या कन्या कस्तुरी या जनावरांच्या डोळ्यांच्या डॉक्टर आहेत, तर दुसरी कन्या केतकी हिने “वृंदावन” नावाचं स्वतःचं कृषी पर्यटन केंद्र उभारून आई-वडिलांचा वारसा पुढे नेला आहे.

आत्तापर्यंत अनेक मान्यवरांनी सगुणा बागेला भेट दिली आहे. मा. मुख्यमंत्री, महाराष्ट्र राज्य,एकनाथ शिंदे, हिमाचल प्रदेशचे राज्यपाल, इस्राईलमधील कृषी संशोधक, विविध विद्यापीठांचे कुलगुरू, शास्त्रज्ञ, मंत्री आणि शासकीय अधिकारी यांनी सगुणा बागेच्या कार्याची दखल घेतली आहे.

बदलत्या काळाबरोबर सगुणा बागही विकसित होत गेली. आज येथे मल्लखांब, मासेमारीची प्रात्यक्षिकं, नौकाविहार, घोडेस्वारी, झिप लाईन, बैलगाडी सफर, सेगवे सायकल, रायफल शूटिंग अशा अनेक सुविधा उपलब्ध आहेत. रंगीबेरंगी पक्षी, प्राणी, नदीत पोहण्याची सोय आणि सुग्रास कोकणी जेवण यामुळे पर्यटकांना एक वेगळाच अनुभव मिळतो. अलीकडे येथे सापडलेल्या “कातळ शिल्पां”मुळे सगुणा बागेला ऐतिहासिक महत्त्वही प्राप्त झाले आहे.

देशातील सर्वोत्कृष्ट कृषी पर्यटन केंद्र म्हणून २०१८-१९ चा “सर्वश्रेष्ठ राष्ट्रीय पर्यटन पुरस्कार” चंदन चंद्रशेखर भडसावळे यांना २०२२ मध्ये नवी दिल्ली येथे प्रदान करण्यात आला.

चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे नेहमी म्हणतात —

“सगुणा बाग हे प्रथम कृषी केंद्र आहे आणि नंतर पर्यटन केंद्र.”

सगुणा बागेची प्रगती होत असतानाच चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे शेतीत सातत्याने संशोधन आणि प्रयोग करत होते. त्यातून त्यांनी तीन महत्त्वाची तंत्रे विकसित केली —

१) SRT – सगुणा राईस टेक्निक (शून्य मशागत तंत्र)

२) SVT – सगुणा वनसंवर्धन तंत्र

३) SJT – सगुणा जलसंवर्धन तंत्र.

यापैकी SRT तंत्र विशेष प्रसिद्ध झाले. २००१ पासून त्यांनी आपल्या शेतावर प्रयोग सुरू केले. सततची नांगरणी, जमिनीची धूप आणि सुपीक थर वाहून जाणे यामुळे शेतीची उत्पादकता कमी होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले होते. त्यातूनच जमिनीची नांगरणी न करता, मातीतील सूक्ष्मजीव आणि गांडुळे जिवंत ठेवून शेती करण्याचे हे तंत्र विकसित झाले.

या पद्धतीत कायमस्वरूपी गादीवाफे तयार केले जातात. आधीच्या पिकांची मुळे जमिनीतच कुजून मातीला पोषण देतात. पिकांची फेरपालट केल्यामुळे जमिनीतील पोषकद्रव्यांचे संतुलन राखले जाते. गादीवाफ्यांमुळे जास्त पावसातही पाण्याचा निचरा व्यवस्थित होतो. लावणी आणि चिखलणी करावी लागत नसल्याने मजुरी आणि खर्च दोन्ही कमी होतात.

या तंत्रामुळे जमिनीचा सेंद्रिय कर्ब वाढतो, सुपीकता टिकते आणि उत्पादनात वाढ होते. आज भारतातील विविध राज्यांतील तसेच परदेशातील हजारो शेतकरी SRT तंत्राचा वापर करत आहेत. या कार्यासाठी त्यांना देश-विदेशात सन्मानित करण्यात आले असून अमेरिका, थायलंड, व्हिएतनाम तसेच Cornell University येथे मार्गदर्शनासाठी निमंत्रित करण्यात आले आहे.

