

अक्षय निर्मळे
लहानपणी आर्सेनलच्या फुटबॉल अकादमीने नाकारलेला एक मुलगा पुढे इंग्लिश फुटबॉलचा तारणहार ठरेल आणि जगातील सर्वोच्च वैयक्तिक फुटबॉल पुरस्कारावर आपले नाव कोरेल, असे तेव्हा कुणाला वाटले असते? फुटबॉलच्या मैदानावर गोल करणे हे स्ट्रायकरचे काम; पण त्या गोलमधून स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणे आणि जगातील सर्वोत्तम खेळाडूचा सन्मान मिळवणे, हे प्रत्येकाच्या वाट्याला येत नाही. इंग्लंडच्या फुटबॉल संघाचा कर्णधार आणि बायर्न म्युनिक क्लबचा आघाडीचा खेळाडू हॅरी केन याने मात्र ही किमया साधत प्रतिष्ठित बॅलन डी’ओर पुरस्कारावर मोहोर उमटवली.
फ्रान्सच्या ‘फ्रान्स फुटबॉल’ या नियतकालिकाकडून हा पुरस्कार दिला जातो. बॅलन डी’ओरचा अर्थ गोल्डन बॉल असा आहे. या पुरस्कारासाठी खेळाडूंची निवड करताना संबंधित हंगामातील वैयक्तिक कामगिरी, निर्णायक योगदान, सांघिक यश आणि खिलाडूवृत्ती या निकषांचा विचार केला जातो. संपादकीय पातळीवर तयार होणाऱ्या नामांकन यादीतील खेळाडूंना पात्र देशांतील निवडक फुटबॉल पत्रकार गुणांच्या आधारे क्रम देतात. सर्वाधिक गुण मिळवणारा खेळाडू पुरस्काराचा मानकरी ठरतो. गेल्या २० वर्षांत लिओनेल मेस्सीने तब्बल आठ वेळा, तर ख्रिस्तियानो रोनाल्डोने पाच वेळा बॅलन डी’ओर जिंकला आहे. यंदा पुरस्काराच्या शर्यतीत किलियन एम्बाप्पे, लामिन यमाल, एर्लिंग हालँड होते.
लंडनमध्ये वाढलेल्या केनला लहानपणापासून फुटबॉलचे आकर्षण होते. आर्सेनलच्या अकादमीत आठ-नऊ वर्षांचा असताना त्याची शारीरिक वाढ आणि मैदानावरील क्षमता यांविषयी प्रश्न उपस्थित झाल्याने क्लबने त्याला पुढे संधी न देण्याचा निर्णय घेतला. हा प्रसंग त्याच्या कारकिर्दीचा शेवट ठरू शकला असता; पण वडील पॅट यांनी त्याला निराश होऊ दिले नाही. त्यांनी त्याला पुन्हा स्थानिक संघात खेळण्यास आणि मेहनत सुरू ठेवण्यास प्रोत्साहन दिले. त्यानंतर हॅरीने टॉटेनहॅम हॉटस्परच्या अकादमीत प्रवेश मिळवला आणि पुढे तो त्या क्लबचा सर्वाधिक गोल करणारा खेळाडू बनला.
टॉटेनहॅमकडून ४३५ सामन्यांत २८० गोल केल्यानंतर केनने बायर्न म्युनिकमध्ये प्रवेश केला. २०१५ मध्ये त्याची इंग्लंडच्या राष्ट्रीय संघात निवड झाली. रशियात २०१८ मध्ये झालेल्या फिफा विश्वचषकात केनने सहा गोल नोंदवत गोल्डन बूट पटकावला होता. केनच्या नेतृत्वाखाली इंग्लंडने युरो २०२० ची अंतिम फेरी गाठली; पण पेनल्टी शूटआऊटमध्ये इंग्लंडला उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. २०२५-२६ च्या हंगामात केनने क्लब आणि देशासाठी मिळून ६५ सामन्यांत ७३ गोल केले. त्यापैकी ६१ गोल बायर्नकडून आणि १२ इंग्लंडकडून आहेत. शिवाय बायर्नने बुंडेसलिगा आणि जर्मन कपसह देशांतर्गत तीन विजेतेपदेही मिळवली.
इंग्लंडसाठी त्याने ८५ गोल केले आहेत. सातत्याने गोल करण्याची क्षमता, सहकाऱ्यांना संधी निर्माण करून देण्याचे कौशल्य आणि मोठ्या सामन्यांमध्ये जबाबदारी स्वीकारण्याची तयारी, अशी त्याची ओळख बनली आहे. मैदानावर तो गोल स्कोअरर आणि प्ले मेकर या भूमिका प्रभावीपणे निभावतो. बॅलन डी’ओरची ट्रॉफी केनच्या गोलची दखल घेतेच, शिवाय त्या ट्रॉफीमागे असलेला संयम, सातत्य आणि स्वतःवरचा विश्वास यांचाही तो गौरव आहे. हॅरी केनचे यश हे नकारातूनही नवी वाट निर्माण करता येते, याची आठवण करून देणारे आहे.