तडका : ‘ओटीटी’मधील कहर..!

तडका : ‘ओटीटी’मधील कहर..!

मित्रांनो, आधी ओटीटी म्हणजे काय ते समजून घ्या. अहो, ओटीपी नाही, ओटीटी. ओटीटी वेगळा आणि ओटीपी वेगळा. एकवेळेला येणारा पासवर्ड, वन र्टाइम पासवर्ड म्हणजे 'ओटीपी'. ओटीटी म्हणजे ओव्हर द टॉप, म्हणजे याला कुठल्या वायरची गरज नाही, डिशची गरज नाही, सेट टॉप बॉक्सची गरज नाही. या सगळ्यांच्या डोक्यावर बसलेले नवीन माध्यम म्हणजे 'ओटीटी' होय. या ओटीटीवर अक्षरशः हजारो चित्रपट, शेकडो वेबसीरिज आणि दररोज नवनवीन कंटेंट येत असतात. जर अजून तुम्हाला वेबसीरिज पाहण्याचा नाद लागलेला नसेल, तर तो लावून घेऊ नका, अशी विनंती आहे.

ओटीटीवर असणार्‍या नेटफ्लिक्सच्या मालकाची मुलाखत आली होती. त्यांना विचारण्यात आले की, तुमची स्पर्धा कुणाशी आहे? यावर त्यांचे उत्तर होते की, आमची स्पर्धा माणसाच्या झोपेशी आहे. अक्षरशः 24 तास खिळवून ठेवेल असे काही तरी अद्भुत या ओटीटीवर पाहायला मिळते. शिवाय, याला सेन्सॉर नसल्यामुळे रंगीत आणि चमकदार गोष्टीही इथे सर्रास उपलब्ध असतात. तुम्ही चार-पाच वेबसीरिज पाहिल्यात तर सगळ्यात पहिले म्हणजे तुमची भाषा बदलून जाईल. शिवीगाळ करणे हा भाषेचाच एक भाग आहे, असा साक्षात्कार तुम्हाला होईल. कारण, या वेबसीरिजमधील पात्रे सतत बोलण्यामध्ये समोरील पात्राच्या मातुल घराण्याचा उद्धार करत असतात. हे पाहताना तुम्हाला नवीन शिव्या माहीत होतील आणि त्या शिव्या कधी तुमच्या बोलण्यामध्ये येतील ते सांगता येत नाही.

बहुतेक वेबसीरिजमध्ये दोन किंवा तीन पात्रे चर्चा करत असतील, तर ती चहा किंवा कॉफी पीत कधीच चर्चा करत नाहीत. दिवसाची वेळ कोणतीही असो, मद्याचे ग्लास भरत भरत आणि रिचवत रिचवत सगळ्या चर्चा होत असतात. यामुळे तुम्हाला मद्यपान हे आरोग्याला अजिबात हानिकारक नसून उलट उपकारक आहे, असे वाटायला लागेल. हिंसाचाराविषयी तर बोलायलाच नको. कुणीही उठून हातामध्ये बंदूक किंवा मशिनगन घेऊन कितीही लोकांना मारू शकतो. त्याची पोलिस केस होत नाही की, कोर्टामध्ये केस होत नाही. म्हणजे जर तुम्ही सलग दोन वेबसीरिज पाहिल्या, तर आम्हाला खात्री आहे की, पहाटे जाग आल्याबरोबर तुम्ही आधी आपल्या उशीखाली पिस्तूल आहे का? याची चाचपणी कराल इतका प्रचंड हिंसाचार या ठिकाणी अतिशय चकचकीत स्वरूपात तुमच्यासमोर सादर केला जातो.

झपाटून टाकणारे कथानक, त्याचबरोबर अत्यंत सुंदर असे चित्रीकरण, आकर्षक अशा अर्धवट कपड्यांमध्ये असणार्‍या ललना जर घरबसल्या पाहायला मिळत असतील, तर चित्रपटगृहांमध्ये जाणार तरी कोण? त्यामुळेच चित्रपटगृहांमध्ये प्रेक्षकांची गर्दी कमी होत आहे, हे तुमच्या लक्षात आले असेल. एखादा चित्रपट फार गाजला तर केवळ तरुण पिढी प्रत्यक्ष मोठ्या पडद्यावर पाहायला जाते. बाकी इतर जनतेला मात्र माहीत असते की, महिनाभरात फार तर दोन महिन्यांत हा चित्रपट घरी ओटीटी प्लॅटफॉर्मवर घरबसल्या पाहायला मिळणार आहे; मग थिएटरमध्ये जाणार तरी कोण? तुम्ही अजून वेबसीरिज पाहण्यास सुरुवात केली नसेल, तर कृपया करू नका आणि नाद लागला तर वेळीच सावध केले नाही म्हणून आम्हास दोष देऊ नका प्लिज. घरबसल्या मनोरंजनाचे साधन म्हणून ओटीटीकडे पाहिले जाते. त्याचा कसा वापर करायचा हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे!

संबंधित बातम्या

No stories found.
logo
Pudhari News
pudhari.news