१) SRT : SRT तंत्रासाठी “SRT ई-झेबू” हे छोटे बहुउपयोगी यंत्रही विकसित करण्यात आले आहे. पेरणी, फवारणी, मल्चिंग, गादीवाफे दुरुस्ती आणि वाहतूक अशा अनेक कामांसाठी ते उपयोगी ठरते.

अशा प्रकारे चंद्रशेखर भडसावळे यांनी शेतीकडे केवळ उत्पादनाचे साधन म्हणून नव्हे, तर माती, पाणी आणि निसर्ग जपणारी शाश्वत जीवनपद्धती म्हणून पाहिले.

Saguna Baug Neral Success Story
Fruit cultivation benefits farmers : फलोत्पादन लागवडीतून शेतकऱ्यांना रोजगाराची संधी

२) SVT – सगुणा वनसंवर्धन तंत्र : उन्हाळ्यात डोंगर आणि जंगलांमध्ये लागणारे वणवे ही आज मोठी समस्या बनली आहे. वणव्यांमुळे गवत, झाडे, सूक्ष्मजीव आणि लहान-मोठे प्राणी नष्ट होतात. यामुळे केवळ जैवविविधतेचाच ऱ्हास होत नाही, तर वातावरणातील कार्बन डाय-ऑक्साइडचे प्रमाणही वाढते. वनस्पती हवेतला कार्बन शोषून घेतात; पण जंगल जळाले की हा साठवलेला कार्बन पुन्हा वातावरणात मोकळा होतो आणि जागतिक तापमानवाढीला चालना मिळते. वणव्यांमुळे डोंगरावरील गवत आणि मुळे नष्ट होतात. त्यामुळे पावसाचे पाणी जमिनीत मुरत नाही, माती वाहून जाते आणि नद्यांचे पाणी गढूळ होते. हे थांबवण्यासाठी चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी २०१४ पासून प्रयोग सुरू केले.

वन खात्याने नेरळजवळील काही टेकड्या प्रयोगासाठी दिल्या. पावसाळ्यात उगवणारे गवत नैसर्गिकरीत्या कुजून गांडुळे आणि सूक्ष्मजीवांसाठी पोषण तयार करत होते. त्यातून “भांबुर्डी”सारख्या जमिनीवर पसरून वाढणाऱ्या, मांसल पानांच्या वनस्पती वाढल्या. या वनस्पतींमुळे जमिनीवर ओलसर आच्छादन तयार झाले. एकदा टेकडीवर वणवा लागला तेव्हा वाळलेल्या गवताचा भाग पूर्ण जळून गेला; पण भांबुर्डी असलेला भाग सुरक्षित राहिला. कारण त्या वनस्पतींनी नैसर्गिक ओलसर संरक्षणपट्टा तयार केला होता. अशा प्रकारे वनस्पतींच्या मदतीने वणव्यापासून संरक्षण करण्याच्या या पद्धतीला “सगुणा वनसंवर्धन तंत्र” (SVT) असे नाव देण्यात आले.

३) SJT – सगुणा जलसंवर्धन तंत्र : नद्या आणि तलावांमध्ये वाढणारी जलपर्णी ही आज मोठी पर्यावरणीय समस्या बनली आहे. जलपर्णीमुळे पाण्याचा प्रवाह अडतो, पाणी प्रदूषित होते आणि जलचर जीवसृष्टीवरही परिणाम होतो. हे लक्षात घेऊन चंद्रशेखर हरिभाऊ भडसावळे यांनी “सगुणा जलसंवर्धन तंत्र” (SJT) विकसित केले. मा.मुख्यमंत्री एकनाथजी  शिंदे यांच्या पाठिंब्याने त्यांनी सगुणा बागेजवळून वाहणारी उल्हास नदी जलपर्णीमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले. योग्य व्यवस्थापन आणि नियंत्रित प्रमाणातील तणनाशकांच्या वापरामुळे जलपर्णीवर प्रभावी नियंत्रण मिळवण्यात यश आले. चंद्रशेखर यांच्या मते, योग्य पद्धतीने वापरलेले तणनाशक तण नियंत्रणासाठी उपयुक्त ठरू शकते. त्यातून तण लवकर कुजते, जमिनीतील गांडुळे सुरक्षित राहतात आणि मातीची सुपीकता टिकून राहते.

आज हजारो शेतकरी त्यांनी दाखवलेल्या मार्गावर चालत आहेत. शेतीचा खर्च कमी होऊन उत्पादन वाढले आहे. धान्याचा दर्जा सुधारला असून कापसासारख्या पिकांमध्येही गुणवत्तावाढ दिसून आली आहे.

चंद्रशेखर भडसावळे यांना महाराष्ट्रातील “प्रयोगशील शेतीचे चालते-बोलते विद्यापीठ” म्हटले जाते. १९७९ पासून त्यांनी अपारंपरिक पिकांवर प्रयोग सुरू केले. १९८४ मध्ये कृषी पर्यटनाची संकल्पना प्रत्यक्षात आणली, १९८६ मध्ये मत्स्यव्यवसाय सुरू केला, तर इस्रायली शेती आणि मत्स्यपालन तंत्रज्ञानाचा अभ्यास करून अनेक प्रयोग राबवले. व्हर्टिकल फार्मिंग, SRT, SVT आणि SJT यांसारख्या उपक्रमांमधून त्यांनी शेती, पर्यावरण आणि ग्रामीण विकासाला नवी दिशा दिली.

चंद्रशेखर भडसावळे यांच्या संशोधनाचा थेट फायदा हजारो शेतकऱ्यांना झाला आहे. अगदी कमी जमीन असलेले शेतकरीसुद्धा आज कमी खर्चात भरघोस उत्पादन घेताना दिसतात. मातीची सुपीकता टिकवून ठेवत उत्पादन वाढवणारी त्यांची तंत्रे शेतकऱ्यांसाठी आशेचा किरण ठरली आहेत. त्यांच्या या कार्याची दखल राज्य आणि केंद्र सरकारने तसेच देश-विदेशातील संस्थांनी घेतली आहे. 

१) ‘वसंतराव नाईक पुरस्कार’  पुसद १९९४ 

२) ‘कृषिभूषण पुरस्कार’ (महाराष्ट्र सरकार ) १९९८ 

३) ’एशियन फिशरीज पुरस्कार’  मुंबई २००२

४) ‘आरेकर प्रतिष्ठान पुरस्कार’  कर्जत २००४ 

५) ’जगजीवन राम किसान पुरस्कार’, नवी दिल्ली २००४ 

६) ‘नाविन्यपूर्ण तांदूळ शेती करणाऱा शेतकरी’     हैदराबाद २०११

७) ‘उद्योग श्री पुरस्कार’   मुंबई २०१२

८) ‘वसंतराव नाईक प्रतिष्ठान पुरस्कार’  मुंबई २०१४ 

९) ‘हुतात्मा गौरव पुरस्कार’  रायगड प्रेस क्लब २०१५ १

०) ‘एबीपी माझा सन्मान पुरस्कार’  मुंबई २०१५ 

११) ‘कृषी गौरव पुरस्कार (भारत कृषी समाज)  २०१६

१२) ‘जीवन गौरव पुरस्कार ‘  RCF चेंबूर २०१६

१३) ‘Watsave Farmer Award ‘ by International        Commission on Irrigation and Drainage        in Thailand 2016 

१४) ‘Earth Care Award   ( SAARC ) 2016

१५) ‘कृषिरत्न’ - (महाराष्ट्र सरकार ) २०१९

१६) ‘कृषी पर्यटनाचे जनक’  महाराष्ट्र सरकार पर्यटन खाते         २०१९ 

१७) ‘Environmentary Sound Agriculture Hero’       Award Michigan State University USA       2024          

त्यांच्या संशोधनाची कीर्ती देशाच्या सीमा ओलांडून जगभर पोहोचली आहे. अमेरिका, इटली, झुरीच, थायलंड, व्हिएतनाम, पॅरिस, मेक्सिको अशा अनेक देशांमध्ये त्यांनी शेती, पर्यावरण आणि शाश्वत विकास या विषयांवर व्याख्याने दिली आहेत. खरं तर चंद्रशेखर भडसावळे हे केवळ एक यशस्वी शेतकरी नाहीत; तर प्रयोगशीलता, निसर्गप्रेम आणि समाजभान यांची सांगड घालणारे महाराष्ट्रातील “चालते-बोलते कृषी विद्यापीठ” आहेत.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

logo
Pudhari News
pudhari.news